अनेकदा एखादी कल्पना आपली वाट पहात आपल्या आसपास वावरत असते, पण आपण मात्र आपल्याच विचारात कुठेतरी हरवून गेलेलो असतो. आपण जेंव्हा भानावर येतो, तेंव्हा अचानक जाणवतं की, एव्हढी साधी गोष्ट आधीच आपल्या लक्षात का आली नाही! थोडक्यात अनेक कूटप्रश्नांची उत्तरं आपल्या आसपासच असतात, पण आपण मात्र कुठेतरी दूर निघून गेलेलो असतो, आपण केवळ भानावर येऊन अवती-भोवती पाहण्याची आवश्यकता असते. बऱ्याचदा आयुष्य सोपं असतं, आपण मात्र त्यास स्वतःसाठी अवघड करून ठेवलेलं असतं.
केवळ स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी आपण ‘प्रश्न’ आहोत की ‘उत्तर’ यावर आपल्या आयुष्यातील यशापयश अवलंबून असते. आपण जर ‘प्रश्न’ असाल, तर समाजात तुम्हाला आपले स्थान सापडणार नाही, पण आपण जर ‘उत्तर’ बनून समोर आलात, तर समाज एक क्षणही न दवडता तुम्हाला मोकळ्या हृदयाने आपलंसं करेल. आपल्याला सोप्यातलं सोपं ‘उत्तर’ कसं बनता येईल? याचा आपण विचार करायला हवा. त्यासाठी सर्वप्रथम प्रश्नाचा नीट उलगडा व्हायला हवा. प्रश्न ओळखा, उत्तर शोधा, जगासमोर मांडा, आयुष्यात सर्वार्थाने यशस्वी होण्याची हीच गुरुकिल्ली आहे.
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.