घर बदलल्यानंतर टिव्हीला नव्याने डिश जोडावी असे आम्हाला अजिबात वाटले नाही, मुळात त्याची गरजही जाणवली नाही. प्रत्येकाकडे स्वतःचा स्मार्टफोन होता, ज्यावर तो त्यास हवे ते हवे तेंव्हा जाहिरातींशिवाय पाहू शकत होता. त्यामुळे पुन्हा टीव्ही लावून घरातील शांतता भंग करण्याची किंवा अनावश्यक वेळ वाया घालवण्याची कोणाचीच इच्छा नव्हती. नवीन ठिकाणी चांगली ब्रॉडबँड जोडणी मिळणे सुरवातीला कठीण गेले, परंतु अगदी त्याच सुमारास जिओची सेवा अवतरल्याने इंटरनेटचा प्रश्न आपसुक मार्गी लागला. एव्हाना जिओ टिव्ही, अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स सारख्या स्ट्रीमिंग सेवा सुरू झाल्या असल्याने टिव्ही पाहण्याची व्याख्याच पूर्णपणे बदलली.
डिश टिव्हीची गरज संपल्यानंतर आता केवळ प्रश्न उरला होता तो स्क्रीनच्या आकाराचा! शेवटी मोठ्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्याची अनुभूती काही वेगळीच असते! आमचा टिव्ही स्मार्ट असला, तरी त्याची कार्यप्रणाली फारशी सुलभ नव्हती. मी फायरस्टिक आणि क्रोमकास्ट बद्दल ऐकले होते, पण त्यामुळे स्मार्टटिव्हीमध्ये आणखी काय भर पडेल? याची मला पुरेशी कल्पना नव्हती. त्यामुळे मी ते विकत घेण्याचे कधी फारसे मनावर घेतले नाही. परंतु मध्यंतरी अमेझॉनवर ‘डेज्’ सुरू झाले, त्यात इतर वस्तूंसोबत सहजच फायरस्टिकही घेतली गेली. मला त्यावेळी ती जवळपास निम्म्या किमतींत मिळाली!
फायरस्टिकमुळे अमेझॉन प्राईमसह, हॉटस्टार, नेटफ्लिक्स, सोनी लिव्ह, झी५ वरील कंटेंट टीव्हीवर पाहणे सहजशक्य झाले. मुख्य म्हणजे फायरस्टिकच्या माध्यमातून मला माझे ब्ल्यूटूथ इअरबड्स आणि स्पिकर टिव्हीला जोडता आले. अशाने गोंगाटाची समस्या तर सुटलीच, परंतु अतिशय सुस्पष्ट आवाजामुळे प्रत्यक्ष चित्रपटगृहाहून अधिक चांगली अनुभूती येऊ लागली.
त्यानंतर माझ्या खोलीमध्ये देखील एक टिव्ही असावा असे मला वाटले. यावर विचार करत असताना माझ्या लक्षात आले की, मुळात मला टिव्हीची गरज नसून केवळ एक चांगली स्क्रीन हवी आहे. तेंव्हा काही दिवसांपूर्वी मी सॅमसंगचा कर्व्हड् मॉनिटर घेतला आणि त्यास माझ्याजवळील फायरस्टिक जोडली. आता या नव्या स्क्रीनवर मला चित्रपट, कार्यक्रम तर पाहता येत होतेच, पण त्यावर सामान्यांचे थेट प्रेक्षेपणही दिसत होते.
रोज २ जीबीची मर्यादा असणारे जिओ-फाय अर्थातच यासाठी पुरणार नव्हते आणि पुन्हा ब्रॉडबँड जोडणी घेऊन एकाच ठिकाणी खिळून राहण्याची माझी इच्छा नव्हती. तेंव्हा मी एअरटेलची पोस्टपेड योजना सुरू केली. यामुळे इंटरनेटची गती अनेक पटींनी वाढली, डेटा वापरावर असलेली दिवसाची मर्यादा संपली, शिवाय उरलेला डेटा पुढील महिन्यात जोडला जाऊ लागला. अशाने सरतेशेवटी इंटरनेटची समस्या पूर्णपणे निकालात निघाली.
एकंदरीतच परदेशात सुरू झालेले ‘कॉर्ड कटिंग’चे चलन हळूहळू आपल्याकडेही रुजू लागले आहे. पारंपरिक टिव्ही कदाचित आणखी काही काळ तग धरून राहू शकेल, पण ५जी सेवेच्या आगमनासह भविष्यात टिव्ही पाहण्याचा आपला अनुभव पूर्णपणे वेगळा असेल!
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.