राँग नंबर लावणार्या लोकांचं मला काही कळतच नाही! परवादिवशी मला एका अनोळखी नंबर वरुन फोन आला. मी थोडा वेळ वाट पाहिली.. पण जेंव्हा ‘ट्रू कॉलर’ हात हलवत परत आला, तेंव्हा मी नाईलाजाने फोन उचलला.
‘हॅलो अक्षय आहे का?’, साधारण एका खेडवळ मध्यमवयीन बाईचा तो आवाज वाटत होता.
मी म्हटलं, ‘नाही.. राँग नंबर’.
पण एव्हढ्यावरच संवाद थांबवेल ती राँग नंबर करणारी व्यक्ति कसली? राँग नंबर लावणार्या लोकांच्या परंपरेचा आदर राखत अपेक्षेप्रमाणे त्या बाईने पुढचा प्रश्न विचारला,
‘मग कोणाचा नंबर आहे हा? तुम्ही कोण बोलता?’, हा प्रतिप्रश्न ऐकून असा वैताग येतो म्हणून सांगू.. डोक्यावरील उरलीसुरली केसं देखील उपटून टाकाविशी वाटातात. अरे मी कोण बोलतोय? त्याच्याशी तुमचं काय देणं घेणं आहे!? एकदा राँग नंबर आहे म्हणून सांगितलेलं कळत नाही का?
पण तरीही मी संयम बाळगतो.. त्यांस कदाचित कळालं नसेल.. असं स्वतःला समजावून सांगतो.. आणि मग त्यांस ते लक्षात आणून देण्याच्या दृष्टीने शक्य तितका आदर दाखवत मी त्यांस परत एकदा विचारतो,
‘आपल्याला कोण पाहिजे?’
‘नाही.. मला अक्षय पाटीलशी बोलायचं होतं.. तुम्ही कोण बोलता!?’, जणू मी त्यांस काही बोललोच नाही.. त्यांनी काही ऐकलंच नाही.. आमचा संवाद कधी झालाच नाही..! इतक्या साळसूदपणे ते पुन्हा मीच मूर्ख असल्याचं माझ्याच लक्षात आणून देतात व तोच प्रश्न पुन्हा वाक्यरचना बदलून विचारतात!
हे म्हणजे आता अतीच झाले आहे! अशा लोकांना मी अगदी वैतागलो आहे!
मी म्हटलं, ‘मी ‘ओबामा मामा’ बोलतोय! बोला.. काय काम आहे तुमचं?’
परवाच वॉट्सअॅपवर कॉलिंगची नवीन सोय सुरु झाली! ते मी पाहतोय ना पाहतोय इतक्यात माझ्या कॉलेजमधल्या एका कंजूष मित्राचा वॉट्सअॅपवरुन फोन आला. फोन केल्या केल्या दरवेळी याचा पहिला प्रश्न हा ठरलेला असतो, ‘हॅलो! कुठं हाय?’. जणू मी काहीही कामधंदा करत नाही, हेच त्याला त्यातून सुचवायचं असतं! पण खरं तर मी कुठे आहे? याच्याशी याच्या कामाचं काहीएक देणंघेणं नसतं! ‘कुठं हाय?’ ‘भारत मॅच हरला आज!’, ‘कुठं हाय?’ ‘सेन्सेक्स पडला आज!’, ‘कुठं हाय?’ ‘गाडी सर्व्हिसिंगला टाकली!’. जणू त्याला म्हणायचं असतं, ‘अरे जग कुठं चाललं अन् तू ‘कुठं हाय!?’’.
‘मी नवी दिल्लीत आहे!’, मी वैतागून म्हणालो, ‘अरे.. कुठे का असेना! तू बोल ना तुझं काय काम आहे ते?’.
‘अरे काय नाय.. वॉट्सअॅपवरुन कॉलिंग सुरु झालंया.. ते बघावं म्हटलं फोन करुन!’, हे तर मला माहितच होतं!
‘आवाज एकदम स्पष्ट आहे.’, मी म्हणालो.
‘हो.. चांगलं हाय.. आता याच्यावरुनच फ्री कॉल करायचा!’, तो अगदी उत्तेजित होता.
‘पण आवाज एक सेंकंदाने लॅग होतोय.. तू जे बोलतोय ते मला १ सेकंद उशीराने ऐकू येतंय..’, मी जे आहे ते प्रामाणिकपणे सांगितले.
‘अरं असू दे की मंगऽ! आपल्याला तर कुठं गडबड हाय?’, तो चटकन् म्हणला, ‘तू नुसतंच तिकडून अर्धा तास बोलत राहिलास तरी चालतंय आपल्याला.. मी इकडं ऐकत बसतो!’
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.