मी जेंव्हा मनीकडे पाहतो, मला तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसते, कदाचित आईची काळजी असेल. तिच्या पिलांच्या चेहऱ्यांवर मात्र नाविण्याचं औत्सुक्य असतं, त्यांना आसपास वावरणाऱ्या, हलणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं मोठं कुतूहल वाटतं. सकाळच्या कोवळ्या उन्हात मनी पहुडली होती, तेंव्हा तिचे एक पिलू दबा धरून उडणारी माशी पकडू पहात होते, तर आता त्यातील एक पिलू पकोळीचा पाठलाग करत आहे. मनी या सगळ्याकडे लांबून पहात राहते, तिच्या स्वतःच्या आयुष्यात नावीन्य असे काही उरलेले नाही, तिच्यासाठी तिची पिलेच सर्व काही आहेत.
संध्याकाळी मनी अत्यंत लगबगीने दरवाज्यातून बाहेर पळाली, बोका आला होता, अंगणात खेळणाऱ्या पिलांची तिला काळजी होती, पण ती एकटी कुठवर पुरणार, तिला करता येईल तेव्हढं ती करते. आज बोका येऊन गेला, इथे पिले आहेत हे त्याला आता समजलं आहे, मनीला यापुढे अधिक सावध राहावं लागेल. योग्यवेळी ती स्वतःहून पिलांना कुठेतरी दूर सोडून येईल, पण तोपर्यंत ती त्या साऱ्या पिलांना प्राणपणाने जपत राहील. ती तिच्या आयुष्याची नैसर्गिक जबाबदारी आहे, हेच तिचं आयुष्य आहे, जे आपल्या आयुष्याहून वेगळं नाही.
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.