व्यक्तिगत

लग्न व अपेक्षा

काही वर्षांपूर्वी भावाच्या लग्नाच्या निमित्ताने आई व पप्पा अनेकदा वधू-वर सुचक मंडळाच्या साईटवर मुली पहात. त्यानिमित्ताने अधूनमधून मी देखील अशा साईटवरील मुली पहात होतो. त्याकाळात इंटरनेटचा फारसा प्रचार झाला नव्हता व बहुजन समाजासाठी हे माध्यम अगदीच नवीन होते. त्यामुळेच की काय!? पण माणसाच्या मनात लग्नाची दहशत बसावी, असे काही चेहरे त्याकाळात अशा साईट्सवर झळकत असत. ते पाहून लग्नाचा उत्साह तर सोडाच, पण मनात नैराश्यच अधिक दाटायचे. त्यामुळे मी आईस तेंव्हाच सांगून टाकले होते की, माझ्या लग्नाच्या वेळेस वधू-वर सुचक मंडळांच्या साईटकडे फिरकायचे देखील नाही.

बघता बघता काही वर्ष लोटली आणि घरात माझ्या लग्नाचा विषय निघू लागला. आता आपल्या मराठी समजात मुलगा ‘लेखक’ आहे, म्हणून सांगायची सोय नाही. स्वतःला ‘लेखक’ म्हणवनारी विचित्र व्यक्ति कोणासही फारसं आकर्षित करत नाही. लग्न करण्यासाठी तरी नोकरी कर म्हणून अनेकांनी अनेकदा मला सल्ला देऊन पाहिला. त्यामुळे तो विचार माझ्या मनातही डोकावून गेला. पण मी जसा आहे तसा जर एखाद्या मुलीस आवडत नसेन, तर त्याला काय अर्थ आहे? तेंव्हा आपण स्वतःशी व दुसर्‍याशी प्रामाणिक राहायचं, असं मी मनोमन ठरवून टाकलं. असं ठरवण्याचं आणखी एक कारण म्हणजे, मी एक जन्मजात लेखक असून मला दुसरं काही येतही नाही.

वधू-वर सुचक मंडळाच्या साईटवर काही निमित्ताने आज अनेक दिवसांनी मी नजर फिरवली. मध्यंतरीच्या काळात इंटरनेटचा जो प्रसार झाला, त्याचा परिणाम आता तेथे देखील जाणवू लागला आहे. तेथिल नैराश्यवत परिस्थिती आता बदलली असून अनेक नवीन, प्रसन्न चेहरे तेथिल वातावरण पल्लवित करु लागले आहेत. पण ‘अरेंज मॅरेज’ म्हणजे देखील शेवटी एक जुगारच नाही का!? जणू काही ‘आपल्या आयुष्यभराची ठेव एका पैजेवर लावावी’ अशी भावना ‘अ‍ॅरेंज मॅरेज’ म्हटलं की कधी कधी मनात दाटून येऊ लागते. तेंव्हा डोक्यात काहीसा संभ्रम निर्माण होतो.

साईटवरील मुलींच्या प्रोफाईलखाली सर्वांत शेवटी त्यांच्या अपेक्षा दिलेल्या असतात. त्या फारकाही अवास्तव असतात अशातला भाग नाही, पण त्या वाचताच मी मात्र एकदमच स्पर्धेतून बाद होतो! ‘मुलगा नोकरी करणारा व स्थिरस्थावर असायला हवा’. मी दोन क्षण डोळे मिटले. समोर असलेल्या सर्व मुलींचा मनातूनच निरोप घेतला, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे नवरा मिळो! अशी मनोमन प्रार्थाना केली, ती साईट बंद केली व नेहमीप्रमाणे लिहिण्यास सुरुवात केली.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.