Uncategorized

महाराष्ट्र दिन २०१५

‘महाराष्ट्र’ नावाच्या देशात जन्मास येणं ही खरं तर एक भाग्याचीच गोष्ट आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ यादृष्टीने विचार करायला हवा. त्या त्या काळातील लोक, त्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती आणि त्याचा त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वावर होणारा परिणाम हा यावेळी लक्षात घ्यायला हवा. मानवी उत्कर्षाचा जो इतिहास या वर्तमानकाळात लिहिला जात आहे, त्यात मराठ्यांचे योगदान हे सुवर्ण अक्षरांनी लिहिले जावे याकरिता आता यापुढील वाटचाल होणे आवश्यक आहे.

डौलदार पिक उभे राहण्यास जमिनही तितकीच सकस असायला हवी. त्यामुळे शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रात जन्माला यावा आणि त्यानंतर मराठी साम्राज्य उभे राहावे यास केवळ योगायोग मानता येणार नाही. महानुभाव पंथ, ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, चोखामेळा, तुकाराम महाराज, रामदास स्वामी अशी महाराष्ट्रास जी संत परंपरा लाभली त्यातून महराष्ट्राची सांस्कृतिक जमिन सकस झाली होती. संतांनी मराठ्यांस वैचारीक बैठक दिली आणि पुढे शिवाजी महाराजांनी ते विचार कृतीत आणण्याचा आत्मविश्वास दिला. तो आत्मविश्वास आज साधारण साडेतीनशे वर्षांनंतरही मराठ्यांस प्रेरणा देत आहे. इतर भारतीयांच्या तुलनेत विचार करायचा झाल्यास तत्कालिन मराठी समाज हा त्यातल्या त्यात वेगळा होता. दूर्देवाने आज मराठ्यांचा गौरावशाली इतिहास हा महाराष्ट्राच्याच शालेय पाठ्यपुस्तकांतून शिकवला जात नाही. पण इंग्रजांपूर्वी मुघलांची परकीय सत्ता उलथवून टाकून सुमारे शे-दोनशे वर्षं संबंध भारताचे रक्षण करण्याची जबाबदारी ही मराठ्यांनी मोठ्या हिमतीने स्वतःच्या अंगावर पेलली होती.

मराठा साम्राज्य
१७६० सालचे मराठा साम्राज्य (पिवळ्या रंगात)

सन १७६० साली मराठा साम्राज्याने भारताचा मोठा भूभाग व्यापला होता. तो मराठा साम्राज्याच्या उत्कर्षाचा सर्वोच्च बिंदू होता. त्यानंतर पानिपतची लढाई झाली. त्यामध्ये मराठा साम्राज्याची मोठी हानी झाली. याच संधीचा फायदा घेऊन पुढील काही दशकात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा अंत करुन भारत आपल्या ताब्यात घेतला. पण मराठ्यांचे भारताच्या राजकारणावर असणारे महत्त्व अजूनही संपले नव्हते. महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले व त्यानंतर टिळकांपर्यंत महाराष्ट्राचे महत्त्व हे बर्‍यापैकी अबाधित होते. त्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या अधःपतनास सुरुवात झाली. औद्योगिकीकरण हे याचे एक अप्रत्यक्ष पण प्रमुख कारण मानता येईल. त्यानंतर मराठ्यांची तथाकथित परोपकारी महानताही यास मोठ्या प्रमाणावर जबाबदार ठरली.

गुजरात, राजस्थान, सिंध व पंजाब हे प्रांत चीन मधून युरोपकडे जाणार्‍या पारंपारिक व्यापारी मार्गादरम्यान येतात. त्यामुळे सहाजिकच व्यापार हा तिथल्या लोकांचा परंपरागत व्यवसाय आहे. औद्योगिकीकरणाच्या काळात व्यापारी लोकांचे महत्त्व वाढले. त्यामुळे शेतीवर आपली उपजिविका करणार्‍या महाराष्ट्राचे महत्त्व हे भारताच्या राजकारणातून हळूहळू कमी होत गेले. याच काळत गांधीजींचा भारतीय राजकारणावरील प्रभाव वाढत गेला आणि महाराष्ट्रातील नेते हे त्यांचे प्रमुख अनुयायी बनले. महान बनण्याच्या नादात उदात्ततेचा आव आणून स्वतःच्या स्वार्थापोटी मराठी नेते मराठ्यांचा घात करु लागले. नेते तरी काय!? सर्वसामान्यांचेच प्रतिनिधी असतात. जे मुठभर लोक मराठी असल्याचा अभिमान बाळगत होते, त्यांस आपलेच बहुसंख्य मराठी लोक व त्यांचे परप्रांतिय सवंगडी संकुचित ठरवू लागले. त्यामुळे ‘मी मराठी’ असल्याचं अभिमानाने सांगण्याचीही मराठ्यांस सोय राहिली नव्हती. मध्यंतरी मराठीच्या मुद्द्यावरुन रान उठल्यानंतर परिस्थिती बर्‍यापैकी पालटली. पण मराठ्यांस सक्षम व प्रभावी नेतृत्त्व न लाभल्याने या पालटलेल्या परिस्थितीतून निर्माण झालेल्या संधीचे सोने होऊ शकेल नाही.

शिख आणि रजपूत लोक आपले शूरत्त्व मोठ्या अभिमानाने मिरवत असतात, पण प्रत्यक्ष शिख व रजपूत लोकांची मुघलांच्या तावडीतून सुटका करुन त्या प्रदेशाचा कारभार ज्या मराठ्यांनी पाहिला, त्यांचे वंशज मात्र स्वतःबद्दल मूग गिळून गप्प असतात. मराठ्यांपासून त्यांचा इतिहास दडवला गेला असल्याने त्यांना मूळात स्वतःबद्दल जाणच नाही. मराठ्यांना स्वतःबद्दल अभिमान नाही, आत्मविश्वास नाही.. आणि जिथे आत्मविश्वास नाही, तिथे अंगभूत गुणांना वाव मिळत नाही.

मराठ्यांस स्वतः दरिद्री राहून सबंध जगाचं कल्याण करायचं असतं! पण स्वतः दरिद्री राहून जगाचं कल्याण होत नाही! इंग्रजांनी भारताच्या उत्कर्षात महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी भारतात धरणे बांधली, रेल्वे आणली, दूरसंचार व्यवस्था उभारली, वीज दिली, पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सामाजिक सुधारणेस संरक्षण दिले, नवीन अशा आधुनिक विचारांस चालना दिली. हे सारं कार्य त्यांनी स्वतः दरिद्री राहून केलेलं नाही. इंग्रजांनी स्वतःचा ‘खर्‍या अर्थाने’ स्वार्थ पाहिला. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम स्वतःमध्ये सुधारणी केली व मग नंतर त्या सुधारणा भारतात आणल्या. इतरांमध्ये देव शोधत असताना, आपल्यामध्ये देखील देव आहे याचा विसर पडता कामा नये. आधी आपल्या आत असणार्‍या देवाला प्रसन्न करा आणि मग नंतर इतर देवांची आराधना करा. आपण श्रीमंत असाल, तरच आपण जगाला श्रीमंत करु शकाल.

आता आपल्याला कोणावर राज्य गाजवायचे नाही की सत्ता मिळवायची नाही. आपला प्रदेश आपल्या ताब्यातून जाणार नाही याची मात्र काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्या मराठी संस्कृतीचा अभिमान बाळगणं आणि आपल्या मराठी भाषेचा व्यवहारात वापर करणं ही काळाची गरज आहे. मराठ्यांनी आता स्वतःला जागतिक दृष्टिकोनातून पहायला हवं. मराठ्यांचा उल्लेख झाल्याखेरीज अत्याधुनिक जगाचा इतिहास पूर्ण होणार नाही, अशी अलौकिक कामगिरी मराठ्यांनी बजावायला हवी. त्याकरिता विज्ञान, कला, क्रिडा, व्यवसाय, शिक्षण, राजकारण, इत्यादी सर्व क्षेत्रांत मराठ्यांनी हिरिरीने पुढाकार घ्यायला हवा. आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रावर प्रेम करणार्‍या आणि न करणार्‍या अशा सर्वांना मी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो!

जय महाराष्ट्र!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.