Uncategorized

पटसृष्टीचे मराठीप्रेम

मराठी पट आता प्राईम टाईम मध्ये दाखवणं सक्तिचं केलं गेलं आहे. पण प्राईम टाईम म्हणजे नक्की कोणती वेळ? तर ज्यावेळी चित्रपट पाहण्याकरीता गर्दी होते अशी वेळ! कॉलेज मधली तरुण मुलं ही पटास दुपारी गर्दी करतात, तर नोकरदार मंडळींना रात्रीच्या वेळी पट पाहणं शक्य होतं. त्यामुळे त्या त्या पटविषयाच्या अनुशंगाने दुपारी १२ ते रात्री ९ दरम्यान एका स्क्रिनवर मराठी पट दाखवणं अनिवार्य केलं गेलं आहे. अर्थात मराठीच्या दृष्टीने हा एक चांगला निर्णय आहे आणि त्याचं स्वागतही झालं पाहिजे. या प्रश्नासंदर्भातील सर्व उलथापालथ काल वाहिन्यांवर झालेली आहे, तेंव्हा मला त्यावर अधिक काही बोलायचं नाही. मला फक्त अशा एका मुद्याकडे लक्ष वेधायचं आहे, ज्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही.

काल पटसृष्टीतील सर्व कलावंतांचं मराठी प्रेम जागृत झालं होतं! चांगली गोष्ट आहे! पण ज्यावेळी बेळगावातील आपच्या मराठी बांधवांवर अत्याचार होत होता, तेंव्हा कुठं गेलं होतं तुमचं मराठी प्रेम? त्यावेळी तुम्हाला ट्विटरवरुन साधा एक निषेधही नोंदवावासा वाटला नाही!? बरं ते जाऊ दे! तुमचं मराठीवर एव्हढं प्रेम आहे! तर ट्विटरवरुन कधीतरी थोडंफार मराठीतून लिहिलेलंही दिसत नाही!

आता मराठी पटसृष्टीतील लोकांकडून या अपेक्षा का करायच्या? कारण समाजानं त्यांना एक मानाचं स्थान दिलं आहे! त्यांच्या शब्दाला माझ्या शब्दापेक्षा लाखपट जास्त किंमत आहे. तुम्हाला केवळ पट व्यवसायाच्या निमित्तानेच मराठी लोक आठवतात का? चित्रपटगृहाच्या आत जशी मराठी लोकांची तुम्हाला गरज वाटते, तशी चित्रपटगृहाबाहेर मराठी लोकांना तुमची गरज आहे!  यासाठी पटसृष्टीतील कलावंतांनी आंदोलने वगैरे करावीत अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. पण केवळ मराठी पटांच्या बाबतीतच नव्हे, तर इतर कोणत्याही कारणाने जेंव्हा जेंव्हा मराठीवर अन्याय होत असेल, तेंव्हा त्यांनी ट्विटरवरुन मराठीच्या बाजूने एखादे ट्विट करावे एव्हढीही माफक अपेक्षा बाळगू नये का?

असो! या लेखात मी ‘चित्रपट’ या शब्दाऐवजी केवळ ‘पट’ हा शब्द वापरल्याचं आपल्या लक्षात आलंच असेल. ‘चित्रपट’ हा शब्द मला अगदी सुरुवातीपासूनच आवडत नाही. मला तो शब्द फार क्लिष्ट वाटतो. ‘सिनेमा’ म्हणावं तर तो हिंदीमधून उचलल्यागत वाटतो. त्यापेक्षा केवळ ‘पट’ असं म्हणायला काय हरकत आहे? आता आपण ‘चित्रमालिका’ असं न म्हणता ‘मालिका’ असं म्हणतोच ना! मग ‘चित्रपट’ कशाला म्हणायचे? त्यापेक्षा ‘पट’ म्हणनं कित्ती सोपं आहे! सुरुवातीला ‘पट’ म्हणनं थोडंसं वेगळं वाटलं, तरी पुढे हळूहळू त्याची सवयही होईल!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.