एखादे कार्य पूर्णत्त्वास न्यायचे म्हणजे त्यासाठी उर्जा ही लागतेच! पण एखादे मोठे कार्य करण्यासाठी तितक्याच मोठ्या प्रमाणावर उर्जा लागते का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. मराठी चित्रपटांस पुरेसं आर्थिक पाठबळ नसल्याने जागतिक दर्जाचे (लोकप्रिय) चित्रपट बनवता येत नाहीत, असे काहीजणांचे मत असते, पण मला त्यात तितकेसे तथ्य वाटत नाही. अर्थात एखादी कलाकृती चांगल्या स्वरुपात सादर करायची झाल्यास एका ठराविक पातळीपर्यंत पैशांची आवश्यकता ही असतेच! पण त्यानंतर मात्र त्या कलाकृतीची उंची ही ती कलाकृती सादर करणार्या व्यक्तिच्या कौशल्यावरच अवलंबून असते.
कलेच्या क्षेत्रात वावर करणार्या व्यक्ति या जात्याच प्रतिभावंत असतात. पण ही जन्मजात प्रतिभा बहरण्यासाठी योग्य अशा प्रशिक्षणाची व पोषक वातावरणाची आवश्यकता असते. असे अनुकूल वातावरण आपल्या इथे निर्माण होत नाही. त्यामुळे काही सन्माननिय अपवाद वगळता आपल्या येथील बहुतांश कलाकृतींमध्ये जागतिक दर्जाचे सुबक कौशल्य असत नाही. चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार हे चित्रपटाचे अत्यंत महत्त्वाचे अंग आहेत. एखादी चांगली कथा लिहायला काही फार पैसे लागत नाहीत. ती सादर करण्यास मात्र पैसे लागतात. पण केवळ सायन्स-फिक्शन अथवा अॅक्शन प्रकारातले चित्रपटच जागतिक पातळीवर यशस्वी होतात का? रोजच्या जीवनातील एखादी कथा देखील जागतिक संवेदनांस स्पर्श करु शकते! आणि अशी कथा सादर करण्यास तितक्याशा अर्थिक पाठबळाचीही आवश्यकता नसते.
तेंव्हा लेखकाने मूळात जागतिक रसिक डोळ्यांसमोर ठेवून आपली कथा लिहायला हवी. त्यानंतर दिग्दर्शकाने ती कथा अतिशय कौशल्याने हाताळात वैशिष्टपूर्ण पद्धतीने मांडायला हवी. आपल्याकडे चांगला अभिनय करणार्या लोकांची कमतरता नसली, तरी आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या अभिनेत्यांची वाणवा आहे. तेच ते रटाळ चेहरे समोर आणण्यापेक्षा नव्याने ऑडिशन घेऊन ही पोकळी भरुन काढायला हवी. चित्तवेधक संगीत अनेकदा चित्रपटाच्या आत्म्याप्रमाणे काम करते व ते प्रचाराचे पैसे देखील मोठ्या प्रमाणावर वाचवू शकते, तेंव्हा त्यावरही विशेष लक्ष द्यायला हवे. इतर तंत्रज्ञांचे सहाकार्यही मोलाचे आहेच! आपली कलाकृती एकत्रितपणे सादर करत असताना या सार्यांनी सतत जागतिक प्रेक्षक आपल्या नजरेसमोर ठेवून काम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी निर्मात्यानेच मूळात ती दृष्टी सर्वांमध्ये निर्माण करायला हवी व त्यानुसार सर्वांना प्रोत्साहन द्यायल हवे.
आता प्रश्न उरतो तो अर्थकारणाचा! प्रत्येक वेळी फायद्याचाच विचार करुन जमत नाही, पण त्याचवेळी आपले नुकसान होणार नाही याची काळजी देखील घ्यायल हवी! नाहीतर एकाच कलाकृतीत आपले बस्तान गुंडाळावे लागेल! त्यामुळे एखादी उत्तम कलाकृती सादर करताना ती अगदीच कठीण व गंभीर न बनवता, ती सोपी व सर्वसामान्यांस पचेल अशी असायला हवी. असं केलं तरच ती लोकप्रिय होऊ शकेल आणि ती लोकप्रिय झाली तरच अर्थिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकेल. आपण सुरुवातीच्या काळात हॉलिवूडचे चित्रपट हे हिंदीतूनच पहात होतो ना? मग जगातील इतर लोक आपले मराठी चित्रपट इंग्रजीतून व इतर भाषांतून का पाहणार नाहीत? आपण ती दृष्टी बाळगायला हवी!
तेंव्हा जागतिक दर्जाच्या (लोकप्रिय) चित्रपट निर्मितीस अमाप पैसा लागतो यावर माझा विश्वास नाही. आपला जर आपल्या प्रतिभेवर व कौशल्यावर विश्वास असेल आणि सोबत महत्त्वाकांक्षेची जोड असेल, तर असे चित्रपट बनवणं व यशस्वी करुन दाखवणं हे अगदी अशक्यकोटीतील काम नाही.
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.