मी अगदी लहान असल्यापासून पुस्तकांस माझा जीवलग मित्रच समजत होतो. पण कालोघात माझ्या लक्षात आलं की, ‘पुस्तक’ हा माझा शत्रू देखील असू शकतो! हे वाक्य वाचून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल ना? पण हे अगदी खरं आहे! एखादे अडगळीत धूळ खात पडलेले पुस्तक मी हातात घेतले, की लगेच मला शिंका येऊ लागतात आणि बघता बघता मला सर्दी होते! मला ‘डस्ट माईट्स’ची अॅलर्जी आहे.
लहान असताना मी सतत सर्दीने आजारी पडायचो. त्यावेळी मला माझ्या अॅलर्जीबद्दल काहीही माहित नव्हते. त्यामुळे लहानपणीच्या माझ्या या सर्दीमागे कळत नकळत हे देखील एक प्रमुख कारण असू शकते. सतत आजारी पडल्याने माझी सतत शाळा बुडायची व त्यामुळे सतत मला शिक्षकांकडून अख्या वर्गासमोर अपमान सहन करावा लागायचा.
आज घरातील जुनी पुस्तके काढली, तेंव्हा मला लगेच त्याचा त्रास जाणवू लागला. पण ‘डस्ट माईट्स’ हे केवळ पुस्तकांवरच असतात अशातला भाग नाही. अडगळीत पडलेल्या सामानावर सहसा ते आढळून येतात. माझ्या घरातील कोणालाही अशा प्रकारची अॅलर्जी नाही, त्यामुळे त्यांना त्याची फारशी जाणिव होत नाही. पण मला मात्र या ‘डस्ट माईट्स’चे अस्तित्त्व लगेच जाणवते. अनेक लोकांना अशाप्रकारची अॅलर्जी असते, तेंव्हा त्यांनी अडगळीतील सामान आवरण्याच्या भानगडीत न पडलेलेच बरे!
‘डस्ट माईट्स’ हे कोळ्यांसारखे दिसणारे अतिसूक्ष्म जीव असतात. आपली व इतर प्राण्यांची त्वचा ही सतत बदलत असते. अशाप्रकारे झडलेल्या त्वचेच्या कणांवर ‘डस्ट माईट्स’चा उदरनिर्वाह चालतो. उबदार आणि दमट हवामानात त्यांची संख्या फोफावते. या सूक्ष्म जीवांचा समूळ नायनाट करणं जरी अशक्य असलं, तरी घरातील सामान स्वच्छ ठेवून आपण आपल्या परीने काळजी घेऊ शकतो. ‘डस्ट माईट्स’च्या सतत संपर्कात येणे हे शरीरासाठी हानीकारक असते.
एखादे जुने पुस्तक घेऊन वाचण्याची आता मला सोय राहिलेली नाही. एखाद्या पुस्तकावर असे सूक्ष्मजीव जाणवल्यास इतर पुस्तके ही त्याच्या संपर्कात न आणलेलीच बरी! नाहीतर सर्वच पुस्तकांना त्याची लागण होते. काही दिवसांपूर्वीच मी 2know.in वरील ‘ईपुस्तकांचे २० फायदे’ या लेखात ‘अॅलर्जीपासून बचाव!’ हा देखील एक फायदा सांगितला आहे. एखादा लहान मुलगा जर सतत सर्दीने आजारी पडत असेल, तर त्यास ही अॅलर्जी आहे का? ते तपासून पहा. अज्ञानामुळे अनेकदा आजारपणाचा त्रास नाहक भोगावा लागतो.
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.