अनेकदा लोक ‘चांगला माणूस’ बनण्यासाठी फार उत्सुक असतात. त्या उत्साहात ते बर्याचदा नकळतच ‘वाईट माणूस’ बनून जातात. एखादा गरीब, दुबळा जर चुकून चुकला, तर आसपासचे लोक त्यास धुवून काढण्यात धन्यता मानतात. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, हे जग ‘हॉलोग्रॅम’प्रमाणे आहे. इथे प्रत्येक व्यक्ति जरी स्वतंत्र असली, तरी त्यात संपूर्ण समाजाचे प्रतिबिंब दडलेले आहे. त्यामुळे जेंव्हा कधी एखादी व्यक्ति चुकताना दिसेल, तेंव्हा समाजाने देखील आपले आत्मपरिक्षण करणे गरजेचे ठरते. समाजातील सत्पुरुष जसे चांगल्या गुणांचे प्रतिक असतात, त्याचप्रमाणे समाजातील अपप्रवृत्ती या त्यातील वाईट गुणांचे द्योतक असतात. आपण कसे आहोत? ते प्रत्येकाला आपल्या मनात माहित असते! प्रत्येकात मानवी गुण-दोष हे कमी-अधिक प्रमाणात कार्यरत असतात. त्यामुळे जेंव्हा एखादा गुन्हा घडतो, तेंव्हा गुन्हेगाराला शासन तर झालेच पाहिजे! पण सोबतच त्याच्या मनोवृत्तीचा आभ्यासही व्हायला हवा. उलटपक्षी गुन्हेगारामुळे संपूर्ण मानवजातीला आपल्यातील अपप्रवृत्ती नेमकेपणाने हेरुन व आभ्यासून त्यावर मात करण्याची संधी मिळते.
अपराधाचं वय काय असावं? यावरुन मध्यंतरी बराच खल झाला. ते कमी असावं की जास्त असावं? या वादात मला स्वारस्य नाही. कारण मानवाचे वैचारिक जीवन केवळ दोन टप्यांत विभागलेले असते, हेच मूळात मला मान्य नाही. आयुष्याचे काही वैचारिक टप्पे असतात. मानवाच्या वयानुसार त्याची प्रगल्भता ही वाढत जाते. १६ वर्षांच्या मुलाची तुलना ही ६० वर्षांच्या म्हातार्या व्यक्तिशी होऊ शकत नाही. अगदी ढोबळमानाने सांगायचे झाल्यास दर ५ वर्षांनी माणूस हा आयुष्याचा एक नवा टप्पा गाठतो. यामागे निश्चितपणे काही जीवशास्त्रिय कारणे असतील, ज्याचा संशोधकांनी अधिक आभ्यास करायला हवा. शिवाय आत्तापर्यंत जो काही आभ्यास झाला आहे, तो पुढे यायला हवा. या आभ्यासाच्या आधारे व्यक्तिचे वय लक्षात घेऊन कायद्यांचे स्वरुप ठरायला हवे. बालगुन्हेगार आणि प्रोढ गुन्हेगार अशी थेट विभागणी करु नये. तर मानवी आयुष्याची ५-५ वर्षांत विभागणी करावी. प्रत्येक टप्याचा मानसशास्त्राच्या दृष्टीने आभ्यास करावा, आणि त्यानुसार गुन्हेगारास शासन व्हावे.
काही गुन्हे असे असतात की, त्यांच्याबद्दल सहानुभूतीने विचार करणे देखील अतिशय जड जाते. अशा गुन्हेगारांबद्दल काय करता येईल? मूळात आपल्याला काय अपेक्षित आहे? या प्रश्नात वरील प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. आपल्याला तो माणूस संपवायचा आहे? की त्यातील अपप्रवृत्ती संपवायची आहे? समजा उद्या काही तंत्रज्ञान अस्तित्त्वात आले आणि त्या माध्यमातून त्या गुन्हेगाराची प्रवृत्ती, त्याचे अस्तित्त्व समूळ परिवर्तीत केले! त्याच्या आठवणी, त्याचे विचार, त्याच्या भावना असे सारे काही बदलून टाकले! तरी देखील आपण त्या व्यक्तिला गुन्हेगार मानणार आहोत का? अर्थात असं काही तंत्रज्ञान सध्या अस्तित्त्वात नाहीये, पण मला यातून केवळ हेच सांगायाचं आहे की, वरकरणी माणूस माणसाशी लढत असला, तरी आतून सखोलतेने तो केवळ प्रवृत्तींशी लढत असतो.
अर्थात आपल्याकडे ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’, असे म्हणतात; आणि यात प्रसंगी तथ्य देखील आहे. कारण माणूस हा काही गुण घेऊनच जन्माला येतो. माणसाला आपल्या मूळ सवयी बदलणे हे सहसा एका जन्मात तरी शक्य होत नाही. त्यामुळे आत्तापुरतं सांगायचं झाल्यास अशा गुन्हेगारांच्या प्रवृत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला तत्त्वनिष्ठ अशा निष्णात मानसशास्त्रज्ञांची गरज आहे. तज्ञांच्या सल्यानुसार यांना मुख्य समाजात सामावून घ्यायचे की नाही? याबाबतचे निर्णय घेतले जावेत. जीवन इतकेही सोपे नाही.. ते फार गुंतागुंतीचे आहे. तेंव्हा एखादी व्यक्ति जर चुकत असेल, तर त्याचा शक्य तितक्या सहानुभूतीने विचार व्हायला हवा.
मूळात माणूस पृथ्विवर शिकण्यासाठी येतो. त्यातील चांगल्या गुणांना पोषक वातावरण मिळेल याची तजवीज पृथ्वितलावर व्हायला हवी. अनेकदा माणूस परिस्थितीमुळे, अज्ञानामुळे, नशिबामुळे वहावत जातो. अशा लोकांना मात्र सुधारण्याची संधी ही निश्चितपणे मिळायला हवी. त्यामुळे माणसामध्ये जर काही अवगुण असतील, तर ते कार्यरत राहणार नाहीत, यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. अखेर जैविक उत्कर्षातून मोक्षप्राप्ती हे जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. हे अंतिम सत्य डोळ्य़ांसमोर ठेवल्यास मानवास आपल्या वाटचालीची दिशा अधिक चांगल्याप्रकारे ठरवता येईल.
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.