Uncategorized

चित्रपट, पुस्तक, अर्थसवय

आज मला ईपुस्तकांच्या विक्री संदर्भात बोलायचं आहे.. आणि त्याची तुलना ही चित्रपट व्यवसायाशी करायची आहे. चित्रपटाच्या तिकिटाचा दर हा साधरणतः २०० रुपये असतो, असे आपण गृहित धरु. इकडे एखादे पुस्तकही साधारणतः २०० रुपयांनाच मिळते. पण चित्रपटासाठी २०० रुपये खर्च करण्यास मागे-पुढे न पाहणार्‍या अनेक लोकांस २०० रुपयांचे पुस्तक विकत घेणे मात्र अगदी जीवावर येते. केवळ २ तासांची करमणूक करणारा चित्रपट घरी घेऊन जाता येत नाही, की पुन्हा पुन्हा पाहता येत नाही. २०० रुपयांना विकत घेतलेले पुस्तक मात्र अनेक तास करमणूक करु शकते आणि ते आपल्याजवळच राहते. २०० रुपयांत एकालाच चित्रपट पाहता येतो, इथे २०० रुपयांना घेतलेले पुस्तक मात्र अगदी २०० लोक वाचू शकतात. ईपुस्तक असेल तर ते खराब होत नाही, की अगदी हरवतही नाही.

अनेक मराठी ईपुस्तके ही १०० रुपयांपासून पुढे मिळतात. इतर अनेक वाचकांप्रमाणे मला स्वतःला देखील वाटत होतं की, ईपुस्तकांस छापाईचा खर्च येत नाही, तेंव्हा त्यांचे दर हे ५० रुपयांच्या आत असायला हवेत. पण नंतर माझ्या लक्षात आलं की, मी चित्रपट पाहण्यास सहज २०० रुपये खर्च करतोय, मग ईपुस्तके स्वस्त असावीत अशी मी मूळात अपेक्षाच का करावी? ईपुस्तकास छापाईचा खर्च येत नाही, तसा या डिजिटल युगात चित्रपटाच्या प्रती वितरीत करण्यास तरी कुठे खर्च येतो? पण म्हणून ते काही स्वस्तात चित्रपट दाखवत नाहीत व आपणही त्यांच्याकडून आजकाल तशी अपेक्षा करत नाही. कारण चित्रपट व्यवसायीकांनी आपल्याला हळूहळू तशी सवय लावली आहे. अगदी त्याचप्रमाणे ईपुस्तक विक्रेत्यांनीही आपल्या पुस्तकांचे दर आजिबात कमी करु नयेत. माझ्या स्वतःसहीत इतर लोकांसही १०० – २०० रुपयांचे पुस्तक विकत घेण्याची सवय लागायला हवी. पुस्तक वाचण्यास अधिक कष्ट पडतात. तरी याचा अर्थ असा नव्हे की, पुस्तक स्वस्तात मिळायला हवं.

आपल्या इथल्या लोकांना एखादी सेवा घेतल्यानंतर त्यासाठी पैसे मोजायची सवय नाही. आपल्याला शक्यतोवर सगळं फुकट असावं असं वाटतं. अर्थात अशाप्रकारची मानसिकता असणे हा इथल्या माणसांचा दोष नसून त्यांस कठिण परिस्थितीची पार्श्वभूमी आहे. लोक जसजसे सधन होत जातील, तसतसे ते खर्च करण्यापूर्वी फारसा विचार करणार नाहीत. पण त्यांस तशी अर्थसवय लावणं देखील आवश्यक आहे.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.