कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे पुस्तक मी काही वर्षांपूर्वी वाचले असले, तरी ते मी काही फार गंभिरतेने वाचले नव्हते. त्यामुळे त्या पुस्तकाचे नाव माझ्या लक्षात राहिले असले, तरी गोविंद पानसरे हे त्याचे लेखक होते, हे मी पुरते विसरुन गेलो होतो. शिवाय ते कोण होते? त्यांचे कार्य काय? याबाबत मला काडीमात्र माहिती नव्हती, हे मी इथे खेदाने पण प्रामाणिकपणे कबूल करतो. परवा दिवशी त्यांचे निधन झाले, तेंव्हा ती एक मोठी बातमी बनली. त्यानंतर यूट्युबवर मी त्यांच्या नावाचा शोध घेतला असता, मला त्यांचे एक व्याख्यान सापडले. तेच व्याख्यान काल दिवसभर ‘एबीपी माझा’ वाहिनीवरुनही दाखवण्यात येत होते.
‘शिवाजी कोण होता?’ हे पानसरे यांचे पुस्तक मी अनेक वर्षांपूर्वी वाचले आहे. शिवरायांचा असा एकेरी नावाने केला गेलेला उल्लेख सहाजिकच इतर सर्व शिवप्रेमींप्रमाणे मला देखील खटकला होता. पण त्यामागील त्यांची खरी भावना ही ते पुस्तक वाचून पूर्ण केल्यानंतरच समजते. देवास अहोजाहो करुन आपण आपले सुख-दुःख सांगतो का? आपल्या जन्मदात्या आईस अरेतुरे करुन बोलल्याने तिचा अपमान होतो का? नाही! कारण जी व्यक्ती आपण अधिक जवळची मानतो, आपली मानतो, त्यास आपण अरेतुरे करुन एकेरी नावाने बोलत असतो. ‘शिवाजी कोण होता?’ या नावामागे पानसरे यांची देखील तिच भावना होती.
हे पुस्तक वाचून अनेक वर्षं झाली असल्याने आता मला ते पुन्हा एकदा वाचायचे आहे. माझ्याकडे ते पुस्तक आहे, पण काल मी त्याची ई-आवृत्ती केवळ ५ रुपयांना ‘न्यूजहंट’ वरुन विकत घेतली. आपल्यापैकी कोणाला जर ते पुस्तक लगेच वाचायची ईच्छा असेल, तर ते ‘न्यूजहंट’ या स्मार्टफोनवरील अॅपवरुन विकत घेऊन वाचता येईल.
उदात्तीकरण, विकृतीकरण झालेला ईतिहास बाजूला सारुन केवळ पुराव्यांनिशी सिद्ध झालेला खरा ईतिहास जसा आहे तसा समाजापुढे मांडणे एव्हढाच पानसरे यांचा माफक उद्देश होता. ज्यांस आपला ईतिहास कळत नाही, त्यांस आपला वर्तमान समजत नाही व ज्यांस आपला वर्तमान समजत नाही, ते भविष्य घडवू शकत नाहीत, हे ते सातत्याने सांगत होते. हीच भुमिका मी माझ्या लेखांमधूनही यापूर्वी मांडली आहे.
एखाद्या व्यक्तिचे थोडेफार जरी बोलणे ऐकले, तरी मला त्या व्यक्तिची वैचारीक पात्रता कळायला वेळ लागत नाही. मी कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे व्याख्यान ऐकले आहे, मुलाखत पाहिली आहे. तेंव्हा ते एक अत्यंत प्रगल्भ, वैचारीक बैठक असणारे प्रामाणिक व्यक्ती होते, हे मी अगदी निःसंशयपणे सांगू शकतो. त्यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर महाराष्ट्राने काय गमावले? याची मला खर्या अर्थाने जाणिव झाली व त्यानंतर माझे हृदय अधिक हळहळले, विषन्न झाले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमुळे दोन दिवस झाले मन अगदीच व्यथित झाले आहे. अशा प्रगल्भ विचारांची हत्या ही खरोखरच सबंध महाराष्ट्रास लाज वाटावी अशी घटना आहे.
पानसरेंचे वर्तमानपत्रात झळकणारे छायाचित्र पाहून ते एक अत्यंत तापट व कडक शिस्तिचे व्यक्ती होते की काय? अशी त्यांस अजिबातच न ओळखणार्या माणसाची भावना होऊ शकते. पण त्यांचे व्याख्यान पहा.. त्यांचे अत्यंत प्रेमळ, विनोदी असे व्यक्तिमत्त्व दिसेल, लोकांचे भले व्हावे यासाठीची त्यांची तळमळ दिसेल. जीवनाप्रती त्यांचा दृष्टीकोन हा अतिशय सकारात्मक होता. वयाच्या ८२ व्या वर्षीदेखील एखाद्या तरुणास लाजवेल असा त्यांच्या अंगी उत्साह होता. सर्वसामान्य वयोवृद्ध व्यक्तिंच्या उलट ते तरुणांकडे मोठ्या विश्वासाने पहात होते. सर्वसामान्यांसाठी अत्यंत तळमळीने व प्रामाणिकपणे लढणार्या एका वयोवृद्ध सेनानीस अशाप्रकारे आपल्यातून जावं लागणं, हे केवळ व्यवस्थेचं अपयश नसून एकंदरीतच समाजाचं अपयश आहे.
या समाजात हुशार लोक तुम्हाला ढिगानं सापडतील. हुशार होण्यासाठी केवळ पाठांतर असावं लागतं. पण प्रगल्भ व्यक्ती या फार फार दूर्मिळ असतात. प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म आभ्यास करत असतानाच त्यावर चौफर विचार करुन ते नम्रपणे व्यवस्थित मांडण्याची कुवत फार कमी लोकांमध्ये असते. असे प्रगल्भ लोक खरं तर त्या समाजाची मोल्यवान रत्नेच असतात! समाजाने त्यांचा सांभाळ केला पाहिजे, त्यांस अभय दिले पाहिजे, पण दूर्देवाने हे घडताना दिसत नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळात समाजसुधारकांच्या हाती असलेले जनतेचे नेतृत्त्व हे आता राजकारण्यांच्या हाती गेले आहे. राजकारण्यांच्या तद्दन फाल्तू वक्तव्यांमध्येच लोकांना अधिक रस असतो. आजही समाजसुधारक आहेत, पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणास वेळ नाही. त्यांचे विचार ऐकायचे, जाणून घ्यायचे म्हटलं तर पुस्तके वाचायला हवीत, मुलाखती पहायला हव्यात, पण मेंदूस तितके कष्ट देण्याची तसदी कोण घेणार? आजचा समाज हा ज्या समाजसुधारकांच्या त्यागावर उभारलेला आहे, त्या त्यागाचे मोलच जर हा समाज करणार नसेल, तर पुन्हा एकदा तो अडखळून पडेल.
मराठी वृत्तवाहिन्या जनजागृतीचा आपल्या परीने प्रयत्न करत आहेत, ही तशी एक चांगली बाब आहे. पण शेवटी सर्वसामान्य जनतेनेच आपले हीत जाणले पाहिजे. पानसरे म्हणतात त्याप्रमाणे, तुम्ही वाचा, शिका, ईतिहासाचा आभ्यास करा! केवळ पैसा माणसास संपन्न करत नाही, तर ज्ञानही माणसास संपन्न करते, हे सर्वांनी कायम लक्षात ठेवायला हवे.
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.