आयुष्य

एकाग्रता हा यशप्राप्तीचा गाभा

प्रत्येकजण आयुष्याकडे निरनिराळ्या दृष्टीकोनातून पहात असतो व त्यानुसार यशाची आपापली व्याख्या ठरवत असतो. ‘यश कसे मिळवावे?’ या प्रश्नाच्या उत्तरादाखल आजवर असंख्य पुस्तके लिहिली गेली आहेत, व्यख्याने देण्यात आली आहेत. त्यातून यशप्राप्तीमागील निरनिराळे पैलू उलगडले गेले असले, तरी या सर्व पैलूंमध्ये असा एक पैलू आहे जो यशप्राप्तीचा गाभा आहे.

आयुष्यात ‘एकाग्रता’ असल्याशिवाय माणूस आपले इच्छित ध्येय गाठू शकत नाही. कोणत्याही यशामागे ‘एकाग्रता’ केंद्रस्थानी आहे. एखादी व्यक्ती किती एकाग्र आहे? त्यावर त्या व्यक्तीचे यश-अपयश अवलंबून असते. त्यामुळे यशस्वी माणसामध्ये सर्वप्रथम ‘एकाग्रता’ असावी लागते. एकाग्र चित्तातूनच यशासाठी आवश्यक असे इतर गुण खुलत जातात. म्हणूनच आयुष्यात जर यश मिळावायचे असेल, तर सर्वप्रथम एकाग्रतेचा ध्यास धरणे अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे.

एकाग्र व्यक्ती एका निश्चित दिशेने चालत राहते, याउलट एकाग्रतेअभावी अनेकजण आयुष्यभर निरर्थक भटकत राहतात. आयुष्यात न हरवता जर आपल्याला योग्य दिशेने मार्गस्थ रहायचे असेल, तर त्यासाठी एकाग्रतेची कास धरायला हवी. एकाग्रतेचे रहस्य हे चांगल्या सवयींमध्ये दडलेले आहे. चांगल्या सवयी जोपासायच्या असतील, तर त्यासाठी रोजचा शिरस्ता हवा. एखादी चांगली गोष्ट आपण न चुकता वर्षानुवर्षे नित्यनियमाने करायला हवी. ‘थेंबे थेंबे पाणी साठे’ या उक्तीप्रमाणे रोज सातत्याने केलेली चांगली गोष्ट पुढे आपल्या अस्तित्त्वाचा भाग बनते व आपल्याला उत्कर्षाकडे घेऊन जाते.

जप, ध्यानधारणा, व्यायाम, योग्य आहार, वेळेचे पालन या अशाच काही चांगल्या गोष्टी आहेत. प्रत्येकाने आपल्या स्वभावानुसार व परिस्थितीनुसार स्वतःचा परिपाठ आखावा व त्यातून एकाग्रता साध्य करावी. कारण प्रत्येकाचे यश हे निरनिराळे असले, तरी ते अखेर एकाग्रतेतच दडलेले आहे.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.