सामाजिक

विसाव्या शतकातील मराठी समाज

शिवकर बापूजी तळपदे या मराठी संशोधकाने राईट बंधूंच्या आठ वर्षं आधी विमानाचा शोध लावल्याचा दावा काही लोकांकडून केला जातो. यासंदर्भातील माहिती ही मला काही वर्षांपूर्वी सर्वप्रथम एका ब्लॉगवरुनच समजली होती. पण आता शिवकर तळपदे यांच्या जीवनावर आधारीत एक हिंदी चित्रपट उद्या रिलिज होत आहे, तेंव्हा यासंदर्भातील माहितीस पुन्हा उजाळा मिळाला. मला स्वतःला मराठी असल्याचा प्रचंड अभिमान आहे, पण त्यामुळे ही गोष्ट नक्कीच खरी असली पाहिजे, असं मी काही आंधळेपणाने म्हणनार नाही. पण त्यासंदर्भातील सत्यासत्य न तपासता हे सर्व खोटं असलं पाहिजे, असा देखील निर्वाळा मला द्यायचा नाही. यासंदर्भात ऐतिहासिक तज्ञांकडून योग्यप्रकारे आभ्यास केला गेला पाहिजे. पण बाकी काही असले, तरी शिवकर तळपदे हे विमान उडवण्याच्या दिशेने नक्किच काहीतरी प्रयत्न करत असावेत असं वाटतं.

मराठी समाजाच्या एकंदरीत ईतिहासाचा विचार करता काही गोष्टी मला स्पष्टपणे दिसून येतात. इंग्रजांची सत्ता भारतावर स्थापन होण्यापूर्वी मराठ्यांचा व महाराष्ट्राचा एकंदरीत भारतावर खूप मोठा प्रभाव होता. इंग्रज येण्यापूर्वी सुमारे शंभर वर्षं तरी भारताच्या बहुतांश भागावर मराठ्यांची सत्ता होती, हे दूर्देवाने आजच्या पिढीस माहित नाही. कारण हा ईतिहास शालेय पाठ्यपुस्तकातून शिकवला जात नाही. महाराष्ट्राचा, मराठी लोकांचा इतका महत्त्वाचा ईतिहास हा प्रत्यक्ष महाराष्ट्राच्याच शालेय आभ्यासक्रमात दिसू नये! यापेक्षा मोठे दूर्देव ते काय असू शकते? यामागे राजकारण्यांचा धूर्तपणा लक्षात येतो. मराठी लोकांमधील आत्मविश्वास वाढीस लागून त्यांनी भारतीय समाजात व एकंदरीत राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू नये, अशीच दिल्लीश्वर राजकारण्यांची व त्यांच्या महाराष्ट्रातील मांडलिकांची ईच्छा असावी असे यातून दिसून येते. वस्तूस्थितीचा विपर्यास करुन अवाजवी असे काही शिकवावे असे मला आजिबात वाटत नाही, पण जे जसे घडले तसे पुरव्यांच्या आधारे नव्या पिढीपुढे का मांडू नये? मराठ्यांनी दिल्लीवर केलेली स्वारी व पानिपतमध्ये झालेला पराभव हे सर्व काही नव्या पिढीपुढे आलं पाहिजे. इंग्रजांपेक्षा मराठ्यांची सत्ता अधिक चांगली होती, असं माझं अजिबात म्हणनं नाही. कारण इंग्रजांच्या काळात ज्या सामाजिक सुधारणा झाल्या त्याची सुरुवात ही मराठेशाहीत झाली नव्हती. पण मुघलांपेक्षा तरी मराठे हे भारतीय लोकांसाठी राज्यकर्ते म्हणून अधिक चांगले होते, हे मान्य करण्यास काय हरकत आहे?

इंग्रजांची भारतावर सत्ता स्थापन झाली, तरीदेखील भारतीय समाजकारणावर व राजकारणावर असलेला मराठ्यांचा प्रभाव हा कमी झाला नव्हता. न्यायमूर्ती रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगारकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, असे एकापेक्षा एक महामानव त्याकाळत भारताचे समाजिक व राजकीय नेतृत्त्व करत होते. भारताच्या इतर भागातही त्याकाळी थोर समाज सुधारक होते, पण महाराष्ट्र हा सर्वार्थाने भारतात अग्रेसर होता. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत ही आघाडी टिकून होती, त्यानंतर मात्र मराठी समाज व एकंदरीतच महाराष्ट्राच्या अधोगतीस सुरुवात झाली. व्यापक दृष्टिकोनातून पाहता विसाव्या शतकापासूनच संबंध जगात शांतता प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली होती. शस्त्रांचे महत्त्व कमी होऊन पैशांचे महत्त्व हे हळूहळू वाढू लागले. मानवतेच्या दृष्टिकोनातून ही अगदी चांगली गोष्ट होती. पण मराठी समाज हा मुख्यतः लढवय्या समाज होता. भारतावरील आपली सत्ता गमावल्यानंतर बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे त्यास खूप अवघड गेले. ‘महाराष्ट्र’ देश हा चीनकडून युरोपकडे जाणार्‍या व्यापारी मार्गाच्या दरम्यान येत नाही. त्यामुळे इथल्या लोकांचा व्यापाराशी संबंध हा कधी आलाच नाही. याऊलट गुजरात, पंजाब, सिंध हे देश व्यापारीमार्गात येत असल्याने व्यापार करणे हे तिथल्या लोकांच्या रक्तातच होते. पैशांचे महत्त्व जसे वाढू लागले, तसे भारताचे नेतृत्त्व हे त्याभागातील लोकांच्या हातात निघून गेले.

जुन्या लोकांच्या स्वभावगुणात एकप्रकारची उद्विग्णता दिसून येते. पैसे कमवण्यात येत असलेल्या अपयशातूनच ती कदाचित निर्माण झाली असावी, असा माझा अंदाज आहे. पैसे कमवण्यास जी एकंदरीत मानसिक बैठक लागते, त्याचा मराठी लोकांमध्ये पूर्णतः अभाव दिसून येतो. पैशांवर चालणार्‍या नवीन युगात येत असलेल्या सततच्या अपयशामुळे मराठी लोकांच्या मनात स्वतःबद्दल ‘न्यूनगंड’ निर्माण झाला. त्यामुळे ते आपल्या मुलांमध्ये देखील आत्मविश्वास निर्माण करु शकले नाहीत. पण त्यांनी एक गोष्ट मात्र अगदी वेळेवर जाणली. महाराष्ट्रातील समाजसुधारकांमुळे मराठी लोकांस शिक्षणाचे महत्त्व हे फार लवकर समजले. त्यांनी आपल्या मुलांस सुशिक्षित केले. त्याची काही चांगली फळे ही आता आपल्या आसपास दिसू लागली आहेत. दरवर्षी कॉलेजमधून बाहेर पडणारे लाखो उच्चशिक्षित मराठी पदवीधर चांगल्या नोकर्‍यांवर रुजू होत आहेत. एखाद्या छोट्या दुकानदारापेक्षा ते अधिक कमवतात. त्यामुळे आता एकंदरीतच मराठी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा हळूहळू बदलू लागला आहे. तरुण मराठी मुलांमधील आत्मविश्वास आता वाढला आहे. विसावे शतक हे एकंदरीत मराठी समाजाच्या दृष्टिने फार काही चांगले नव्हते. पण एकविसाव्या शतकात मात्र अगदी पूर्वीप्रमाणेच अनेक मराठी लोक आपली छाप सोडतील याबाबत मला पूर्णतः विश्वास आहे.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.