सामाजिक

उतारमतवाद्यांची शोकांतिका

वर शिर्षकात मी ‘उतारमतवादी’ हे काही चुकून लिहिलेले नाही. ज्या उदारमतवाद्यांचा वैचारीक गाडा हा एखाद्या उतारावरुन घसरत जावा तसा आपला घसरत चाललेला असतो, त्यांस मी ‘उतारमतवादी’ असे म्हणतो. कारण अशा उतारमतवाद्यांस ‘उदारमतवादी’ म्हणनं म्हणजे ‘उदारमतवादी’ या शब्दाची किंमत कमी करण्यासारखं आहे. एखाद्या गोष्टीचा साकल्याने, सम्यकतेने, न्याय दृष्टीने विचार करण्याइतकी उतारमतवाद्यांची बौद्धिक पात्रता नसते. केवळ एकांगी विचारांचे तुणतुणे वाजवत राहणे हाच एकमेव कार्यक्रम या उतारमतवाद्यांच्या विषयपत्रिकेवर अस्तित्त्वात असतो. पण हे उतारमतवादी समजून उमजून धादांत खोटं बोलत राहतात अशातला काही भाग नाही. तथाकथित विद्वान उतारमतवादी हे बव्हांशी सत्यच सांगत असतात. पण ते संपूर्ण सत्य कधीच मांडत नाहीत आणि अर्धसत्याचा अंत हा शेवटी शोकांतिकेत होतो हा निसर्गनियम आहे. कारण कोंबडा झाकला म्हणून उजडायचं रहात नाही.

स्वातंत्र्योत्तर बहुतांश समाज हा अशिक्षित होता. त्यामुळे सहाजिकच त्यांच्यात आत्मविश्वास नव्हता. त्याकाळात शिक्षण घेतलेली जी पहिली पिढी अस्तित्त्वात आली, त्या पिढीत अशा उतारमतवाद्यांचे प्रमाण हे प्राबल्याने दिसून येते. आपण ज्या अशिक्षित समाजातून आलो आहोत, त्या समाजाची हेटाळणी केली की, आपण लगेच कोणीतरी महान बनतो, असे एक सरळसोपे सुत्र उतारमतवाद्यांच्या हाती लागले. आणि मग ते आपले अर्धवट ज्ञान महान तत्त्ववेत्याच्या आव आणून प्रसारमाध्यमांतून पाजरायला लागले. स्वातंत्र्यानंतर ५०-६० वर्षं त्यांचा हा व्यवसाय चांगला बिनबोभाट चालला होता. पण हळूहळू काळ बदलत गेला. समाजातील सुशिक्षित लोकांचे प्रमाण वाढत गेलं. शिकलेली नवी पिढी ही स्वतंत्रपणे विचार करण्यास सक्षम होती. प्रसारमाध्यमांत वावरणारी प्रत्येक व्यक्ति बुद्धिवंत नसते हे एव्हाना समाजास कळून चुकलं होतं. आजकाल अशा उतारमतवाद्यांच्या सर्वत्र होणार्‍या हेटळणीत आपणास त्याचे प्रतिबिंब दिसते.

मी आपल्याला एक उदाहरण देतो. समजा सोम्या आणि गोम्या नावाची दोन भावंडे आहेत. आता या सोम्याचा उतारमतवादी बाप त्याचं वर्णन कसे करेल? सोम्या सकाळ संपायला आली तरी उठत नाही, दोन-दोन दिवस आंघोळ करत नाही, घरातलं एकही काम करत नाही, इत्यादी. पण हाच उतारमवादी बाप सोम्याला कोणतंही व्यसन नाही, तो कोणाशीही भांडण करत नाही, तो कधीही नापास होत नाही, यावर एक चकार शब्दही काढणार नाही! सोम्याच्या नकारात्मक बाबी सर्वांसमोर सतत बरळत राहणं हा त्या उतारमतवादी बापाचा एककलमी कार्यक्रम असतो. इकडे गोम्याने काहीही कारण नसताना केवळ कुरापत म्हणून सोम्याच्या थोबाडात जरी लावली, तरी तो बाप त्याबाबत गोम्याला चकार शब्दाने बोलत नाही. उलट तू मोठा आहेस, तू त्याला सांभाळून घेतलं पाहिजेस म्हणून सोम्यालाच धारेवर धरुन त्यास दुषणे देत राहतो.

केवळ वाईट गोष्टींवरच बोट ठेवत राहण्याची उतारमतवद्यांची जी वृत्ती आहे, तीच अखेर त्यांचा घात करणार आहे. कारण सोम्या जेंव्हा शिकून मोठा होईल, तेंव्हा कोण किती पाण्यात आहे ते त्याला कळेलच! आपल्या समाजातील नकारात्मक बाबी या समोर आणल्याच पाहिजेत. पण त्या बाबी समोर आणत असताना आपल्याच समाजाला तुच्छ लेखून काय साध्य होणार आहे? उलटकरणी त्या समाजात आत्मविश्वास बाणवण्यासाठी त्यात जे काही गुण आहेत, त्याचं योग्य प्रसंगी योग्य शब्दांत मनःपूर्वक कौतुक केलं पाहिजे! आणि आपणही त्याच समाजाचा एक घटक आहोत, हा समाज म्हणजे आपलेच एक विस्तृत कुटूंब आहे, याची उतारमतवाद्यांसहीत सर्वांनीच जाण ठेवली पाहिजे.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.