व्यक्तिगत

नवीन वर्षाची सुरुवात

आज तसं लिहिण्यासारखं विशेष असं काही मनात नाही. ‘अनुदिनी’ या ब्लॉगच्या पत्त्याला स्मरुन रोज काहीतरी नवे लिहिण्याचा अट्टाहासही मला बाळगायचा नाही. पण आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, तेंव्हा काहीतरी लिहून या नवीन वर्षाचे स्वागत करायला हवे असं मनास वाटत आहे आणि म्हणूनच आत्ता हा लेख प्रपंच मांडला आहे.

‘वर्षांमागून वर्ष कशी निघून जात आहेत!?’ ते काही कळायला मार्ग नाही! २०१३ आणि २०१४ ही दोन वर्ष माझ्यासाठी इतक्या लवकर सरली की, या दोन वर्षांत घडून गेलेले प्रसंग आठवायचं म्हटलं, तर ते एक वर्षाहून फार जुने वाटत नाहीत. लहानपणी वेळ हळू जातो, तर वय वाढेल तसं तो अधिक गतीने गेल्याचं जाणवतं, असं म्हणतात. त्यात काही तथ्य असावं असं वाटतं. ‘वेळ’ वरकरणी समान दिसते, पण ती प्रत्येकास वेगळी जाणवते. त्यामागे अनेक कारणे असू शकतात, पण त्या कारणांचा उहापोह करण्याचा काही या ब्लॉग पोस्टचा उद्देश नाही.

सहज आठवलं म्हणून सांगत आहे. कोणे एके काळी मी शाळेत होतो, त्यावेळी शाळा सुटल्यानंतर ‘हेल्थ क्लब’ नावाचा उपक्रम चालायचा. त्यात हात, मनगट गोल फिरवा, कंबर हलवा, उड्या मारा, मान फिरवा, असे त्याकाळी माझ्या दृष्टिने कस्पटासमान असलेले व्यायामप्रकार चालायचे. त्या दिवसांत मी इतकं खेळायचो, सायकल चालवायचो, की त्यापुढे असे व्यायामप्रकार जाणवायचे देखील नाहीत. त्यामुळे सहाजिकच ‘याकरीता आपण निरर्थक वेळ का वाया घालवत आहोत?’ हे मला काही समजायचे नाही. शिवाय शाळा सुटूनही इतर शाळेतील मुलांप्रमाणे लगेच घरी जाता येत नाही म्हणून काहीसा रागही यायचा.

‘आता मात्र मला त्याचं महत्त्व उमगलं आहे’, असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण शाळेच्या व्यतिरीक्त वेळेत हे सर्व व्यायामप्रकार घेण्याची काही गरज होती, असं मला अजूनही वाटत नाही. शाळेच्या वेळातच ‘हेल्थ क्लब’ची व्यवस्था असायला हवी होती. आजची मुलं शनिवारी शाळेत जात नाहीत व त्यांना ख्रिसमसची देखील सुट्टी असते, म्हणून काही त्यांचा शारिरीक व मानसिक विकास कमी होईल, असे मला वाटत नाही. उलट ते अधिक बलवान व यशस्वी होतील याबाबत माझ्या मनात काही शंका नाही. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की, आता मी हे हलके व्यायामप्रकार केले, तरी देखील त्यामुळे शरीरात होणारा चांगला बदल मला जाणवतो. मागील काही वर्षांत माझा शारिरीक व्यायाम पूर्णतः बंद झाला आहे, हेच यामागील कारण असावे.

आज दुपारी टि.व्ही पहात असताना एक नवीन गोष्ट समजली. एकदा केलेला भात हा उरला असेल, तर तो पुन्हा शिजवून खाऊ नये. कारण तांदळाच्या सूक्ष्म फटिंमध्ये बॅक्टेरिआ रहात असतात (कोण कुठे रहात असेल? काही सांगता येत नाही! त्यामुळेच मला एक मायक्रोस्पोप घ्यायचा आहे.), तेंव्हा भात पुन्हा शिजवल्यास हे बॅक्टेरिआ एक ‘हानीकारक’ रसायन निर्माण करतात, की जे अर्थातच आपल्या शरिरासाठी हानीकारक असते. आता इतकी महत्त्वाची गोष्ट ही आमच्या पूर्वजांना कशी काय माहित नसेल? असा मनाला प्रश्न पडला, तेंव्हा लक्षात आलं की, आमचे पूर्वज हे केवळ सणादिवशी भात खात होते!

या ब्लॉगची सुरुवात मी Blogger च्या सहाय्याने केली होती. मागील वर्षी त्यात बदल करत मी Tumblr वर हा ब्लॉग हलवला. ब्लॉग लिहिण्याचा संकल्प अपेक्षेप्रमाणे अगदी दुसर्‍याच दिवशी मोडीत निघाला व त्यानंतर माझ्याच्याने काही लिहिणे झाले नाही. मराठी ब्लॉगिंगच्या दृष्टिने माझे मागील वर्ष हे खरं तर अगदी उदासिनच म्हणावे लागेल. आता थेट वर्षभरानंतर या इथे लिहिण्याचा मुहूर्त मला सापडला आहे. या ब्लॉगने आता Tumblr चा देखील निरोप घेतला असून त्याने WordPress चे आदरतिथ्य स्विकारले आहे.

नवीन वर्षाच्या निमित्ताने केल्या जाणार्‍या संकल्पांच्या अनुषंगाने मी मागील वर्षी ‘ठरावीक वेळ’ हा एक व त्या वर्षातील एकमात्र लेख लिहिला होता. त्यामुळे संकल्पांच्या संदर्भात त्याव्यतिरीक्त वेगळं काही सांगण्यासारखं नाही. सलग दुसर्‍या वर्षी १ जानेवारीचा मुहूर्त साधला हेही नसे थोडके.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.