सामाजिक

शिवराय व महाराष्ट्र धर्म

युगपुरुषांचे विचार हे शाश्वत सत्यावर आधारलेले असतात आणि म्हणूनच ते अनादीअनंत काळापर्यंत चिरतरुण राहतात. त्यांस काळाच्या मर्यादा नसतात.. ते कालबाह्य होत नाहीत. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे वलयही असेच साक्षात काळाला नामोहरम करणारे आहे. सर्वसामान्यांच्या हृदयात त्यांचे दिशादर्शक स्थान धृवतार्‍याप्रमाणे अढळ आहे. त्यांनी निर्माण केलेला स्फुर्तीचा झरा आज अनेक शतके उलटूनही रोमारोमांत अखंड वहतो आहे. एखाद्या दंतकथेतील नायकास शोभावेत असे शिवरायांचे एक एक पराक्रम असले, तरी त्यांस महाराष्ट्राच्या प्रगतिशील भूमीत देवत्त्व प्राप्त झाले नाही. ही एक लक्षात घेण्याजोगी चांगली गोष्ट आहे, कारण त्यामुळे प्रत्येक मराठी माणसास ते खर्‍या अर्थाने आपलेसे वाटतात. शिवरायांची प्रेरणा सोबत असल्याने मराठ्यांनी आपले भविष्य दैवावर सोपवले नाही, तर त्यांनी त्यास स्वतः आकार दिला. आज शिवजयंती साजरी करत असताना, शिवरायांचे गुणही अंगीकारण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत.

महाराष्ट्रातील संतांनी महाराष्ट्र धर्माची शिकवण येथील लोकांस दिली असली, तरी ‘महाराष्ट्र धर्म’ हा खर्‍या अर्थाने महाराष्ट्रातील सामान्यातील सामान्य जनमानसात छत्रपती शिवाजी महाराज यांनीच रुजवला. मानवता हा धर्म सर्वोत्तम मानला तरी तो केवळ करुणेवर आधारीत आहे. करुणाप्रधान मन हे सिमित दृष्टिकोनातून प्रसंगी योग्य हीताचा निर्णय घेऊ शकेलच असे नाही. ‘महाराष्ट्र धर्म’ हा मात्र शाश्वत मूल्यांवर आधारीत व्यापक दृष्टीकोनातून समान न्यायाची शिकवण देतो. प्रसंगी कठोर व्हावे लागले, तरी महाराष्ट्र धर्माचे पालन करणार्‍या मनात कटूता नसते. विश्वाचे सर्वोत्तम हीत हाच त्याचा अंतस्तः हेतू असतो. महाराष्ट्र धर्म हा आपला वारसा असून अशी शाश्वत मूल्ये असणार्‍या धर्माचा विसर जर मराठी लोकांस पडला, तर ती मराठी समाजाची मोठीच शोकांतिका ठरेल.

गेल्या शतकात मराठी लोकांचे खच्चीकरण करण्यात आले. भारताच्या राजकारणातील त्यांच्या खर्‍या स्थानावरुन त्यांस बेदखल केलं गेलं. महाराष्ट्र धर्माची प्रगतिशील, शाश्वत विचारसरणी बाळगणार्‍या मराठी लोकांस बाजूला करुन, त्यांस दुय्यम स्थान देऊन खरं तर भारतास प्रगत राष्ट्र करणे केवळ अशक्य आहे. पण महाराष्ट्राच्या समृद्ध ईतिहासाचा, वारशाचा हेवा करणारे लोक प्रत्यक्ष ईतिहासातूनच त्यांचे स्थान पुसून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत. शालेय पाठ्यपुस्तकांतून मराठ्यांचा ईतिहास शिकवला जात नाही. मराठी मुलांना त्यांच्या पूर्वजांची कर्तबगारी, शौर्य व उदारता समजू नये.. त्यांस आपला खरा वारसा, आपले खरे स्थान कळू नये व त्यायोगे मराठी मुलांमध्ये स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण व्हावा हाच त्यामागचा अंतस्थः हेतू असावा. दूर्देवाने तो साध्यही होताना दिसत आहे. आज प्रत्यक्ष सातार्‍यात राहणार्‍या मुलाला देखील ‘मराठा सम्राज्य’ हे नावालाही माहित नसते. मराठ्यांच्या ईतिहासाचे कोणतेही उदात्तीकरण न करता तो जसा आहे तसा महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तकांमधून शिकवला गेला पाहिजे. पण आज याचा कोणी साधा उल्लेखही करताना दिसत नाही. सर्वांनाच आपल्या ईतिहासाचा विसर पडत चालला आहे.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.