या वर्षाची सुरुवात झाली, तेंव्हा नवीन वर्ष सुरु झाले होते. तरी आता नवीन वर्ष न संपता, जुन्या वर्षाची सांगता होत आहे. मग नवीन वर्ष गेले कुठे? नवीन गोष्टी नुसत्याच येतात! आणि जुन्या गोष्टी नुसत्याच जातात! त्यामुळे जीवनाचे कोडे काही सुटत नाही!
आता ‘जुने जाऊ द्या मरणा लागूनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका’, असं म्हणतात. पण टाकणार काय? घडायचं ते घडून गेलं! आता आपण फार फार तर मागील वर्षावर एक दृष्टीक्षेप टाकू शकतो. संकल्पपूर्तीची दिवास्वप्ने उरी बाळगून मनातल्या मनात कात टाकू शकतो. ‘कसे बसे का होईना! हेही वर्ष सरले एकदाचे!’, म्हणत इतिकर्तव्यपूर्तीचा निःश्वास टाकू शकतो! त्यापलिकडे आपण काही टाकू शकत नाही! त्यामुळे आपण आपलं ‘जुने जाऊ द्या मरणा लागूनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका’ म्हणायचं.. एक निःश्वास टाकायचा! आणि त्यानंतर पडलेल्या खांद्याला झुलणारे हात हालवत मुकाट्याने नव्या वर्षात पाऊल ठेवायचं!
मागच्या वर्षी मला काही संकल्प करावासा वाटला नाही. कारण ‘संकल्पपूर्तीच्या वाटेने’ नव्हे, तर ‘पुरती वाट लावून घेण्याच्या संकल्पानेच’ मी हा जन्म घेतला आहे, अशी माझी धारणा झाली होती. पण.. ‘ती केवळ एक धारणा होती!’, असे मी आज अजिबात म्हणणार नाही. कारण अजूनही तसे म्हणायचे धाडस काही मला होत नाही. तरी नेहमीप्रमाणे अनायसे दोन-चार गोष्टी ठरवायच्याच आहेत, तर त्यास नववर्षाच्या संकल्पाचा रंगिबेरंगी मुलमा द्यायला आपलं काय जातंय!? जर चुकून-माकून संकल्प पूर्ण झालाच! तर ‘नववर्षाचा संकल्प पूर्ण केला!’, म्हणत मिरवायला आपण मोकळे! आताही मी तेच करणार आहे!
रडत-खडत-पडत, काहीबाही बडबडत का होईना! पण वर्षभर अनुदिनी लिहिण्याचा संकल्प मी यावर्षी पूर्ण केला! आधी रोज एक लेख लिहायचो.. मग दिवसाआड.. मग दोन दिवसाआड.. त्यानंतर पंधरा दिवसांतून एकदा.. आणि आता या महिनाखेरीस सलग दोन लेख लिहितो आहे.. तेंव्हा संकल्पपूर्तीचा मार्ग किती खडतर असतो, याची कल्पन यावी! पण बाकी काही असो! या अनुदिनीवर नवीन लेख लिहिला नाही, असा एकही महिना गेला नाही, हे मोठे नवलच! त्यामुळे याप्रसंगी स्वतःची पाठ थोपटवून घ्यायला हरकत नाही!
ट्विटरवर खातं उघडून काही वर्षं झाली, तरी दरवेळी ट्विटर उघडताच ट्विट, रिट्विट, फेव्हरेट, मेंशन, हॅशटॅग, कोट, या गुंत्यात मी अडकून पडायचो! त्यामुळे मग मी त्याच्या फारसं नादी लागायचो नाही. पण यावेळी ट्विटरवरील पोरांनी ‘महाराष्ट्र दिन’ दणक्यात साजरा केला आणि आपली माणसं बघून मला ट्विटरची खर्या अर्थाने गोडी लागली. तोही एक मायक्रोब्लॉगच! तेंव्हा त्या निमित्तानेही ब्लॉगिंग झाले! आता ट्विटर या विषयावर इथे फारसं काही लिहित नाही. कारण ते एक प्रकरणच आहे!
मागच्या वर्षी मी वर्षाखेरच्या सूर्यास्ताचा फोटो काढला होता. हा लेख लिहिण्याच्या नादात आज फोटो काढायचा राहून गेला. असो! या वर्षी अनुदिनी आणि ट्विटरच्या निमित्ताने माझ्या अनेक विचारांना आकार मिळाला. तेंव्हा नवीन वर्षाच्या निमित्ताने माझ्या अनुदिनी लेखनास पुन्हा नव्याने उर्जितावस्ता प्राप्त होईल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही! ..निःश्वास.. टाकतो!
जय महाराष्ट्र!
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.