आयुष्य

आयुष्य पहावे आजमावून!

आयुष्य म्हणजे विचारांचा एक प्रवाह. समोर आल्या-गेल्या प्रसंगातून बरे-वाईट बहुरंगी विचार माणसाच्या मनात व पर्यायाने शरीरात उमटत राहतात. बहुतांशी विचारांतून तसे साध्य काही होत नाही, पण मनात व मनास वाहिलेल्यास थांबवणार कोण!?

रोज सूर्यास्ताची वेळ येते, तेंव्हा असा हा मोकळा सायंवारा आपल्यासोबत ओळखीचेच पण आतून कुठेतरी अनोळखी आवाज अलवरपणे घेऊन येतो. या आवाजात जीवनाचे निरनिराळे रंग घुमत असतात. कोणी बालपणात बागडत असतो, तर कोणी नव्या उमेदीने विवाहबंधनात अडकत असतो. आपले स्वतःचे मनातल्या मनात काहीतरी वेगळेच चालू असते, पण तरीही आपण दूरवरून येणाऱ्या या आवाजांत हळुवारपणे कुठेतरी चारक्षण सामील होतो.

कोणाच्या प्राक्तनात काय? ते कोणास ठाऊक! इथे प्रत्येकजण स्वतःच्या जीवावर आपले आयुष्य आजमावतो आहे. जिथे आयुष्याचा ‘थांग’ लागत नाही, तिथे तो आपल्या अस्तित्त्वाचा ‘पत्ता’ शोधतो आहे. आयुष्याच्या जुगारात प्रत्येकाला काही वेळ मिळाला आहे. आता आपल्या आयुष्यात काय लिहून ठेवले आहे, ते आयुष्य आजमावल्याशिवाय कसे कळणार!? या प्रवासात तसे एका दृष्टीने सारेच हतबल.. आपणच आपणास समजून घ्यावे आणि पुढे चालत रहावे..!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.