आयुष्य जर सुखाने जगायचे असेल, तर एकतर डोक्याने मूर्ख असावं लागतं किंवा मग अंगात धैर्य असावं लागतं. ज्याला डोकं आहे, पण धैर्य नाही त्याच्यासाठी आयुष्याचा मार्ग अतिशय खडतर आणि कठीण आहे. पण धैर्य नक्की येते कशातून? माणसाचे मन जर एका गोष्टीवर केंद्रित झाले असेल, तर त्याच्यासाठी बाकीच्या साऱ्या गोष्टी धूसर होत जातात. ज्या गोष्टी धूसर झालेल्या असतात त्यांचा तो विचार करत नाही, त्यामुळे त्यांचे त्याला भयही वाटत नाही, पर्यायाने त्याच्या मनात त्या गोष्टींबद्दल धैर्य निर्माण होते. धैर्य एकाग्रतेत दडले आहे.
पण मग असा प्रश्न उरतो की, सर्वसाधारणपणे माणसाला एकाग्रता कशी प्राप्त होते? एकाग्रतेसाठी एकतर एखाद्या गोष्टीची मनापासून आवड असावी लागते किंवा जबाबदारीतून काम करणे अपरिहार्य ठरावे लागते. माणसाचा मेंदू एकावेळी काही मोजक्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतो. ज्यावेळी एखाद्या गोष्टीकडे लक्ष देण्याशिवाय पर्याय नसतो, त्यावेळी बाकीच्या अनंत गोष्टींकडे आपोआप दुर्लक्ष होते, ज्यांची एरव्ही आपल्याला भीती वाटू शकली असती. जी गोष्ट आपल्या ध्यानीमनी नसते, तिची काहीच भीती वाटत नाही आणि ज्या गोष्टीकडे आपले संपूर्ण लक्ष असते, त्या गोष्टीची अनावश्यक भीती वाटण्याचे कारण उरत नाही.
थोडक्यात संगायचे तर भीती वाटावी अशी लाख कारणे आपल्या आयुष्यात असतात, पण जगण्याची अपरिहार्यता आणि मानवी मेंदूची कार्यपद्धत यांमुळे माणसाचे आयुष्य अनायसे धैर्याने भरलेले आहे.
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.