आयुष्य

विश्वासाची दिशा

जीवन म्हणजे एक अनोळखी प्रदेश. कोठेही न हरवता या अगम्य प्रदेशाची वाट तुडवायची झाल्यास जाणत्या वाटसरूचे दिशादर्शन अगत्याचे ठरते. पण जेंव्हा कधी माणसाला हरवल्यासारखे वाटते, तेंव्हा प्रत्येकवेळी त्याच्या आसपास कोणी विश्वासाचं असेलच असे नाही. अशावेळी त्यास स्वतःच्या हिमतीवर आयुष्याची अज्ञात वाट धुंडाळावी लागते.

पूर्वी प्रत्येकाच्या आयुष्याचे धोपटमार्ग तसे ठरलेले असत. पण आज मानवी आयुष्याचे क्षितिज विस्तारलेले आहे. इथे प्रत्येकजण एखादे नवे क्षेत्र पादाक्रांत करू पहात आहे. ओळखीची माणसे दिशा दाखवण्यात कमी पडतात, तेंव्हा अनोळखी माणसांकडून वाटा जाणून घ्याव्या लागतात. अशावेळी परस्पर विश्वासाचे मोल अधिक वाढते. विश्वास ही एक अशी जोखीम असते, जी माणसाला स्वतःच्या जबाबदारीवर उचलावी लागते.

दुसऱ्याप्रती सदिच्छा बाळगणारी प्रामाणिक तज्ञ माणसे सूक्ष्मतेने हेरावी लागतात. अशी माणसे दुर्मिळ असल्याने ती मिळेपर्यंत अनेकदा प्रतारणा भोगावी लागू शकते. पण केवळ प्रामाणिक माणसेच आपणास विश्वासाची दिशा दाखवू शकतात. एकदा नेमकी दिशा अवगत झाल्यानंतर आपण आपल्या वाटेवर आत्माविश्वासाने व चैतन्याने चालू शकतो. मानवी आयुष्य पहिल्यापासून अखेरपर्यंत परस्परावलंबी आहे. तेंव्हा एखाद्याच्या आयुष्यातील प्रामाणिक दीपस्तंभ बनून त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे प्रत्येक माणसाचे नैतिक कर्तव्य आहे.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.