व्यक्तिगत

हिवाळ्यातील परीक्षेत

एकदा घरातून निघाल्यावर येणारं आव्हान स्विकारण्यास आपलं मन आपोआप तयार होतं …पायर्‍या उतरणं हाही कसा आपल्या मनातलाच एक कप्पा आहे! कित्तीदा या पायर्‍या चढल्या असतील, उतरल्या असतील!? प्रत्येक वेळी एक वेगळं कारण घेऊन… ‘कधितरी मला या पायर्‍यांचीही साथ सोडावी लागेल, पण त्याचा विचार अत्ताच ‘या मनाला’ करायचा नहीये, म्हणून ते अलगत स्वतःला दुसर्‍या विषयांकडे वळवतं.’ बुट चोरीला गेल्यापासून वॉचमन या गेटचं दार बंद ठेवत आहे. तो आजारी असल्याने कधीकधी आत येताना मला देखील ओळखत नाही. मग मी त्याच्याकडे पाहायचंच सोडून दिलं… रोज शाळा सुटल्यानंतर ‘या रस्त्यावर’, शेजारच्या शाळेतून ‘मूर्ख चिल्यापिल्यांची’ गर्दी वाहू लागते. शाळा सुटण्याआधी त्यांचे आईवडील या शाळेच्या गेटसमोर शाळेकडे नजर लावून ताटकळत उभारलेले असतात. चिल्यापिल्यांवरुन मला चिल्यापिल्या पाली लक्षात येतात, ज्या उन्हाळ्याच्या दिवसात माझ्या रुममध्ये सगळीकडे पसरलेल्या वह्या-पुस्तकातून फिरायच्या… म्हणजे छोट्या पालींना मेंदू असतो!? त्या तर फर्शीवरुन इकडेतिकडे पळत असतातऽ… माणसाचं पिल्लू आणि पालीचं पिल्लू… दोघंही वेड्यासारखं पळत असतात!

समोरुन एक कुत्रं दबक्या पावलांनी हेलकावे खात, माणसांकडे पहात पहात लयबध्द गतीने, रस्ता ओलांडून हळूहळू पलीकडच्या गल्लीत पळत गेलं. काय विचार करत असेल ते!? हमम्ऽऽ… काहितरी असेल… पण त्या विचारांत माणसांबद्दल नक्कीच काही भावना असतील. नेहमीप्रमाणेच बाहेर पडल्यावर आता आसपासच्या विश्चाची चाहूल लागली आहे. शेजारीच सळयांवर ‘ठणऽ ठणऽ ठणऽऽ’ असे जोरजोरात घाव घातले जात आहेत, त्या तिथे वेल्डिंगचं काम सुरु आहे. हळूहळू ‘त्याचा’ कानाला स्पर्श करणारा आवाज कमी कमी होत गेला. आपापल्या कामावर जाण्यासाठी रस्त्याच्या कडेने बसची, टमटमची वाट पहाणारी माणसं टप्याटप्यावर दिसत आहेत. एखाद्या प्रवाशाला थांबून गाडीत घेताना आणि नंतर निघताना होणारा टमटमचा ‘फट फट फट फट’ असा कमी-जास्त आवाजही ओळखीचाच आहे. रस्त्यावरुन दुचाकी, कार्स, बसेस, माल वाहतूक करणार्‍या रिक्षा यांचा आवाजही आता एकजीव होऊ पहात आहे. शेजारच्या दुकानात दोन लहान मुलं काही सामान घेत आपापसात गप्पा मारत आहेत. दुकानदारही काही शोधत आहे. ‘मी माझा मोबाईलही इथेच रिचार्ज करायला येतो… पण आज मला इथे थांबायचं नाहिये.’ आता मुख्य रस्ता सुरु झाला आहे. रस्ताच्या दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या दुकानांच्या रांगा आहेत. कुठेही स्थिरता नाहीये…सर्वत्र काहितरी हालचाल सुरु आहे.

‘टमटम!’ पहिल्यांदा ऐकलं तेंव्हा मला हे नाव विचित्र वाटलेलं… अजूनही मी जेंव्हा या नावावर विचार करतो, तेंव्हा मला ते विचित्रच वाटतं! त्यालाच ‘सिक्स सिटर’ असंही म्हणतात … ‘एकानजरेत पाहिल्यावर तो मला फार पूर्वी अमच्या रुमशेजारी राहणारा, आळशी, घाणेरडा, पडीक डॉक्टर वाटला!’ ‘हा टमटम चालवायला लागला? तेही इतक्या लांब! आणिऽ …नेमकं इथंच!? ‘स्टॅंड’ असं म्हणताच त्याने मला आत बसायची खूण केली. त्याचा चेहरा नीट न्यहाळत आत बसता बसता माझी खात्री झाली की हा ‘तो’ पडीक घाणेरडा डॉक्टर नाहीये.

असं म्हणतात जीवन जगण्याचे दोनच प्रकार आहेत, एक जसं काहीच जादूई नाहीये आणि एक असं की, हे सारं विश्वच जादूनं भारलेलं आहे. माझा देवावर पूर्ण विश्वास नव्हता. माझ्या मनात त्याच्याबद्दल शंका होती. पण कधीकधी आपल्या जीवनात असेही काही क्षण येतात, जिथे थांबून तुम्हाला स्वतःचा, या जीवनाचा सखोल विचार करावा लागतो. जीवन जगणं म्हणजे या समोरच्या गर्दीतून चालण्यासारखंच आहे. या उभ्या हिरव्यागार डोंगरांमधून हळूवार वाट काढण्यासारखं आहे.

फ्लॅटवर पोहचल्यावर मुलांनी माझं स्वागत फार काही आनंदानं केलं नाही. पण माझा त्यांना त्रास होणार नाही याची मला खात्री होती. ‘मी’ आल्यावर आभ्यासाला सुरुवात करेन, असं ‘आभ्यास न करण्याचं’ कारण विवेक इतरांना देत होता, तितक्यात मी त्याच्यासमोर हजर झालो. त्यामुळे इतक्या तणावातही उडालेल्या हास्याच्या कारंज्यांनी त्या रुमचं वातावरण चैतन्यदायी होऊन गेलं. “याला आपल्या रुमवर याआधीच उचलायला हवं होतं.”, आपल्या विशिष्ट विनोदी शैलीत हसत हसत आदित्य म्हणाला. दुसर्‍या दिवशीच माझा पेपर होता, म्हणून मी कधी नाही ते डोकं पुस्तकात खुपसून आभ्यासाला लागलो.

पेपर दिल्या दिल्या मला वाटलं तो चांगला गेला. पण नेहमीप्रमाणेच थोड्या वेळानंतर तो राहील, असं मला आतून वाटू लागलं. लहानपणी स्कॉलरशिप परिक्षेत परिणाम भोगल्यापासून, मी एकदा होऊन गेलेला पेपर पुन्हा पहात नाही. जे काही असेल ते देवावर सोपवतो किंवा कदाचीत येणार्‍या काळावर…

दुसरा पेपर मी सोडून दिला. पण माझ्या समोरच्या मुलीनं तो चांगला लिहिला. आज मी परत घरी जाणार आहे. या सगळ्या गोष्टींपासून दूऽर. आता पुढचा पेपर एका आठवड्यानंतर आहे. घरी आई मला काळजीनं आभ्यास कर म्हणून सांगते. भैयाने मात्र माझ्या आभ्यासाबाबत टि.व्ही.शी तडजोड केलेली नाही. आणि त्याने तशी ती करावी, असं मला स्वतःलाही आतून वाटत नाही. टि.व्ही. वरही नेमकं या दिवसातच इतके छान कार्यक्रम का लागत आहेत! कोण जाणे!? आता मी दिवसांचा हिशेब करत आहे आणि थोडासा आभ्यासही… कारण उद्या कधी काल होऊन जातो, ते समजतच नाही!

“आज आपल्याकडे एक हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्त्व येणार आहे” असं आदित्य इतरांना सांगत होता, इतक्यात मी माझी बॅग त्याच्यासमोर टेकवली. दरम्यान फ्लॅटवरच्या मुलांची परिक्षा सुरु झाली आहे. गेल्यावेळी आदित्यने त्याच्या रिसिटवरच्या दोन विषयांवर पेनने काट मारली होती. यावेळी येऊन पाहिलं तेंव्हा त्यावर आणखी दोन रेषांची भर पडली होती.

अनेकांचे अनेक आलार्मस्‌‌ वाजून बंद झाल्यानंतर डोळे किलकिले करुन आपल्या आसपास अजून कोण उठलं आहे का? हे पाहण्याने आमच्या दिवसाची सुरुवात होते. कोण आभ्यास करत बसलं आहे का!? याची मात्र आमच्या फ्लॅटवर कोणालाही चिंता नसते. या इथे पहिलं काम असतं ते दात घासून, तोंड धुवून नाष्टा करण्याचं. त्यासाठी निघेपर्यंत नऊ वाजलेले असतात. मागं राहू नये म्हणून मी आता पायात सॉक्स शिवाय बुट कोंबायला सुरुवात केली आहे.

पेपर वाचत वाचत चहा, पोहे खात, सिगरेट ओढत गप्पा मारेपर्यंत बराचसा वेळ निघून गेलेला असतो. मी स्वतः कधी सिगारेट ओढली नाही. पण शेजारी कोण ओढत असेल, त्यालाही विरोध केला नाही. आदित्यने मला त्याबाबत सुचवल्यावर मी म्हटलं, “जर खरोखरच असं केल्याने टेंन्शन गेलं असतं, तर मीही तुझ्याबरोबर रोज सिगरेट ओढली असती, दारु पिली असती. पण मला माहित आहे, असं केल्याने माझे प्रश्न सुटणार नाहीत. आणि तुलाही हे चांगलंच माहित आहे.” आदित्यने माझ्याकडे पहात हलकंसं स्मितहास्य केलं. कोण माणूस कसा आहे!? हे मोजण्याचं एकक ‘दारु, सिगरेट’ होऊ शकत नाही, हे मी माझ्या मित्रांकडे पाहून सांगू शकतो.

नाष्टा केल्यानंतर काही वेळाने, फ्लॅटवर पोहचेपर्यंत मुलांना ‘आता डबा कधी येणार!?’ याची चिंता सतावू लागते. दुपारी एकदम उशीरा आलेला डबेवाला, मुलांच्या भावनांचा उद्रेक झेलायला नको म्हणून दबक्या पावलाने हळूच दरवाजा उघडून आत डबा सरकवून देतो आणि लगेच पळून जातो. पण आता मुलांचाही त्याबाबत सिक्स्थ सेंस डेव्हलप झाला आहे. मला कधीही जाणवलं नाही, पण त्यांना आता त्याच्या ‘दबक्या पावलांचा’ आवजही जाणवू लागला आहे. डबेवाला जीना उतरुन गाडीवर बसेपर्यंत, हे त्याच्यावर गॅलरीतून आगपखाड करुन समज देतात. यादम्यान आदित्य मात्र अगदीच शांत आहे. कारण त्याने त्याच्या मनात डबेवाल्यासाठी पैसे बुडवायची शिक्षा ठरवली आहे.

आज आमच्या शेजारच्या ओढ्यात एक मोठी धामण निघाली. आकाशने तिला खूप वेळ पिकडून ठेवलं. आदित्य गावाला आपल्या घरी गेला होता. मी माझ्या मोबाईलवर त्याची व्हिडिओ शुटिंग करत होतो. इतक्यात आकाशला ‘ती’ चावली. त्याच्या बोटातून रक्त आलं. पण तो एकदम निवांत होता. शेजारीच विनोद उभा होता, रितेश गॅलरीत फोनवर बोलत होता. दोन दिवसांनी माझा पेपर आहे.

कालची रात्र आदित्यने आभ्यास करत जागून काढली. कड्याक्याची थंडी होती. आम्ही मध्यरात्री स्टँडवर कॉफी प्यायला गेलो होतो. मशिनमधून थेट प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये ओतली गेल्याने ‘ती’ कॉफी मला अधिकच आवडली. माझ्याकडे रात्री झोपण्यासाठी चांगलं पांघरुन किंवा गादी असं काहीही नव्हतं. मी माझी पुस्तकं शेजारी सरकवून तसंच कुडकुडत झोपी गेलो. पण थंडीमुळे रात्री अधूनमधून सारखं जाग येत होती. आणि तिथे डासही फार होते. आज सकाळपर्यंत आदित्यने मोठ्या निश्चयाने आभ्यास केला, आणि अचानकच परिक्षेला जाण्यापूर्वी काही तास… त्याने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्याच्या रिसिटवर आता आणखी एका रेषेची भर पडली आहे. त्या रुममध्ये असलेल्या सगळ्यांनाच याची खात्री होती. मी कधीच इतर मुलांसारखा परिक्षेबाबत हुशार नव्हतो. पण त्या फ्लॅटवर मात्र मी ‘वासरांत लंगडी गाय’ बनलो आहे.

माझा आजचा पेपर चांगला गेला. माझ्या मागे बसलेल्या मुलाला मी माझा सगळा पेपर दाखवला. त्यानंतर माझी ईच्छा नसतानाही मागून चिमटा काढून त्याने मला त्याचा पेपर बघायला लावला. शेवटी त्याच्या समाधानासाठी मी बघितल्यासारखं केलं… अशा मुलाला का मी माझा पेपर दाखवला!? मी स्वतःवरच खूप चिडलो होतो. ‘दान हे सत्पात्रीच असावं’ हे मला आज नव्याने समजलं.

आज विवेकचाही माझ्याबरोबर पेपर होता. पण त्याने तो दिला नाही. सध्या तो फ्लॅटवर दारुचे पेग रिकामे करुन येतो. पण यासाठी मी त्याला दोष देणार नाही. मी त्याला समजू शकतो. सध्यातरी तसं करण्याशिवाय कदाचीत त्याच्या हातात काहीच नाहीये, असं त्याचे डोळे सांगतात. तो पुढच्या परिक्षेपर्यंत नक्की सावरेल, याचा मला आतून विश्वास आहे.

आता माझा शेवटचा एकच पेपर उरला आहे. आदित्यचे अजून बरेच पेपर उरले आहेत, त्याने यावेळी जिद्दीने लढायचं ठरवलेलं, पण त्यांचं यापुढील भवितव्य अधांतरीच म्हणावं लागेल… त्याला आवडणार्‍या मुलीचं लग्न त्याच्याच एका नाआवडत्या मित्राबरोबर ठरल्याचं, काल रात्रीच त्याला फोनवरुन समजलं… अशा तणावपूर्ण परिस्थितीतही तो स्वतःवर ओढावलेल्या प्रसंगावर हास्यविनोद करत होता. आपल्या डोक्यावरचं ओझं लवकारात लवकर दूर सारणं, हे कोणीही त्याच्याकडूनच शिकावं! आनंदबरोबर तो रात्री बराच वेळ ‘बिअर बार’ मध्ये बसला होता. त्याचा मनोनिग्रह आज कोलमडून पडला.

कधीकधी रात्री लाईट बंद करुन आम्ही शेजारच्या ईमारतीत चालणारा डान्क्स क्लास पहात बसतो. त्या ईमारतीतून कोणी आम्हाला अचानक पाहिलं, तर त्यांना आमच्या रुमच्या खिडकीत, अंधारातून त्यांच्याकडेच पाहणारी एकावर एक अशी तीन तोंडं दिसतील… आणि होऽ एक तोंड गॅलीरीच्या दरवाज्यातून डोकावताना दिसेल. आदित्यचा आमच्या रुममध्ये त्या म्युझिकवर चालणारा ‘जगावेगळा नाच’ हा मात्र अगदी पाहण्यासारखा असतो! माझ्याप्रमाणेच तोही आता आपल्या घरी परतला आहे…

नोंद – या लेखास नोव्हेंबर २००९ सालचा संदर्भ आहे व हा लेख यापूर्वी कॉलेजच्या ‘वार्षिक’ अंकात प्रकाशित झाला होता.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.