‘नव्याचे नऊ दिवस’ असं म्हणतात ते काही उगाच यमक जुळावं म्हणून म्हणत नसावेत, कारण आज ९ तारीख आहे व माझा ‘अनुदिनी’ लेखनाचा उत्साह हा आता काहीसा मावळू लागला आहे. ‘प्रेरणा’ ही कोणत्याही नवनिर्मितीचे इंधन असते. हे इंधन जसजसे कमी होऊ लागते, तशी नवनिर्मिती देखील थंडावू लागते. त्यामुळे वेळोवेळी प्रेरणारुपी इंधन हे आपल्या जीवनगाडीत भरावे लागते, तेंव्हा कुठे नवनिर्मितीस नव्याने सुरुवात होते. आता हे प्रेरणारुपी इंधन मिळते कोठे? हे अगदी अगम्य असे कोडे आहे. पण त्याची काही खास अशी ठरावीक ठिकाणे आहेत. प्रेम, पैसा व प्रसिद्धी यात ‘प्रेरणा’ हमखास दडलेली असते, पण ती बाहेर काढावी लागते. तसं पहायला गेलं, तर ‘प्रेरणा’ ही एक फारच व्यक्तिगत अशी गोष्ट आहे. जन्माला आलो आहोत, तेंव्हा प्रत्येकास जीवन तर जगायचंच असतं. तेंव्हा प्रत्येकजण आपली जीवनरुपी ज्योत तेवत ठेवण्याकरीता कशात ना कशात ‘प्रेरणा’ शोधत असतो.
आता या ब्लॉगला ना प्रेम ना पैसा ना प्रसिद्धी, तेंव्हा नववर्षाची प्रेरणा ती किती दिवस पुरणार!? नऊच दिवस! उलट मी सलग नऊ दिवस या ब्लॉगवर लिहिले याचेच काय ते मला अधून मधून आश्चर्य वाटत आहे! आता यापुढे देखील लिहित रहायचे असेल, तर मी नव्याने ‘प्रेरणा’ मिळवायला हवी. त्यासाठी नवीन उर्जासाधनांचा विचार करायला हवा. त्यासंदर्भातील एक उत्तम कल्पना आज माझ्या मनामध्ये आली. नवीन वर्ष सुरु होऊन नऊ दिवस झाले आहेत, पण आता मी असं मानेन की, हे नऊ दिवस झालेच नाहीत. उद्या नवीन वर्षाची पहिली तारीख आहे. तेंव्हा मी नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेस नवीन लेख हा लिहायलाच हवा! पुन्हा नव्याने सुरुवात कारयला हवी. नऊ दिवसांचे वर्ष, नऊ दिवसांची प्रेरणा! नऊ दिवस झाले की पुन्हा नव्याने सुरुवात करायची! फक्त मध्येच एखादे लिपी वर्ष येऊ नये म्हणजे झालं!
अवांतर – मी आजच ऐकलं की, ‘अॅटॉमिक क्लॉक’ आणि ‘पृथ्विच्या परिक्रमणाची गती’ यांचा ताळमेळ साधण्याकरिता दर काही वर्षांनी घड्याळांमध्ये १ सेकंदाची सुधारणा करण्यात येते. या वर्षी अशी सुधारणा करण्यात येणार आहे. तेंव्हा संगणकापुढे संकटाचे सावट आहे, पण तो त्यातुनही मार्ग काढेलच! आता पृथ्विदेखील हळूहळू आपली गती कमी करु लागली आहे, तेंव्हा आपण आपल्या गतीचे ते काय सांगणार!?
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.