आज सकाळी मला एक स्वप्न पडलं. त्यात कॉलेजने सगळ्या इव्हेंटचं अगदी बारिक-सारिक सविस्तर रेकॉर्डिंग केलं होतं. या रेकॉर्डिंगचं वैशिष्ट्य असं होतं की, मी आणि कोणीही त्यात शिरुन पुन्हा ते इव्हेंटचे दिवस आहेत तसे जगू शकणार होतो. जाग आली! स्वप्न संपलं! हे स्वप्न होतं हे समजल्यानंतर मनाला थोडीशी हुरहुर वाटली. सुंदर स्वप्नातून जाग आली की, बेकार वाटू लागतं.. आणि रात्री भुताच्या स्वप्नातून जाग आली की वाटतं, बरं झालं हे स्वप्न होतं! तर माझ्या या स्वप्नावरुन मला माझ्या मित्राचं स्वप्न आठवलं, ते स्वप्न मी इथे सांगत आहे.
कधी नव्हे ते वर्षाभराचा आभ्यास परिक्षेच्या आदल्या दिवशी उरकून तो खूप दमला होता. बरं! ‘मायक्रोकंट्रोलर’ नावाचा हा विषयही असा नव्हता की वर्षभराचा सर्व आभ्यास एका रात्रीत संपेल.. त्यामुळे विषय उरकला असंच म्हणावं लागेल. अपेक्षेप्रमाणे त्याला तो विषय तसा तळ्यात-मळ्यातच गेला. कधी नव्हे ते अनेक महिन्यांमधून सलग इतके तास आभ्यास करण्याचं दिव्य त्याने पेललं होतं. कारण याआधी गचकलेल्या अनेक विषयांपैकी एखाद-दुसर्या विषयाचा असा आभ्यास त्याने केला असेल, तर तो कदाचीत सहा महिन्यांपूर्वी मागच्या सेमलाच!
परिक्षेहून आल्यानंतर तो थोडासा हताश होता. मेंदूने इमरजन्सी मध्ये तरी किती काम करावे! तो आता थोडासा दमलाही होता. केवळ एका दिवसात त्या एका विषयाचा त्याच्यावर एव्हढा मारा झाला होता की, त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही निरनिराळे प्रोग्रॅम व कोड घुमत होते! अशाने घरी येऊन पडल्या पडल्या थकलेल्या विचारांत कधी झोप लागली, ते त्यास स्वतःला देखील समजलं नाही.
जैतापूरच्या नवनिर्मित अणुप्रकल्पात काही मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. कितीही मोठे तंत्रज्ञ आणले, शास्त्रज्ञ बोलावले तरी पेचप्रसंग काही सुटण्याचं नाव घेत नव्हता. तिथे प्रकल्पावर काम करणारे सगळेच हैराण झाले, त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच याबाबत काहीतरी उपाय करण्याबाबत गळ घातली. मुख्यमंत्रीही चिंताग्रस्त झाले. त्यांनी आपल्या सचिवांना याबाबत विचारलं. तेंव्हा त्याने त्यांस काही सल्ला दिला आणि ही समस्या सोडवू शकेल अशा केवळ एकाच माणसाला आपण जाणत असल्याचे सांगितले.
एक दिवस एक हेलिकॉप्टर वार्याला थाड-थाड कापत कराडमध्ये उतरलं. त्यातून मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हान उतरले. उतराच त्यांनी याचं (माझ्या मित्राचं) घर कुठे आहे म्हणून आसपासच्या लोकांना विचारलं. पत्ता शोधत शोधत ते त्याच्या घरी पोहचले. हा त्यांना पाहून अगदी आश्चर्यचकित झाला! तेंव्हा त्यांनी त्याला आपल्या येण्याचं कारण सांगितलं आणि काही करुन अणुप्रकल्पात निर्माण झालेली समस्या सोडवण्याची गळ घातली. याने त्यांना आपल्यापरिने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि मग दोघांनीही हेलिकॉप्टरने जैतापूरच्या अणुप्रकल्पाच्या दिशेने कुच केली.
तिथे येऊन त्याने प्रकल्पाची सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. प्रकल्पाबाबत माहिती घेतली, सर्व प्रकल्प तपासून पाहिला, तेंव्हा त्याला केवळ ‘मायक्रोकंट्रोलर बेस्ड सिस्टिम’ मध्ये एक छोटासा बिघाड असल्याचं दिसून आलं. त्याने क्षणाचाही विलंब न करता आपला आभ्यास आणि ज्ञान याचा वापर करुन ती समस्या सोडवली, तेंव्हा मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हान त्याच्यावर भलतेच खुष झाले. ते त्याला म्हणाले, ‘तुम्ही आमच्यासाठी आपला बहुमूल्य वेळ काढून इतकं काही केलंत, सर्व समस्या सोडवलीत. आता आम्हालाही आपल्यासाठी काही करायचं आहे. तुम्हाला आमच्याकडून काय हवं असेल ते सांगा!’
‘..तेव्हडा माझा ‘मायक्रोकंट्रोलर’ चा पेपर काढा की!’ हा बोलून गेला!
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.