सामाजिक

मराठी समाज, भाषा व संस्कृतीचे भविष्य

मागच्या आठवड्यात नवीन टि.व्ही, फ्रिजची खरेदी केली. तो एक आनंददायी अनुभव होता. शोरुममधील सेल्समन पासून बिल करणार्‍या लोकांपर्यंत सर्वजण मराठी होते. त्यानंतर घरी वस्तूंची डिलिव्हरी करणारे आणि प्रत्यक्ष डेमो दाखवणारे लोकही मराठीच होते. त्यांनी स्वतःहून लावलेला योग्य दर, त्यांची विनयशीलता, कामाप्रती असलेली एकनिष्ठता पाहून मनास अत्यंत समाधान वाटले. आजकाल मराठी लोक अधिक नम्र, समाधानी, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ट झाल्याचे समाजात वावरताना प्राकर्षाने जाणवू लागले आहे. माझे सर्व मित्र, भावंडे ही समोरच्याला समजून घेऊन अगदी आदराने व आपुलकीने वागतात. त्यांना स्वतः बद्दल आत्मविश्वास तर आहेच, पण त्यापैकी बहुतेकांना त्यांच्या भाषेबद्दल अभिमानही आहे. हिंदी चित्रपटांत वाढलेला मराठीचा वावर हा याचेच द्योतक म्हणून पाहता येईल.

शिक्षण व आर्थिक सुबत्ता ही या बदलामागील खरी कारणे आहेत. विचार हे संसर्गजन्य असतात. मराठी मालिकांमधून आजकाल जे चांगले विचार समाजास देण्यात येत आहेत, त्याचेही या इथे कौतुक करायला हवे. आमच्या आधीच्या मराठी पिढ्यांमध्ये अर्धवट ज्ञान, आर्थिक विफलता व त्यातून आलेला स्वतःबद्दलचा न्यूनगंड प्राकर्षाने दिसून येतो. अशाने ते आपल्या संस्कृतीकडे देखील अभिमानाने पाहू शकले नाहीत. पण त्यांनी आपल्या मुलांस चांगल्यातले चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्याची गोड फळे दिसण्यास आता सुरुवात झाली आहे. मराठी समाजास पुन्हा उर्जीतावस्था प्राप्त होण्यास मला वाटतं आणखी काही पिढ्या जाव्या लागतील. तोपर्यंत आमची पिढी ही वयोवृद्ध अथवा कालबाह्य झालेली असेल. सध्याच्या परिस्थितीत जरी काही सुखचिन्हे दिसत असली, तरी भविष्यातील धोकेही ओळखायला हवेत.

‘मराठी लोकांचे’ भविष्य हे जरी एका बाजूला उज्ज्वल भासत असले, तरी मराठी भाषेचे, संस्कृतीचे व त्यायोगे ‘मराठी समाजाचे’ भवितव्य मात्र काळजी करण्यासारखे आहे. सर्वत्र अनावश्यकपणे बोकाळत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा या मराठी भाषेसाठी धोक्याची घंटा ठरत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांआडून मराठी मुलांना बालवयातच हिंदीचे बाळकडू पाजण्याचा जो छुपा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, तो खरा अत्यंत धोकादायक व चिंताजनक स्वरुपाचा आहे. आपल्याला जितकं हिंदी येतं त्यापलिकडे त्याचा व्यवहारी जीवनात काडीमात्र उपयोग नसतानाही अशा शाळांमधून अनावश्यकपणे लहान मुलांवर हिंदी बोलण्याची सक्ती केली जाते. आजची लहान पिढी हेच उद्याचे भविष्य आहे. तेंव्हा मराठी समाजाचे, मराठी संस्कृतीचे स्वतंत्र अस्तित्त्व पुसून टाकून त्याचे हिंदीकरण करण्याचा हा छुपा डाव आपण ओळखायला हवा.

मराठी माणसाने दूर भविष्यात इंग्रजी संस्कृती स्विकारल्यास कदाचीत त्याचे भले होईल, पण हिंदी संस्कृतीतून त्यास काहीही चांगले साध्य होणार नाही. कारण भारतीय उपखंडात मराठी हीच सर्वोत्तम प्रगतिशील संस्कृती असल्याचे अनेक विचारवंतांनी व ईतिहासाच्या आभ्यासकांनी मान्य केलेले आहे. आपल्यावर हिंदी का लादली जातीये? का थोपवली जातीये? ..आणि आपण मुळात हे सहनच का करतो? ते माझ्या बुद्धिच्या आकलनशक्तीपलिकडचे आहे! पण सर्वसामान्य पालकांना हे कोण समजावून सांगणार? आणि त्यांच्या दृष्टीने विचार करता ते एकटे तरी काय करणार? महाराष्ट्राला मराठीवर प्रेम करणारे प्रामाणिक, तेजस्वी नेतृत्त्व नाही हीच खरी शोकांतिका आहे.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.