इंग्लिश चित्रपटांमध्ये गाणी नसली, तरी त्यात पार्श्वसंगीताचा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्यात आलेला असतो. पार्श्वसंगीतामुळे चित्रपटातील दृष्याला एक नवी उंची प्राप्त होते. इंग्लिश चित्रपटांच्या माध्यमातून मला इंग्लिश भाषेतील अनेक उत्तमोत्तम गाण्यांची ओळख झाली. आपल्याकडेही चित्रपट आणि कार्यक्रमांत पार्श्वसंगीताचा खूप चांगला वापर करण्यात आलेला असतो, पण हे संगीत युट्युब सारख्या माध्यमांवर स्वतंत्रपणे आढळून येत नसल्याने त्याचा आस्वाद घेता येत नाही. अर्थात आपल्याकडे पार्श्वसंगीताला हवे तेव्हढे महत्त्व दिले जात नाही असेच एकंदरीत यातून दिसून येते.
लहानपणापासूनच मला संगीताची एव्हढी आवड होती की, आजही एखादे संगीत ऐकताच ते कोणत्या चित्रपटात वा कार्यक्रमात? कोणत्या प्रसंगी वापरण्यात आले होते? ते मी अगदी सहज सांगू शकतो. मला आजवर ज्या काही कलाकृती आवडल्या आहेत, त्यात संगीताचा फार मोठा वाटा आहे. कधी कधी एखादा चित्रपट वा कार्यक्रम भलेही काही विशेष नसेल किंवा पूर्वी तो अनेकदा पाहिलेला असेल, तरीही केवळ त्यातील संगीत ऐकण्यासाठी मी तो पुन्हा पुन्हा पहात राहतो. काहीवेळा एखादे संगीत कानावर पडल्यानंतर परत ते कुठेही ऐकायला मिळत नाही, तेंव्हा मात्र मनाला हुरहूर लागून राहते. पण असे हरवलेले संगीत जेंव्हा अनपेक्षितपणे सापडते, तेंव्हा त्याचा आनंद काही वेगळाच असतो!
मी स्वतः एखादे वाद्य आत्मसात करू शकलो नाही याची नेहमीच मला खंत वाटत राहते. ज्यांना संगीत वाजवता येते, धून तयार करता येते ते खरंच भाग्यवान असतात. थेट मानवी हृदयाला भिडण्याची दैवी देणगी त्यांना लाभलेली असते. अखेर एखादी उत्तम धून सापडल्याचा आनंद हा शब्दांत नव्हे, तर संगीतातच व्यक्त करता येऊ शकतो!
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.