लहानपणी माझा सर्वांत आवडता खेळ कोणता असेल? तर तो ‘क्रिकेट’. पाचवी पासून सातवी पर्यंत मला जेंव्हा कधी शाळेपासून सवड मिळायची, तेंव्हा मी गल्लीतल्या माझ्या सवंगड्यांसोबत ‘क्रिकेट’ खेळायचो. आम्ही मुले इतर खेळही खेळायचो, पण ‘क्रिकेट’ हा आमचा सर्वांत प्रिय असा खेळ होता. भारताचा एखादा अटीतटीचा सामना टि.व्ही. वर पहात असताना मी भावुकही व्हायचो! एकदा भारत अशाच एका अटीतटीच्या सामन्यात जिंकता जिंकता हरला, तेंव्हा मला माझे अश्रू अनावर झाले, इतकं माझं क्रिकेटवर प्रेम होतं.
कालोघात ते सवंगडीही मागे पडले व तो खेळही मागे पडला. गेल्या दहा वर्षांत मी क्वचितच क्रिकेट खेळलो असेन. का कोणास ठाऊक? पण क्रिकेट या खेळातील माझी रुची ही हळूहळू फारच कमी होत गेली. जसं मी क्रिकेट खेळणं सोडलं, तसं माझं क्रिकेट पाहणं देखील बंद झालं. आता तर मला ‘भारताचा सामना कधी आहे?’ हे देखील माहित नसतं, तेंव्हा भारताचे सामने टि.व्ही. वर पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! वर्तमानपत्रात येणार्या बातम्या वाचल्यानंतरच मला त्याबाबत माहिती होते. सतत होणार्या ‘मॅच फिक्सिंग’ मुळे क्रिकेट हा खेळ पाहण्यात काही ‘अर्थ’ उरला आहे, असे वाटत नाही.
आय.पी.एल. ची लोकप्रियता ही तर माझ्यासाठी अगदी अनाकलनीय आहे! पुण्याच्या टिममध्ये पुण्याचे खेळाडू असत नाहीत, मुंबईच्या टिममध्ये मुंबईचे खेळाडू असत नाहीत, केवळ पैसा आणि प्रसिद्धी डोळ्यासमोर ठेवून आय.पी.एल. च्या व्यवसायात उतरलेले उद्योजग ‘पुणे वॉरिअर्स’, ‘मुंबई इंडियन्स’ म्हणून लोकांना भावनिक आवाहन करतात आणि लोक भुलतात! पुण्याचे, मुंबईचे खेळाडू बाजूला राहूदेत.. कमीतकमी मराठी खेळाडू तरी महाराष्ट्रातील शहारांच्या नावाने असलेल्या टिममध्ये असावेत की नाही!? आता काही लोक मला त्या टिममधील मराठी खेळाडूंची नावे सांगू लागतील.. पण मी इथे अपवादांबद्दल बोलत नसून संपूर्ण टिमबाबत बोलत आहे.
लोकांनी स्वतःहून क्रिकेट खेळावे त्यातून चांगला शारिरीक व्यायाम होतो, पण सतत टि.व्ही. वर दुसर्यांचा खेळ पाहून वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे? मनोरंजनच हवे असेल, तर क्रिकेटहून अधिक चांगली अशी मनोरंजनाची कितीतरी साधने आहेत. शेवटी आवडी-निवडी या अगदी व्यक्तिगत असतात. पण आपल्या आवडी-निवडींमधून आपल्या जीवनात काही चांगला बदल होत आहे का? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. जर असा बदल होत असेल, तर आपण योग्य मार्गावर आहोत असे समजायला हरकत नाही. नाहीतर आपल्या आवडी-निवडी बदलायची वेळ आली आहे, असे निश्चित समजावे!
About रोहन जे.
शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.