तन्मय भटने सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर यांच्यावर विनोद करण्याचा जो प्रयत्न केला, त्यामुळे सध्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. अशाप्रकारचे प्रसंग व मुद्दे गुंतागुंतीचे असतात व प्रत्येकजण आपापल्यापरिने त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे हा प्रसंगही असाच काहीसा गुंतागुंतीचा आहे. तेंव्हा या लेखाच्या माध्यमातून मी माझ्या दृष्टिकोनातून त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होईल अशी आशा आहे.
तन्मय भट हे इंटरनेटवर वावरणार्या तरुण पिढीस सुपरिचित असे नाव आहे. तो एक ‘स्टँड अप कॉमेडिअन’ आहे, ज्याचे युट्यूबवर AIB नावाचे एक प्रसिद्ध चॅनल आहे. AIBचे विनोद हे केवळ व्यक्तिंवर असतात असे नाही, तर ते प्रवृत्तींवर देखील विनोदाद्वारे प्रहार करतात. मला स्वतःला एखाद्या विशिष्ट व्यक्तिवर केलेले विनोद तितकेसे मनोरंजक वाटत नाहीत. तरी Honest मालिकेतील चित्रफितींच्या माध्यमातून त्यांनी ज्या सुप्त प्रवृत्तींचे दर्शन घडवले आहे, ते मात्र निश्चितच झोपेचे सोंग घेतलेल्या प्रामाणिकतेला गुदगुल्या करणारे आहे. त्यामुळे AIBचे लोक अजिबात विनोदी नाहीत, असे म्हणने चूकीचे ठरेल. इतरांप्रमाणेच त्यांचे काही विनोद खळखळून हसवणारे असततात, तर काही विनोद हे अगदी कंटाळवाणे असतात.
मात्र तन्मयनने सचिन व लताताई यांची जी खिल्ली उडवली त्यात काही ‘विनोदी’ वा ‘कंटाळवाणे’ होते असे मला वाटले नाही. तो एक मूर्खपणातून केलेला ‘फाल्तूपणा’ होता असेच म्हणावे लागेल. मी त्याचे ट्विटरवर अनुसरण करतो, त्यामुळे या चित्रफितीमागे त्याची नेमकी भावना काय असावी!? याचा मला साधारणतः अंदाज आहे. आपल्या भारतातील लोक एखादा विनोद किती जिव्हारी लावून घेतात, हे बहुदा त्याला सिद्ध करायचे होते. त्याचा हा मुद्दा कदाचित बरोबर असेल, मात्र तो त्याने अगदीच चुकीच्या पद्धतीने मांडला. त्यामुळे त्याचा हा तथाकथित विनोद अगदी मोकळ्या मनाच्या प्रगल्भ लोकांनाही रुचला नाही! हेच त्याचे अपयश असून तीच त्याला मिळालेली शिक्षा देखील आहे.
वैचारिक विनोद हा थेट मानवी हृदयाला हात घालतो व बघता बघता त्याचे हृदयपरिवर्तन करतो. म्हणूनच विनोद हे समाजपरिवर्तनाचे एक धारदार माध्यम आहे असे मी मानतो. त्यामुळे कोणतीही चळवळ व्यंगचित्रकाराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशी माझी भावना आहे. हे सांगत असतानाच विनोदकारांचीही समाजाप्रती लेखकांइतकीच महत्त्वाची जबाबदारी आहे हे लक्षात यावे. जो काहीही लिहिल तो लेखक नव्हे! आणि जो काही करुन हसवू पाहिल तो विनोदकार नव्हे! आता हा दर्जा कसा सांभाळायचा!? हे प्रत्येकाच्या व्यक्तिगत प्रगल्भतेवर अवलंबून आहे.
एक समाज म्हणूनही आपण आपल्या प्रगल्भतेचा विचार करायला हवा. एखादी गोष्ट जेंव्हा आपणास आवडत नाही, तेंव्हा त्या गोष्टीचा निषेध नोंदवण्याचे आजच्या जगात अनेक मार्ग आहे. तन्मयचे हसे उडवून, त्याच्यावर टिका करुन, त्याचे YouTube चॅनल Unsubscribe करुन आपणास सहजतेने निषेध नोंदवता आला असता, आणि त्याच्यासाठी तेव्हढे पुरेसे होते. परंतु याप्रसंगी त्यास धमकी देण्याची काही आवश्यकता होती असे मला वाटत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उत्तर हे सहसा अभिव्यक्ती स्वातंत्र्यानेच द्यायला हवे! अर्थात त्यासाठी अत्यंत प्रगल्भ समाज घडवण्याची आवश्यकता आहे. समाजाला स्वतःबद्दल इतका आत्मविश्वास हवा की कोणी त्याच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला, तर एक तर त्याने त्यास खिजगणतीत धरु नये वा स्वतःचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरुन त्यास चोख उत्तर द्यावे.
‘Unlimited Free Speech Plan’ हा ‘Fair Use Policy’ सोबत येतो. ही ‘Fair Use Policy’ काय असावी!? ते प्रत्येकाने आपापली नैतिक जबाबदारी ओळखून ठरवायला हवे. ‘फाल्तू’ ते ‘महान’ अशा फूटपट्टीवर लोकांनी आपणास कुठे पहावे!? या प्रश्नाचे उत्तर ज्याने त्याने स्वतःसाठी ठरवायचे असते. हीच अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मर्यादा आहे.
जे जे परदेशी ते ते चांगले, असे समजण्याचे काही कारण नाही. परदेशी विनोद प्रकाराचे जमत नसताना अंधानुकरण केल्याने कशी फसगत होते!? याचा धडा तन्मयने यातून घेतलाच असेल! सचिन व लताताई ही जागतिक स्तरावरील व्यक्तिमत्त्वे आहेत. त्यांची खिल्ली उडवल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वास यत्किंचितही तडा जाणार नाही, उलट जो व्यक्ति त्यांची खिल्ली उडवेल त्याचे व्यक्तिमत्त्व मात्र ढासळेल हे नक्की! तन्मयच्या अनुषंगाने ही गोष्ट अधोरेखित झाली.
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.