सामाजिक

अंधानुयायी

काही लोक स्वातंत्र्य मिळविण्याच्या आशेने आयुष्यभर कोणाचे तरी पारतंत्र्य स्विकारण्यात धन्यता मानतात. अशा ‘अंधानुयायी’ लोकांचा मेंदू नक्की कसा चालतो? हा संशोधकांच्या दृष्टीने एक आभ्यासाचा विषय ठरु शकतो. अंधानुयायांनी आपला मेंदू काही फुकट विकायला काढला आहे का? अशी शंका घेण्याइतपत ते आपल्या नेतृत्त्वाच्या प्रत्येक लहान-मोठ्या, योग्य-अयोग्य गोष्टींचे दिवसभर समर्थन करत असतात. ‘नेतृत्त्व’ स्विकारावे लागणे ही जगण्याची अपरिहार्य रीत आहे. पण जेंव्हा अशा नेतृत्त्वाचे व्यसन जडते, तेंव्हा या व्यसनाचे धोकादायक परिणाम हळूहळू दिसून येऊ लागतात. या बिनपगारी स्वयंघोषित प्रवक्त्यांमुळे एखाद्या विषयावर सारासार चर्चा न घडता केवळ वाद झडू लागतात.

अर्थात बहुंताश समाज राजकीय अंधानुयायी आहे, असे मानन्याचे कारण नाही. कारण तसं असतं, तर सत्तेतील पक्षाव्यतिरीक्त इतर पक्ष कधी निवडूण आलेच नसते. पण केवळ राजकीय पक्षांचेच अंधळे समर्थक असतात असे नाही. चित्रपटसृष्टीतील कलाकार, खेळाडू अशा इतर प्रसिद्ध व्यक्तिंच्या प्रत्येक गोष्टीचे हिरिरीने समर्थन करणारेही अनोंदणीकृत कार्यकर्ते असतात.

एकंदरीतच समाजाचा विचार करायचा झाल्यास इथे प्रत्येकजण कसाला ना कसला कार्यकर्ता आहे! पण राजकीय कार्यकर्ते हे इतर कार्यकर्त्यांपेक्षा अधिक धोकादायक वाटतात, कारण ते प्रत्यक्ष जीवनास दिशा देण्याशी निगडीत विचारांचा पुरस्कार करत असतात व बहुदा हे विचार आपल्या नेतृत्त्वाच्या एकांगी स्वार्थी विचारांचे प्रतिध्वनी असतात.

मूळात आपल्या सरासरी समाजाची ‘अंधानुयायी मानसिकता’ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपलं स्वतःचं डोकं चालवून काहीतरी नवनिर्मिती करण्यापेक्षा आपली बुद्धी गहाण ठेवून दुसर्‍यांनी निर्माण केलेल्या मार्गावरुन चालणं आपल्या इथे मानाचं समजलं जातं! आणि जे काहीतरी वेगळं करु पाहतायत, त्यांना मूर्खात काढलं जातं! अशा वेड्यांमध्ये राहून शहाण्याला आपणच तर वेडे नाहीयोत ना? हे एकदा तपासून पहावं लागतं! अर्थात हे सर्व सद्यसमाजाचे प्रश्न आहोत, कालांतराने समाजाची डोळसता वाढत जाईल, अशी अपेक्षा करण्यास वाव आहे.

असो! आत्ताचा विचार करायचा झाल्यास अशा अंधानुयायी समर्थक प्रवृत्तीस एखाद्या चांगल्या नेतृत्त्वाने वेळीच चाप घालणं आवश्यक आहे. हा समाज भिलेला आहे, त्यामुळे तो भावुक आहे, आणि त्यायोगे आक्रमक आहे! म्हणूनच मार्गदर्शकाच्या भुमिकेत राहूनही स्वतःच स्वतःचा मार्ग शोधण्यास प्रवृत्त करणार्‍या नेतृत्त्वाची आजच्या घडीस समाजास गरज आहे. यात गमतीची गोष्ट अशी आहे की, असं उदात्त नेतृत्त्व समाजास वेळोवेळी प्राप्तही होतं! पण कालांतराने त्या नेतृत्त्वाच्या उदात्त विचारांचाही विपर्यास होऊ लागतो, कारण ‘अंधानुनय’ हा कदाचित समाजातील एका घटकाचा अपरिहार्य स्थायीभावच आहे!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.