आपल्या इथे शैक्षणिक कारखाने चालवले जातात व त्यातून हुशार कामगारांची फौज निर्माण केली जाते, पण दूर्देवाने इथे संशोधक घडवण्याचे कार्य फारसे कोणी मनावर घेतल्याचे दिसत नाही. अर्थात त्यासाठी आपल्या इथली सामाजिक परिस्थितीच प्रामुख्याने जबाबदार आहे. इथे शिक्षणाची व लग्नाची गणितं ही ‘पॅकेज’ वर मांडली जातात. कोणासही चाकोरीबाहेरील असुरक्षित जीवन नको आहे. त्यामुळे पाट्या टाकण्यातच धन्यता मानली जाते. जे काही संशोधन असेल, नवनिर्मिती असेल, ती परदेशातील लोकांनी करावी! आम्ही नंतर स्वस्तात त्याची पुनरावृत्ती करण्यास सज्ज आहोतच!
नवनिर्मितीस पोषक वातावरण नसल्याने आपल्या इथले प्रज्ञावंत हे परदेशात निघून जातात. तिथे त्यांना जी संधी दिली जाते, त्याचं ते सोनं करतात. मग आपल्याकडील वर्तमानपत्रात एक दिवस त्यासंदर्भातील बातमी झळकते, ‘भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञास नोबेल पारितोषिक!’. जो समाज प्रज्ञावंतास वाव देऊ शकत नाही, त्याने यशप्राप्तीनंतर मागाहून तो प्रज्ञावंत आपल्या समाजाचा असल्याचे अभिमानाने मिरवणे कितपत योग्य आहे? प्रत्यक्ष देवाचा वरदहस्त असणारे प्रज्ञावंत ही एखाद्या समाजास मिळालेली बहुमोल देणगी असून अशा प्रज्ञावंतास खरं तर त्यांच्या बालवयातच हेरुन त्यांस पोषक वातावरणात योग्य रीतीने घडवायला हवे.
अर्थात एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती करण्यासही कौशल्य हे लागतेच! पण भरमसाठ शैक्षणिक शूल्क आकारणारे आपल्या इथले शैक्षणिक कारखाने कोणत्या प्रतीचे विद्यार्थी उत्पादित करतात? हा देखील एक आभ्यासाचाच विषय आहे. एखादा विषय विद्यार्थ्यास समजला आहे का? यापेक्षा त्याने तो थोडाफार तरी पाठ केला आहे का? यावरुन इथे गुणवत्ता ठरवली आते. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर आपल्या विषयासंदर्भातील काही शब्द व संकल्पना सोडल्या तर सर्वसाधारण विद्यार्थ्याच्या मेंदूमध्ये फार काही सापडत नाही.
मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी भेसळयुक्त दूध पुरेसं नाही, म्हणून दूधात बॉर्नव्हिटा टाकून दूधाची शक्ति वाढवण्यास सुरुवात झाली. तद्वतच मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी दर्जाहीन शिक्षण पुरेसं नाही, म्हणून दर्जाहीन शिक्षणात शिकवणीची भर टाकून शिक्षणाची शक्ति वाढवण्यास सुरुवात झाली. पण लहान मुलास खेळायलाच मिळत नसेल, तर त्याच्या अंगी असलेल्या शक्तिचा उपयोग तो काय? नुसती शक्ति वाढून चालत नाही, तर त्यास व्यवहारीकतेची जोडही असायला हवी. व्यावहारीक ज्ञानाची अशी जोड देण्याचे कार्य हे शेवटी कंपन्यांनाच करावे लागते. त्यातून हुशार कामगार निर्माण होतात. पण त्यांचंही ‘नवनिर्मितीचं’ असं एक स्वप्न असतं, जे त्यांनी त्यांच्या हृदयाच्या अशा एका खोल कप्यात दडवून ठेवलेलं असतं, की जो पुढे जाऊन ते स्वतःच विसरुन जातात.
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.