व्यक्तिगत

पळवाट शोधू पाहणारे मन

परवा दिवशी रात्री झोपण्यापूर्वी मला एक प्रसंग आठवला आणि काल तो ‘अनुदिनी’ वर लिहायचा असे ठरवून मी दिवसभरात ठरवलेली सर्व कामे आधी उरकून घेतली. आता रात्री मी या ‘अनुदिनी’ वर तो लेख लिहायला सुरुवात करणार इतक्यात लाईट गेली! घरातील इन्व्हर्टर नादुरुस्त होऊन काळ लोटला आहे आणि तीन वर्ष चोख कामगिरी बजावल्यानंतर लॅपटॉपची बॅटरीदेखील आता निवृत्तीच्या वाटेवर आहे. ज्या दिवशी मला अगदी काहीतरी चांगलं लिहायचं होतं, अगदी त्याच दिवशी मी ते लिहू शकलो नाही.

हरकत नाही.. लाईट गेल्याचे मला फार काही दुःख झाले नाही. ‘अनुदिनी’ वर लिहायचा तसा मला ‘कोण’ उत्साह? लाईट गेली आहे, तेंव्हा ती येईपर्यंत जेवण करुन घ्यावं व नंतर लेख लिहिण्यास सुरुवात करावी, असा मी विचार केला. जेवण झालं, तरी देखील लाईट आली नाही.

एव्हाना मझं मन रेंगाळलं होतं. रोजच्या ठरवलेल्या कामातून पळवाट शोधू पहाणार्‍या मनाने अगदी समाधानाने डोकं वर काढलं. लहान मुलाने शाळेत जावे आणि त्यास आज शाळेला सुट्टी असल्याचे समजावे, असा काहीतरी सात्विक आनंद अशावेळी मनास लाभतो. कारण कामचुकारपणा करुन आपण काही अपराध करत असल्याची भावना ही मनास टोचणी देऊ शकत नाही व ‘निवांत आराम करणे’ हा आपला ‘मूलभूत अधिकार’ बनतो. पण काम केलंच नाही, तर असं एखाद्या दिवशी काम चुकल्याचा आनंद तरी कसा मिळेल!?

आमच्या घरात कामाची काही ठरावीक अशी वेळ नसते. सकाळी ऊठल्यापासून रात्री झोपेपर्यंत टप्याटप्याने काम चालूच असतं. रात्री जेवण झाल्यानंतर १२ वाजता झोपेपर्यंत शक्यतो सर्वजण आपापली कामे करत असतात. जेवण झालं तरीदेखील लाईट आली नाही, तेंव्हा मी माझा लेख लिहिण्याचा विचार सोडून दिला. पप्पादेखील म्हणाले की, ‘आता मी काही काम करत नाही, आता निवांत झोपी जातो’. असं म्हणत ते निवांत पडायची तयारी करत होते, इतक्यात लाईट आली! .. आणि आमचा काम न करण्याचा अधिकार एमएससीबीने हिरावून घेतला गेला. पण आम्ही मात्र आमच्या अधिकारांची पायमल्ली होऊ न देता, ‘आता वेळ झाला’ म्हणत झोपायला गेलो.

लाईटचा विषय निघाला आहे, तर मी आपल्याला एक कानमंत्र देतो. जर लाईट गेली आणि त्यानंतर काहीवेळाने सेकंदाच्या हजाराव्या भागासाठी दिवे चमकून गेले, की समजावे आता काही लाईट लवकर येणार नाही! काल देखील असंच झालं आणि त्यावेळीच खरं तर मला अंदाज आला होता की, आता काही लाईट लवकर येत नाही.

जे लोक ‘लाईट आले’, ‘लाईट गेले’ असे म्हणतात, त्यांच्यासाठी हा लेख वाचणं म्हणजे अन्यायकारकच ठरलं असेल! पण काय करणार? ‘लाईट आली, गेली’ करतच मी लहानाचा मोठा झालो आहे, आणि एका दृष्टीने पहायला गेलं, तर ‘स्त्री’शक्तीचं प्रतिक म्हणून देखील यासंदर्भात आपण आपलं समाधान करुन घेऊ शकतो.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.