Uncategorized

वेळ लवकर जात आहे

गेल्या काही वर्षांपासून मला वेळ लवकर निघून जात असल्याची अनुभूती होत आहे! वेळ कसा येतोय आणि कसा जातोय? हे काही कळेनासे आहे. पण एक गोष्ट मात्र मी निश्चितपणे सांगू शकतो की, ही काही माझ्या एकट्याचीच अनुभूती नाही. माझ्या मित्रपरिवाराच्या बोलण्यातूनही आजकाल अगदी हीच जाणिव व्यक्त होत आहे. माझं कॉलेज संपून जमाना झाला, तरी अजूनही मला ती अगदी दोन वर्षांपूर्वीची गोष्ट वाटते!

लहानपणी वेळ संथ गतीने जातो असं म्हणतात. माझ्या स्वतःच्या लहानपणाचा विचार केला असता, मला त्यात तथ्य जाणवते. दोन वर्षाच्या मुलाच्या दृष्टीने एक वर्ष हे त्याचं निम्मं आयुष्य आहे! पण ६० वर्षांच्या माणसाच्या  नजरेतून पाहिले असता एक वर्ष हा त्याच्या आयुष्याचा केवळ १/६० भाग आहे. लहानपणी वेळ संथगतीने जातो यामागे हा तर्क लावला जातो. माझ्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून पाहता शाळेबाबत वाटणार्‍या तिरस्कारामुळेही कदाचित माझा वेळ लवकर जात नसावा. शाळा म्हणजे माझ्यासाठी एक करागृहच होता.

वय वाढेल तसा वेळ लवकर जातो असं म्हणतात, पण ‘म्हातारपणी वेळ जाता जात नाही’ असं देखील म्हटलं जातं. म्हतारपणी करण्यासारखं काही नसतं, त्यामुळे आलेला क्षण पुढे ढकलावा लागतो. वेळेला पुढे ढकलण्याचं त्राण म्हातार्‍या शरितात नसावं, त्यामुळेच की काय! वेळ अगदी संथ गतीने पुढे सरकते! तरुण वयात मन हे कामात व्यस्त असतं. ‘मुलं कधी मोठी झाली ते कळालं देखील नाही!’, असं म्हणतात. याचा अर्थ मन कशाततरी गुंतलं असेल, तर वेळेची जाणिव रहात नाही.

आजच्या संगणक, मोबाईल व इंटरनेटच्या या जगात माहितीचा व ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे. त्यामुळे नाविण्याचा ध्यास असलेल्या या मनास सतत काहीतरी नवीन मिळत राहतं. ते जाणून घेऊन आत्मसात करण्यात मन गुंतून जातं, म्हणूनही मनास वेळेचे भान उरत नसावे. त्यानंतर आनंदाने बेभान झालेल्या मनासही वेळेची पर्वा नसते. मानव आज जितका सुखी-समाधानी व आनंदी आहे, इतके सुख हे त्याने यापूर्वीच्या इतिहासात कधीच अनुभवलेले नाही. आनंदी मन हे त्या त्या क्षणात जगत असते. त्यामुळे कदाचित ते त्याच क्षणात रहात असावे!

वेळ लवकर निघून जात आहे याचं आपण सध्या कल्पनाही करु शकत नाही असं काही वेगळे कारण असू शकेल? कारण काहीही असलं, तरी वेळ लवकर निघून जात असल्यची अनुभूती मात्र स्वयंसिद्ध आहे.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.