व्यक्तिगत

फिश पाँडचा कार्यक्रम

आज सकाळी मित्राचा फोन आला होता. त्याने सांगितले की, काल त्यांच्या ऑफिसमाध्ये ‘फिश पाँड’ चा कार्यक्रम होता. ‘फिश पाँड’ हा एक असा कार्यक्रम असतो, ज्यामध्ये सगळे सहकारी मिळून शारिरीक व्यंग, स्वभाव वैशिष्ट्ये यांवर ऐकमेकांची थट्टा करतात. निनावी चिठ्यांवर एखाद्याची चेष्टा करणार्‍या ओळी लिहून त्या एका बॉक्समध्ये टाकायच्या असतात. त्यानंतर सर्वांनी एकत्र जमून तो बॉक्स उघडायचा व ऐकमेकांवर हसत बसयाचे, असे काहीसे त्या कार्यक्रमाचे स्वरुप असते.

काही लोकांना हा कार्यक्रम आवडू शकतो, पण मला हा कार्यक्रम आजिबात आवडायचा नाही. पण आमच्या शाळेतील महान शिक्षकांना कोण सांगणार? ‘आपल्यावर होणारी टिका ही हलक्याने घेता आली पाहिजे’ या उदात्त हेतूने ते दरवर्षी ‘फिश पाँड’ नावाचा कार्यक्रम आख्या शाळेसमोर भरवत असत. त्याकरीता या कार्यक्रमाच्या आधी काही दिवस शाळेमध्ये एक बॉक्स ठेवला जायचा. मुलांनी इतरांची टर उडवणारे व अपमान करणारे मजकूर त्या चिठ्यांमध्ये लिहायचे व त्या बॉक्समध्ये टाकायचे. मग एके दिवशी एका सभागृहात सगळ्या मुलांनी जमायचे. तिथे आमचे महान शिक्षक एक एक चिठ्ठी उघडायचे! त्यामध्ये ज्याची चेष्टा केली गेली असेल, त्यास अख्या शाळेसमोर उभे केले जायचे व मग त्या चिठ्ठीतील मजकूर वाचला जायचा. तो मजकूर वाचून पूर्ण होईपर्यंत अख्या शाळेने हसून हसून सभागृह डोक्यावर घेतलेले असायचे. त्यानंतर ज्याची चेष्टा केली गेली त्यास सर्वांच्या समोर बोलावून चॉकलेट दिले जायचे. जाडे, लुकडे, बुटके, अबोल, अशा लोकांची या दिवशी काही खैर नसायची.

मी ‘लुकडा’ या वर्गात मोडत असल्याने हा कार्यक्रम शाळेत होणार म्हटल्यावरच मला धडकी भरायची! पण शाळा बुडवल्यास आणखी अपमान होण्याची शक्यता असल्याने ती देखील सोय नव्हती. जेंव्हा हा कार्यक्रम सभागृहात सुरु व्हायचा, तेंव्हा पुढचा क्रमांक आपला तर नसेल ना!? याची मनोमन धास्ती असायची. पण माझा क्रमांक कधी आल्याचे माझ्यातरी स्मरणात नाही. माणसाला भविष्य कळाले असते, तर किती चांगले झाले असते! माझी कोणीही चेष्टा करणार नाही हे जर मला माहित असते, तर त्यावेळी मी निवांत राहिलो असतो!

या उद्दात्त कार्यक्रमातली एकमेव चिठ्ठी माझ्या लक्षात आहे. माझ्या मित्राची शिक्षकांकरवी अगदी बोचरी चेष्टा केली गेली होती. माझा मित्र हा मूळचा कन्नड होता, तेंव्हा तो अगदी कन्नड लोकांसारखा दिसायचा. शिवाय त्याला चष्मा देखील होता. शिक्षकांनी त्यास सबंध शाळेसमोर उभे केले आणि मग ती चिठ्ठी वाचली.. ‘आधीच चेहरा वेटोळा आणि त्यातून चष्म्याचा घोटाळा’. सबंध शाळेने हसून हसून ते सभागृह डोक्यावर घेतले. आता इतका अपमान झाल्यावर एखाद्यास खाली बसून आपला चेहरा लपवावासा वाटणं साहजिक आहे! पण एव्हढ्यावरच थांबतील ते आमचे महान शिक्षक कसले? ‘आपल्यामुळे त्यास वाईट वाटले असेल, तेंव्हा त्यास चॉकलेट दिले पाहिजे’, अशा सुंदर विचारातून ते त्यास अख्या शाळेसमोर बोलवून बक्षिस दिल्यासारखं फाल्तूचं एक चॉकलेट देत असत. शिक्षकांच्या हुकमाची पायमल्ली तो कोण करणार? ते आपल्या शाळेचे सरदार!

आपल्याला कदाचित वाटेल की, त्यात काय एव्हढं!? पण केवळ १२-१३ वर्षांच्या मुलाच्या दृष्टिकोनातून याचा विचार करा. एखाद्याच्या दिसण्यावरुन सबंध शाळेसमोर त्याची चेष्टा करण्याचा शिक्षकांना काय अधिकार आहे? खास करुन मुलींसमोर होणारा असा अपमान हा त्या वयातील कोणत्या मुलाला आवडेल? पण आमचं नशिब थोर की आम्हास असे महान विचारवंत शिक्षक मिळाले! या शिक्षकांना त्यांच्या स्वतःच्या शारिरीक व्यंगांवर बोट ठेवणारी एखादी चिठ्ठी कधी सापडली नाही हे विशेष!

 

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.