समिक्षा

मॅक्झिम गॉर्की : आई – भाग १

अन्ना किरिलोवना व त्यांचा मुलगा प्योत्र झलोमोव ह्या खर्‍या जीवनातील व्यक्तिरेखांना आपल्या नजरेसमोर ठेवून लेखक मॅक्झिम गॉर्की यांनी त्यांची ‘आई’ ही कादंबरी लिहिली आहे. ही कादंबरी इ.स. १९०७ साली म्हणजेच आजपासून शंभर वर्षांपूर्वी रशियात झालेल्या क्रांतीच्या पार्श्वभूमीवर लिहीली गेली होती. लेखक मॅक्झिम गॉर्की हे स्वतः त्या चळवळीचे सभासद होते. प्योत्र झलोमोव याला त्यांनी त्यांच्या कादंबरीत पावेल असं नाव दिलं आहे, तर मुख्य व्यक्तिरेखा म्हणजेच पावेलची ‘आई’ निलोवना ही या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे.

कादंबरीच्या सुरूवातीलाच लेखकाने कारखाना व सभोवतालच्या कामगार वस्तीचं अत्यंत साधं व हलक्या प्रतींचं जीवन आपल्या शब्दांतून चित्रित केलं आहे. अशाच त्या कामगार वस्तीत व्लासोव कुटूंब राहात होतं. मेकॅनिक मिखाईल व्लासोव (पावेलचा बाप) हा त्या घरातील कर्ता पुरूष होता. तो सतत इतरांना तुच्छतेने बघायचा व वरिष्ठांशी उद्धटपणे वागण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याची मिळकतही बेताचीच असायची. त्याचे ताकदवान शरीर, उग्र चेहरा व डोळे पाहून लोकांना त्याची भितीच वाटत असे. अशा या माणसाची ‘कुत्तेकी अवलाद’ ही आवडती शिवी होती. संध्याकाळी व्लासोव दारुने तर्र होऊन घरी येई. संध्याकाळी बायकोने पटापट भांडी आवरली नाहीत, तर तो तिला जमिनीवर भिरकावून देई व वोडकाची बाटली समोर ठेवी. एकदा पावेल चौदा वर्षांचा असताना त्याने त्याच्या झिंज्या ओढण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा पावलने एक जड हातोडा उचलून ‘अंगाला हात लावू नका’ म्हणून बापाला बजावले. त्या दिवसापासून दोन वर्षांनी त्याचा मृत्यू होईपर्यंत त्याने पावेलकडे मुळीच लक्ष दिले नाही व तो त्याच्याशी चकार शब्दाने बोलला देखील नाही.

त्या वस्तीत दारू पिणे ही काही जगावेगळी गोष्ट नव्हती, तर तरूण मुलं दारू पिणारच हे त्यांच्या आईवडीलांनी गृहीतच धरलेलं असायचं. कारण त्यांच्या तरूणपणी त्यांनीही तेच केलं होतं व ही प्रथा त्या कामगार वस्तीत अशीच चालत आली होती. दारू पिणे, मग मारामार्‍या करणे हा त्या कामगार वस्तीतील जीवनाचा रोजचा भाग होता. तिथल्या इतर तरूण मुलांप्रमाणे पावेलही दारू पिऊ लागला, पण ते त्याच्या शरीराला सहन होत नसे. हळूहळू त्याने पार्ट्यांना जाणं कमी केलं व रविवारच्या सुटीदिवशीही तो बाहेर गेला तरी दारू न पिता परत येऊ लागला. तो घराचे सर्व दरवाजे बंद करून पुस्तंकं वाचू लागला. हळूहळू त्यामध्ये होणारा हा बदल मात्र आईच्या नजरेतून सुटला नाही व तिला कसलीतरी अनामिक भिती वाटू लागली. आपल्या मुलाच्या बोलण्यातील नवीन अनाकलनीय शब्दांमुळे व शहरातील लोकांच्या त्याच्या सहवासामुळे तिला आपल्या मुलाबद्दल फार काळजी वाटू लागली.

मॅक्झिम गॉर्की यांनी कादंबरीचा हा सुरूवातीचा भाग फारच सुंदरपणे रेखाटला आहे. अनेक लहान लहान प्रसंगातून त्यांनी आईचे हृदय फारच नेमकेपणाने वाचकांच्या डोळ्यांसमोर चित्रित केले आहे. पण हे करत असतानाच त्यांनी कुठेही फार आलंकारीक वर्णन होऊ न देता एखाद्या व्यक्तिच्या मनात सहज येणारे अतिशय छोटे छोटे व वार्‍याप्रमाणे अतिशय चंचल असलेले विचार मांडले आहेत व त्यातूनच मानवी जीवनाचे रंग त्यांनी उलगडले आहेत.

क्रमशः

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.