सामाजिक

सौर ऊर्जेचा वापर

मला अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांची आवड आहे. अपारंपारिक माध्यमातून ऊर्जा मिळवल्याने पैसे तर वाचतातच, पण सोबत पर्यावरणाची देखील हानी होत नाही. त्यामुळे मला वाटतं यापुढे केंद्र व राज्य सरकारने सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अशा अपारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर करायला हवा. नरेंद्र मोदी या दृष्टीने काही चांगली पावलं उचलत आहेत. पण त्यांचं काय जे असतं, ते सर्वप्रथम गुजरातसाठी असतं.

नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या राज्यात एक चांगली कल्पक योजना राबवली होती. शेतीला पाणी पुरवण्यासाठी जे पाटबंधारे असतात, त्यावर त्यांनी सोलार पॅनेल बसवले होते. यामुळे एकाच वेळी अनेक गोष्टी साध्य झाल्या. पाण्याचे बाष्पिभवन होणे टळले, सोलार पॅनेल बसविण्यास अतिरीक्त जागा शोधावी लागली नाही आणि त्यातून विजेची निर्मिती झाली. अशाप्रकारच्या योजना या आता देशभर राबवण्याची गरज आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने मोठी गुंतवणूक करणार असल्याची बातमी मी अलीकडेच वाचली होती. पण गुंतवणूक होणार्‍या राज्यात दूर्देवाने महाराष्ट्राचा समावेश नव्हता.

मी स्वतः एक सौर दिवा मागील दीड वर्षांपासून वापरत आहे. रात्री झोपताना घरात पूर्ण अंधार करुन शक्यतो कोणी झोपत नाही. प्रत्येक घरात एक छोटा दिवा सुरु असतो. आमच्या घरातील हा छोटा दिवा सूर्याच्या उर्जेवर चालतो. दिवसभर आम्ही तो दिवा चार्ज करतो आणि अंधार पडल्यानंतर मधल्या पॅसेजमध्ये तो लावलेला असतो. एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर तो दिवा अगदी ४८ तास चालतो! आपणही ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन अशाप्रकारचा दिवा विकत घेऊ शकता. असा दिवा हा साधारणपणे १५०० रुपयांना मिळतो. महाराष्ट्रातील सर्व लोक रात्रीच्या वेळी असा सौर दिवा लावू लागले, तर कल्पना करा आपली किती ऊर्जा वाचेल! किती पैसे वाचतील! आणि शिवाय पर्यावरण रक्षणासही आपला हातभार लागेल.

सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी सुरुवातीस थोडी अधिक गुंतवणूक करावी लागते आणि त्यामुळेच सौर उर्जेचा आणखी म्हणावा तितका प्रचार झालेला नाही. पण हळूहळू चित्र पालटू लागले आहे. खिडकीतून सहज बाहेर नजर फिरवली असता आसपास अनेक घरांच्या छतावर ‘सोलार वॉटर हिटर’ आढळून येतात. मी कॉलेजला असताना मी जिथे रहायचो तिथे देखील अशा सोलार वॉटर हिटरचा वापर केला जायचा. सोलार वॉटर हिटरच्या माध्यमातून अगदी पावसाळ्यातही चांगले गरम पाणी मिळते, तेंव्हा उन्हाळ्यात तर विचारुच नका!

माणसाची उर्जेची गरज ही दिवसेंदिवस वाढतच आहे. भविष्यात सौर तंत्रज्ञान जेंव्हा अधिक कार्यक्षम व स्वस्त होईल तेंव्हा लोक आपणहूनच हे तंत्रज्ञान आपलंसं करतील. त्यावेळी सर्वसामान्य माणसाच्या जीवनमानात खूप सुधारणा होईल.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.