माहिती

पानबुडी व मोटरबाईक

आज दुपारी सहज म्हणून टि.व्ही. लावला तेंव्हा त्यावर पानबुडीची माहिती लागली होती. शकडो टन वजनाची पानबुडी महिनोन्‌महिने समुद्राखाली लपून राहू शकते ही एक विशेषच गोष्ट म्हणावी लागेल. न्यूक्लिकर रिअ‍ॅक्टरच्या सहाय्याने पानबुडीस उर्जा पुरवली जाते. या न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरचा आकार केव्हढा असेल? तर केवळ एका डस्टबिन एव्हढा! रिअ‍ॅक्टरपासून मिळणार्‍या उर्जेच्या सहाय्यानेच समुद्रातील पाण्यामधून ऑक्सिजन वेगळा करुन मिळवला जातो. याशिवाय पिण्यासाठी लागणारे गोड पाणी देखील समुद्राच्या खार्‍या पाण्याची वाफ करुन मिळवले जाते. समुद्राखाली लपून राहणं हेच अणवस्त्रवाहू पाणबुडीचे खास वैशिष्ट्य असते. पाणबुडी कुठे निघाली आहे, हे काही मोजक्याच अशा मुख्य लोकांव्यतिरीक्त इतर कोणालाही माहित नसते. ती पाण्याखाली किती काळ राहू शकते? हे त्या पाणबुडीवर किती अन्न उपलब्ध आहे? यावरच साधारणतः अवलंबून असते. त्या पानबुडीमध्ये वास्तव्य करणार्‍या लोकांचेही कौतुकच आहे!

पाणबुडीतील न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरवरुन मला अंतराळ मोहिमांसंदर्भातील एका कार्यक्रमाची आठवण झाली. अशाप्रकारच्या न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरचा वापर करुन सुदूर अंतराळ मोहिमांसाठी लागणारी उर्जा मिळवली जाऊ शकते. पण काही लोकांना अशी देखील चिंता वाटते की, न्यूक्लिकर रिअ‍ॅक्टर असलेल्या यानाचा दूर्देवाने अंतराळात प्रवेश करण्यापूर्वीच जर पृथ्वीच्या वायुमंडळात स्पोट झाला, तर त्यामुळे पर्यावरणाची व जीविताची मोठी हानी होऊ शकते.

पानबुडीचा भाग संपल्यानंतर त्याच कार्यक्रमाअंतर्गत मोटरबाईकचा भाग सुरु झाला. यात ‘सायकल’ची ‘मोटरसायकल’ कशी झाली? ते अगदी थोडक्यात सांगण्यात आले होते. त्यात मला अगदी सुरुवातीच्या काळातील एक बाईक पहायला मिळाली. आपल्या नेहमीच्या सायकलला पाणी उपसायची मोटार बसवावी असे त्या बाईककडे पाहून वाटत होते. यावरुन मला उगाच सजिवांच्या उत्क्रांतीची आठवण झाली. आपण जेंव्हा जुने जीवाश्म पाहतो, तेंव्हा ते असेच काहीसे दिसून येतात.

एक गोष्ट मात्र नक्की की, आपल्याला एखादी गोष्ट नीट समजून घ्यायची असेल, तर त्या गोष्टीच्या उत्क्रांतीचा ईतिहास समजून घेणं हे अनन्यसाधारण महत्त्वाचे असते. कारण ईतिहासावर नजर टाकल्यानंतरच आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका आणि त्यामधून त्यांनी घेतलेला बोध याबाबतची माहिती होते. त्यायोगे आपल्या मनातील अनेक महत्त्वाच्या शंकांचे निरसणही आपोआपच होऊन जाते. कारण आपल्या मनातील प्रश्न हे आपल्या पूर्वजांनाही पडलेले असतात. त्यांनी त्या प्रश्नांवर शोधलेली उत्तरे ही आपल्या शंकांचे निरसण करतात.

मोटरबाईकच्या उत्क्रांतीमध्ये त्यांची शक्ती आणि गती अशा दोन्ही गोष्टी वाढत गेल्या. येत्या काळात मात्र परदेशातील लोकांप्रमाणे भारतातील लोकही रोजच्या जीवनात मोटरबाईक वापरतील असं वाटत नाही. येत्या २० वर्षांत आपल्याला भारतातील सर्व रस्त्यांवरुन मुख्यतः कार धावताना दिसून येतील.

 

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.