आज मराठी भाषा दिवस आहे. तेंव्हा मराठीच्या भविष्यकालिन वाटचालीचा आढावा घेणे हे यानिमित्ताने औचित्याचे ठरेल. ‘मराठीचा आग्रह तो का धरावा!?’ असा एक बेफिकीर प्रश्न अनेकदा फेकला जातो. तसं पहायला गेलं, तर वरकरणी हा प्रश्न निरुत्तर करतो. कारण जागतिक इतिहासावर नजर टाकली असता सर्व भाषिकांनी त्यावर आपला एक खास ठसा उमटवलेला दिसून येतो. ‘तेंव्हा केवळ मराठीचा अभिमान बाळगणे हा संकुचितपणा तर नाही ना!?’ असा एक प्रश्न सहजपणे मनास भेडसावून जातो. या प्रश्नाचे उत्तर वरकरणी गोंधळवून टाकणारे असले, तरी प्रत्यक्षात मात्र ते अगदी सोपे व सुटसुटीत आहे. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा, कारण ‘मातृभाषा ही माणसाच्या आध्यात्मिक उन्नतीचे एक विशेष साधन आहे’. मातृभाषेचा अभिमान ही मानवाची सहजप्रवृत्ती असण्यामागेदेखील कदाचित हेच कारण असावे. मातृभाषेचे संस्कार हे बुद्धिवर नव्हे, तर थेट आत्म्यावर झालेले असतात. जेंव्हा मातृभाषेची कुचंबना होऊ लागते, तेंव्हा प्रत्यक्षात मानवी आत्म्याची कुचंबना होऊ लागते. त्यामुळे एक न्यूनगंड निर्माण होते जो मानवाच्या आध्यात्मिक प्रगतीत बाधा आणतो.
२१व्या शतकात मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणात र्हास होऊ लागला आहे. त्यामागील कारणे ही भूतकाळात दडलेली आहेत. त्यामुळे त्या कारणांचा उहापोह करणे हा काही आजच्या या लेखाचा विषय होऊ शकणार नाही. परंतु मराठी भाषेच्या पथ्यावर पडतील अशा कोणत्या गोष्टी दैवयोगाने जुळून येत आहेत? आणि कोणत्या गोष्टींमुळे मराठी कालोदरात नाहिशी होऊ शकते? याचा या लेखात विचार करायचा आहे.
मराठीची सुदैविता
महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे घर आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेला राजाश्रय मिळालेला आहे. मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रात हिंदी भाषिकांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढले असले, तरी एकंदरीतच येथील लोकसंख्या वाढीची टक्केवारी ही आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. सध्या महाराष्ट्रात सुमारे १२ कोटी लोक राहतात. माझ्या अंदाजानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ही येत्या ३० वर्षांत १५ कोटींपर्यंत वाढेल. त्यानंतर साधारण २० वर्षे ही लोकसंख्या १५ ते १६ कोटी दरम्यान स्थिर राहिल. २०७० नंतर मात्र महाराष्ट्राची लोकसंख्या कमी होऊ लागेल. एव्हाना १९९० च्या दशकात महाराष्ट्रात आलेला हिंदी भाषिकांचा लोंढा महाराष्ट्रात येऊन बराच काळ लोटलेला असेल, तेंव्हा त्यांची दुसरी नाहीतर तिसरी पिढी ही मराठी भाषा बोलू शकत असेल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. अर्थात त्याकरिता मराठी भाषिकांनी पदोपदी मराठीचा आग्रह धरणे आवश्यक आहे. माझ्या मते स्थलांतरितांचा महाराष्ट्रकेंद्री ओघही आता हळूहळू ओसरु लागला आहे. २०००च्या दशकात बेंगलोरसारखी शहरे विकसित झाल्याने अनेक हिंदी भाषिकांनी कर्नाटककडे आपला मोर्चा वळवला. शिवाय उत्तरेकडील राज्यांचा थोडाफार विकास होऊ लागल्याने स्थालांतराचे प्रमाण हे काही प्रमाणात रोडावले असावे. पुण्यासारख्या शहरात पश्चिम महाराष्ट्रातील मराठी लोकांचा मोठा ओघ आहे. तेंव्हा भविष्यात पुण्याचे मुंबई होईल, असे मला वाटत नाही. येथील अनेक अमराठी दुकानदारांनी बघता बघता मराठी आत्मसात केल्याचे मी स्वतः अनुभवले आहे.
महाराष्ट्र हा आपल्या वैचारिक वारस्यासाठी ओळखला जातो. इथे वैचारिक खल हे सतत सुरु असतात. आणि त्यातच आजकाल एक अत्यंत सकारात्मक चित्र हे अगदी सर्वत्र पहायला मिळत आहे. इतरवेळी मराठी लोक हे चार दिशांना चार तोडं करुन बसलेले असतात; पण आता कमी-अधिक प्रमाणात का होईना, मराठीच्या सांस्कृतिक उत्सवात, भाषाग्रहात ते मनःपूर्वक सामिल होत आहेत. मराठीचा मुद्दा संकुचित असल्याचे हिरिरीने सांगणारी जुनी पिढी आता कारभारातून बाजूला पडत आहे. नवी पिढी एकंदरीत परिस्थितीचा साकल्याने विचार करु शकते. मराठीचा आग्रह तो का करावा? याची या पिढीस बर्यापैकी कल्पना आहे, शिवाय त्यांच्यात आत्मविश्वासही आहे. त्यामुळेच मराठी संदर्भात आजकाल काहीसे सकारात्मक चित्र दिसू लागले आहे. मराठीचा आग्रह धरणार्यांची हेटाळणी करण्यात जे लोक धन्यता मानतात, त्यांस चोख उत्तर देण्याची या पिढीत क्षमता आहे. कारण मराठीची लढाई ही न्यायाची लढाई आहे.
मराठी माणूस हा प्रामुख्याने नोकरी करणे पसंत करतो. पण मराठी तरुण हा आता व्यवसायिक शक्यताही चाचपडून पाहू लागला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत मराठी माणसांचे व्यवसायातील प्रमाण वाढलेले दिसेल. इंटरनेटचा उगम झाल्यापासून ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे परराज्यातून आलेले जे छोटे व्यवसायिक आहेत, त्यांच्यासाठी पुढील काळ कसोटीचा असेल. तंत्रज्ञानामुळे कामागारांची गरज ही आता वरचेवर कमी होत जाईल. त्यामुळे देखील परप्रांतियांचा महाराष्ट्राकडील ओघ कमी होईल असे दिसते.
भविष्यात तंत्रज्ञान इतके विकसित होईल की, आभास हा वास्तविकतेत भर घालू लागेल. परभाषिक व्यक्ति आपल्याशी जे बोलत आहे, ते डोळ्यांमध्ये घातलेल्या लेन्सच्या सहाय्याने आपल्या भाषेत दिसू शकेल. एखादी भाषा ही चालूवेळेत भाषांतरीत होऊन ऐकू येईल. गूगल ट्रांसलेटच्या माध्यमातून गूगलने एक फार मोठा अतुलनिय उपक्रम हाती घेतला आहे. ही सेवा सध्या अत्यंत बाल्यावस्थेत असली, तरी येत्या काही दशकांत त्यात अविश्वसनिय सुधारणा झालेली असेल. गूगल ट्रांसलेटमुळे कोणत्याही भाषेचा अडसर राहणार नाही. त्यामुळे जगभरातील भाषा या इंग्लिशच्या ओझ्याखाली दबून जाणार नाहीत. ज्ञानार्जन अथवा संवादाकरिता भाषिक अडसर राहणार नाही. मात्र त्यासाठी गूगल ट्रांसलेट या प्रकल्पास अधिकाधिक सहाकार्य करणे आवश्यक आहे.
मराठीची दूर्देविता
पूर्वीच्या सरकारपेक्षा भाजपने मराठीसाठी अधिक कार्य केले आहे. परंतु त्यासोबतच भाजपने वेगळा विदर्भ करण्याचे मनावर घेतले आहे. त्यांचा हा निर्णय मात्र मराठीसाठी घातक ठरु शकतो. विदर्भातील जनतेस महाराष्ट्रापासून वेगळे व्हायचे असेल, तर त्यांच्या ईच्छेचा सन्मान करणे हे क्रमप्राप्त आहे. पण जर विदर्भ वेगळा झाला, तर नव्या राज्यात मराठीसोबतच हिंदीलाही राज्यभाषा म्हणून बेमालूमपणे स्थान दिले जाऊ शकते. विदर्भ जर द्विभाषिक राज्य झाले, तर त्याचवेळी विदर्भातील मराठी संपलेली असेल. त्यामुळे एकंदरीतच मराठी संस्कृतीवर मोठा आघात होईल व महाराष्ट्रातही मराठीचे खच्चिकरण होईल. त्याकरिता महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा होऊ नये, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करायला हवेत.
माझ्या आज्जीला हिंदी भाषा बोलता येत नाही. परंतु मी स्वतः हिंदी भाषा कधी शिकलो!? ते मला स्वतःलाही समजले नाही. मराठी माणसाने इंग्लिश शाळेच्या मागे न लागता जरा धीर धरला असता, तर पुढच्या पिढीने आपसुकच इंग्लिश भाषा आत्मसात केली असती. इंग्लिशचे महत्त्व नाकारण्याचे कारण नाही. परंतु इंग्लिश भाषा शिकण्याकरिता १५ – २० वर्षं सर्व विषय इंग्लिशमधून शिकावे लागतात का? याचाही विचार व्हायला हवा. मराठी माध्यमांच्या शाळांतून चांगले इंग्लिश शिकवले गेले असते तरी देखील ते पुरेसे होते. पण दूरदृष्टीने विचार न करता आत्तापुरता फायदा पाहिला जात असल्याने इंग्लिश शिक्षणाभोवती आता एक अर्थकारण उभे राहिले आहे. त्यातून एक व्यवस्था निर्माण झाली आहे. आता ही व्यवस्था बदलण्याची शक्यता फार कमी आहे. आता जी पिढी इंग्लिश माध्यमांतून शिकेल, ती आपल्या मुलांस का म्हणून मराठी शिकवेल? तेंव्हा मराठीपुढील हे अगदी सर्वांत मोठे आव्हान असेल!
महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणे अत्यंत गरजेचे आहे. हिंदी भाषिकांची मराठी शिकण्याप्रती असलेली अनास्था पाहता मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी ती एक चिंतेची गोष्ट ठरु शकते. अर्थात यास मराठी माणसाची निद्रितावस्थाच खर्या अर्थाने कारणीभूत आहे. पण भविष्यात जर महाराष्ट्रातील हिंदी टक्का वाढत गेला, तर सहाजिकच महाराष्ट्रात हिंदीलाही राज्यभाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी पुढे येऊ शकते. त्यास अर्थातच हिंदीप्रेमी मराठी लोकांची साथ लाभेल. भविष्यात मतांची गोळाबेरीज जर हिंदीच्या बाजूने झुकली, तर कोणताही राजकीय पक्ष याविरोधात भूमिका घेणार नाही. तेंव्हा मराठी माणसाने वेळीच सावध व्हावे. आजकाल मराठी वाहिन्यांमधून व चित्रपटांमधून हिंदीचा वावर वाढतो आहे, हे त्याचेच द्योतक आहे.
मराठीचा उत्कर्ष, मातृभाषेचा उत्कर्ष हा मानवतेचा उत्कर्ष असेल! तेंव्हा मराठी भाषेचा व मराठी माणसाचा उत्कर्ष व्हावा यासाठी मी सर्वोपरी प्रयत्न करेन हे काही वेगळे सांगणे नको! याशिवाय इतर कोणतीही भाषा ही त्या त्या प्रदेशात टिकून रहावी यासाठी वेळप्रसंगी माझे सहकार्य असेलच! येता काळ मराठीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. येत्या वीस वर्षांत प्रत्येकास आपापल्यापरीने मराठीसाठी खूप मोठे कार्य करावे लागणार आहे.
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.