तसं माझी कोणाला काळजी असण्याचं काही कारण नाही, पण मनास उत्सुकता लागून राहू नये म्हणून आधीच स्पष्ट करतो की, मला स्वतःला काही ‘फुड पॉयझनिंग’ झालेलं नाही. पण जन्मास आलेली व्यक्ती ही काहीतरी खात राहणार, तेंव्हा तिस पोटविकाराचा अनुभव हा असणारच!
घरच्या जेवणाने ‘फुड पॉयझनिंग’ झाल्याचे कधी ऐकण्यात आलेले नाही. पण रस्त्यावरील पदार्थ खाण्यापूर्वी मात्र काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यावर ‘पाणी-पुरी’ खाण्याची फॅशनच मध्यंतरी उदायास आली होती. आता हे ‘पाणी-पुरी’ विकणारे लोक असायचे कोण? तर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी उत्तर भारतातून आलेले परप्रांतिय लोक! या लोकांना इथल्या संस्कृतीशी, स्थानिक लोकांशी अथवा त्यांच्या आरोग्याशी काहीएक देणंघेणं नसायचं. त्यामुळे ते राखत असलेल्या स्वच्छतेचा विचारच न केलेला बरा! पण आता विचारच न केलेला बरा म्हटलं की, काहीच विचार न करता पुन्हा तिथे ‘पाणी-पुरी’ खाण्यास जाण्याचे कारण नाही. अशा ‘पाणी-पुरी’ वाल्यांच्या स्वच्छतेचे किस्से अनेकांनी ऐकलेले असतात. पण चिभेला चव नाही आणि हौसेला मोल नाही! आपणच स्वच्छतेचा आग्रह धरत नाही, तेंव्हा परप्रांतियांना देखिल स्वच्छता पाळण्याची गरज वाटत नाही.
कोणी स्वच्छतेचा आग्रह धरत असेल, तर त्यास ‘नाजूक’ म्हणण्याची आपल्या इथल्या लोकांना एक अतिशय वाईट सवय आहे. घाण रहाणं, घाण खाणं यास मोठ्या शौर्याचे व मजबूतीचे लक्षण मानले जाते. खरं तर ते शौर्याचंच लक्षण म्हणायला हवं, पण असलं शौर्य गाजवत असताना ‘वीर मरण’ आलं, तर करणार काय? माझ्या एका मित्राला रस्त्यावरील पाणी-पुरी खायला आवडते. मी देखील त्याच्याबरोबर पाणी-पुरी खावी असा त्याचा आग्रह असायचा. मी त्यास नकार दिल्यास ‘नाजूक’ म्हणून माझी गणना झालीच म्हणून समजायचे! पण असल्या मूर्खपणाच्या हेटळणीपुढे मी कधी मूर्खासारखं झुकत नाही. कॉलेजला असताना बाहेरचं खाणं मला भाग होतं, पण आता मी रस्त्यावरचं व एकंदरीतच बाहेरचं खाणं हे जवळपास बंद केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत मात्र बाहेर खाण्याला इलाज नसतो.
लग्नाच्या पंगतीतील अस्वच्छता पाहून तर कोणाच्या लग्नाला जावेसे देखील वाटत नाही. तिथे तर मोठीच बिकट परिस्थिती उद्भवते. पहिली पंगत उठल्यानंतर ताटं विसळतात न विसळतात तोच त्या खरकट्या ताटात खाण्यास दुसरी पंगत बसलेली असते. आपण समोरच्याला खरकटं ताट देत आहोत, याची किंचीतही लाज ताट देणार्यास वाटत नाही. तेंव्हा आपण खरकट्या ताटात खात आहोत, याची थोडीतरी लाज कमीतकमी खाणार्यास तरी वाटावी की नको!? आसपास पाहिले असता, कोणास त्याचे काही सोयरसुतक नसते. लग्नास आलेली तथाकथित ‘स्टँडर्ड’ माणसेदेखील यात सामिल असतात. आता लग्नाला गेलं म्हणजे ‘जेवन करुनच जा!’ हा दूराग्रह! समोर वाढलेल्या खरकट्या ताटातील अन्न खाववतही नाही आणि ते ताट तसेच ठेवून उठून जाऊ देखील शकत नाही, तेंव्हा माणूस अगदी कचाट्यात सापडतो. लग्नामध्ये पूर्वी पत्रावळ्या वापरत असत, ती पद्धतच अतिशय योग्य होती. आजच्या काळाचा विचार करायचा झाल्यास ‘यूज अँड थ्रो’ ताटे, वाट्या वापरायला काय हरकत आहे? त्यामुळे खाद्यपर्थांच्या अस्चच्छतेस केवळ परप्रांतियच जबाबदार आहेत, असं मानण्याचं काही कारण नाही, आपणही फार स्वच्छता पाळत नाही.
रस्त्यावरील फास्टफुडच्या जमान्यात केवळ मराठी माणसालाच नव्हे, तर महाराष्ट्राला देखील ‘फूड पॉयझनिंग’ होऊन पोटविकार झाल्यास नवल ते वाटायला नको. पण करणार काय? आपली काळजी ही आपण स्वतःच घेतली पाहिजे. तेंव्हा माझी सर्वांना विनंती आहे की, बाहेर सार्वजनिक जीवनात वावरत असताना स्वच्छतेचा आग्रह धरा! अगदीच नाईलाज असेल तर ठिक आहे, पण ‘असंच असतं’ म्हणून केवळ जिभेचे चोचले पुरविण्यास वेळ मारुन नेऊ नका.
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.