सामाजिक

आपले अज्ञान

‘इस्त्रो’ सारख्या भारतातील प्रतिष्ठित संस्थेचा प्रमुख हा एखादा मराठी माणूस का असू शकत नाही? याची पूर्वी मला खंत लागून रहात असे. पण आज मी जेंव्हा ‘सकाळ’ची ‘सप्तरंग’ ही पुरवणी वाचली, तेंव्हा माझी ही खंत दूर झाली. डॉ. वसंत गोवारीकर यांची स्मृती जागवणारा एक लेख त्यामध्ये आला होता. ते ‘इस्त्रो’चे माजी प्रमुख असल्याची माहिती त्यात देण्यात आली होती. यापूर्वी डॉ वसंत गोवारीकर हे नाव एक शास्त्रज्ञ म्हणून मी जाणून होतो, पण त्यांच्या कार्याबाबत मात्र मी अगदी अनभिज्ञ होतो. माझे ‘सामान्य ज्ञान’ हे किती सामान्य आहे! याची यानिमित्ताने मला जाणिव झाली.

पण इतकं असामान्य कार्य करणार्‍या लोकांबाबत माहिती असणं हे ‘सहाजिक’ का नसावं? आपल्या आसपास जे मोठे लोक आहेत, शिक्षक आहेत, मित्र आहेत त्यांच्याकडून आपल्यास हे ज्ञान नेहमीच्या बोलण्यातून सहजगत्या का मिळू नये? ही देखील एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या इथे गुणवंत व्यक्तिमत्त्वाची फारशी कदर केली जात नाही. एकंदरीतच जीवनाबाबत सर्वत्र बेफिकिरी दिसून येते. लोक हे सतत ऐकमेकांशी दुसर्‍यांबद्दल बोलत असतात, पण हे दुसरे लोकही त्यांच्या आदर्श परिघातीलच असतात. ज्ञान अथवा नवनिर्मितीच्या बाबतीत बोलण्यास उत्सुक असणारे लोक हे दुर्मिळच म्हणावे लागतील!

मला रोज सातत्याने काहीतरी नवीन जाणून घ्यायला आवडतं आणि अफाट ज्ञानाने समृद्ध अशा आजच्या जगात ज्ञानाची अजिबात कमतरता नाही. पण हे ज्ञान प्रामुख्याने कोण निर्माण करतं? व ते कोण आपल्यापर्यंत पोहचवतं? परदेशातील लोकांच्या जिज्ञासू प्रवृत्तीचे मला अपृप वाटते! पण त्यासोबतच आपल्या मराठी लोकांकडूनही मला फार अपेक्षा आहेत. मराठी लोकांमध्ये जागतिक पातळीवर चमकण्याची नक्कीच क्षमता आहे. आपले पूर्वज जिज्ञासू होते, त्यांस नवनिर्मितीचा ध्यास होता, मात्र आजच्या मराठी पिढीमध्ये आत्मविश्वासाची आणि जिज्ञासू प्रवृत्तीची काहीशी कमतरता जाणवते. पण पूर्वजांकडून अनुवांशिकतेने आलेले नवनिर्मितेचे सुप्त गुण आजच्या मराठी पिढीमध्ये देखील नक्कीच आहेत, असे मला वाटते.

मराठी पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष पुरवले पाहिजे. केवळ चांगले खाऊ-पिऊ घालणे, आजारपण सांभाळणे व आभ्यास करुन घेणे म्हणजे लक्ष देणे होत नाही. तर मुलांच्या मानसिक विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी मुलांना स्वातंत्र्य द्यायला हवे. लहान मुलांना सतत रागावणार्‍या पालकांचा मला अतिशय राग येतो. ‘आपल्या नाकर्तेपणाचा राग आपल्या मुलांवर काढून तुम्ही कधी कर्तूत्त्ववान होऊ शकणार नाही!’ ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा! मुलांचा नैसर्गिक कल कोणत्या कलेकडे आहे? याचे पालकांनी निरीक्षण करायला हवे. एकवेळ आपली व्यक्तिगत आवड बाजूला ठेवून मुलांना त्यांच्या आवडीनुसार आपल्या परीने शक्य तेव्हढे प्रोत्साहन द्यावे. आपण स्वतः ज्ञानोपासना करणं देखील अनन्यसाधारण गरजेचं आहे. कारण ‘आपल्याकडे काही असेल, तरच आपण दुसर्‍याला काही देऊ शकतो’. मराठी माणसाने आपले अज्ञान दूर सारुन ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करायला हवी.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.