खगोलशास्त्र

हबल दुरदर्शिकेतील कार्यबिघाड आणि दुरुस्ती

या महिन्याच्या सुरुवातीला हबल मधील एक गायरोस्कोप निकामी झाल्याने या दुरदर्शिकेच्या कार्याला मर्यादा आली होती, परंतु हा कार्यबिघाड आता दुरुस्त झाला असल्याचे नासा कडून सांगण्यात येत आहे. गायरोस्कोपचा उपयोग दुरदर्शिकेला लक्ष्यावर स्थिर करण्यासाठी केला जातो. हबलला कार्यरत राहण्यासाठी एकाचवेळी कमीतकमी तीन गायरोस्कोपची आवश्यकता असते. हबल मधील तीन पैकी एक गायरोस्कोप निकामी झाल्यानंतर चौथे अतिरिक्त गायरोस्कोप देखील व्यवस्थित काम करत नसल्याने दुरदर्शिका ‘सेफ मोड’मध्ये निघून गेली होती.

हबल दुरदर्शिका
हबल दुरदर्शिका

दोन किंवा एक गायरोस्कोप असणे जवळपास सारखेच असल्याने दोन गायरोस्कोपवर हबल दुरदर्शिका चालवण्याची वेळ आली असती, तर दोन पैकी फक्त एकच गायरोस्कोप कार्यरत राखण्यात येणार होते, जेणेकरून हबलचे आयुष्य वाढू शकेल. केवळ एका गायरोस्कोपवर देखील काम चालू शकले असते, पण अशाने अवकाश निरीक्षणाला पुष्कळ मर्यादा आल्या असत्या. आता हबल मधील कार्यबिघाड दुरुस्त झाला असल्याने एका गायरोस्कोपवर काम चालवण्याची वेळ येणार नाही. ही दुरदर्शिका यापुढे देखील पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहील.

या साऱ्यात एक रोचक घटना घडली ती अशी की, जेंव्हा हबल मधील गायरोस्कोपमध्ये बिघाड झाला, त्यानंतर काही दिवसांतच ‘दी चंद्रा एक्स-रे ऑब्झर्व्हटरी’चे गायरोस्कोप देखील निकामी झाले. त्यामुळे ‘नक्की काय सुरू आहे?’ असा एखाद्याला प्रश्न पडणे स्वाभाविक होते. पण आता या एक्स-रे दुरर्शिकेतील गायरोस्कोप बदलण्याचे काम प्रगतीपथावर असून हबल प्रमाणे ही दुरदर्शिका देखील लवकरच कार्यरत होणे अपेक्षित आहे.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.