आयुष्य

बारगळलेली कामे

भविष्यातील अनिश्चीततेला बिचकून माणूस आजचे वर्तमान उद्याच्या भविष्यावर ढकलतो, तेंव्हा बारगळलेल्या कामांचे एक अदृष्य भूत मानवी मनाच्या मानगुटीवर बसते. बऱ्याचदा क्षणार्धात पूर्ण होणारे काम देखील कळत-नकळत अनंत क्षणांच्या प्रतीक्षेत ठेवले जाते. अशाप्रकारे बारगळलेल्या कामांमधून माणसाचे आयुष्यही रेंगाळत असते, ज्यास स्वतःला पूर्णत्त्वाची प्रतीक्षा असते. त्यामुळे ढकला ढकलीचा हा खेळ सदैव खेळत राहता येत नाही. आपल्यासमोरील विहित कर्तव्य आज ना उद्या पूर्णत्वास न्यावेच लागते. अशावेळी त्या क्षणांपुरता का होईना, स्वतःच स्वतःला धीर द्यावा लागतो.

एखादे काम तडीस नेल्यानंतर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने मनावरील ओझे अचानकच हलके होते, तेंव्हा अनंत काळापासून उराशी बाळगलेल्या अदृष्य ओझ्याचे पछाडलेल्या मनास अप्रुप वाटू लागते. तरी कर्तव्यापूर्तीनंतर मिळणाऱ्या निवांत क्षणांचेही आपले स्वतःचे एक आयुष्य असते. अभिमानाचे क्षण जसे येतात, तसे ते चराचरात विरघळून जातात. त्यानंतर पुन्हा नव्याने भविष्याचे भूत एकाकी मनास पछाडू लागते. आपल्यासमोरील आव्हानांकडे डोळेझाक करता येते, पण ती दृष्टीआड करता येत नाहीत. कारण आपल्या आव्हानांना केवळ आपलीच प्रतीक्षा असते. विहित काम विहित वेळेत पूर्ण करण्यात एक खास समाधान असते. त्यासाठी स्वतःत आणि मनात विश्वास निर्माण करावा लागतो.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.