कधीकधी दिवस स्वतःचे खासपणाचे लोढणे आपल्या गळ्यात अडकवतो आणि स्वतः मात्र नामानिराळा होतो. अशाप्रकारे त्यास खास बनवण्याची नैतिक जबाबदारी उगाच आपल्या खांद्यावर येऊन पडते. तसे आपल्या दिवसाला आपले स्वतःचे असे आयुष्य वा अस्तित्त्व असते असे नाही. तो आपले आयुष्यही आपल्याच नजरेतून जगत असतो. आयुष्यचा सवंगडी आपले हळवे ऋणानुबंध आपल्या श्वासांमधून हळुवारपणे जपत असतो.
दिवसाची एरव्ही आपल्याकडून फार काही अपेक्षा नसते, पण जन्मदिवस, वर्षारंभ, सण, उत्सव, अशा काही विशेष प्रसंगी त्यास आपले खासपण हक्काने मिरवायचे असते! अशावेळी तो वरकरणी आपला स्वतःचा नसला, तरी तो त्याचा स्वतःचा असतो, आणि साहजिकच सोबती म्हणून त्याचा तसा मानही राखावा लागतो. त्याला स्वतःसाठी काही हवे असते असे नाही. त्याला जे काही थोडेफार हवे असते, ते आपल्यासाठीच हवे असते. त्यास खरे तर आपली सोबत साजरी करायची असते!
दिवस नाविन्याच्या अपेक्षेने मिश्कीलपणे आपल्याकडे पहातो, तेंव्हा आपली उडालेली धांदल त्याच्यासाठी नवी नसते. दिवसाखेर आपण रिकाम्या हाताने ओळखीचे स्मितहास्य भेट देतो. तेंव्हा दोघेही एकमेकांना काहीच न बोलता प्रेमाने समजून घेतो.
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.