Uncategorized

माणूसपणाचे ओझे

माणूस स्वतः इतका आयुष्यात इतर कोणासमोरही हतबल होत नसेल. कधी परिस्थिती त्यास हतबल करते, कधी माणसे त्यास हतबल करतात आणि मग हळूहळू तो स्वतःसमोरच पूर्णतः हतबल होऊन जातो. पण मूळात तसं पहायला गेलं, तर केवळ परिस्थितीच त्यास हतबल करत असावी. काही लोक नशिबास दोष देऊन, तर काही लोक निर्लज्ज बनून माणूसपणाचे ओझे दूर करण्याचा प्रयत्न करतात. शरीरावरील ओझे समजण्याइतपत दृष्टी तर माणसास मिळाली आहे, पण मनावरील ओझे समजून घेण्याइतपत दिव्यदृष्टी अजून त्यास प्राप्त व्हायची आहे.

हे विश्व पूर्वनियोजित आहे? की आपण त्यास आकार देत आहोत? याचा अजून कोणास निश्चितपणे थांगपत्ता लागलेला नाही. पण आपणच त्यास आकार देत आहोत या गृहितकावर हे जग काळासोबत पुढे ढकलले जात आहे. त्यामुळे आपसुकच ऐकमेकांवर दोषारोप करणे हे आलेच! माणूस खरंच अगदी केवलवाणा, बिच्चारा प्राणी आहे! तो स्वतःला पूर्वीपेक्षा हुशार समजत असला, तरी तो अजूनही अत्यंत मूर्ख आहे. ज्या खिडकीतून प्रकाश येतो, त्यादिशेने सर्वसामान्य माणसाचा सूर्य उगवत असतो.

अज्ञानात सुख असते, पण ज्ञानात परमानंद दडलेला असतो. माणूस त्यादिशेने वाटचाल करत आहे, पण अजून त्यास तसा अवकाश आहे. मोक्ष मिळवण्यास मानवजन्म उत्तम आहे, यात मात्र तथ्य असल्याचे जाणवते, कारण मानवाइतकी जागृत चेतना या पृथ्वीवरील इतर कोणा प्राण्यास असेल असे वाटत नाही. पण एखादा जीव इतका अज्ञानी असू शकेल का की त्यास अज्ञानातील सुखानेच परमानंद मिळून पुढे मोक्ष प्राप्त होईल? सुक्ष्म जीव हे काहीही विचार न करता कार्यकारण भावाने वहावत असल्यागत जाणवतात. ते जर खरे असेल, तर प्रत्यक्ष सूक्ष्म जीवाइतकंच तुच्छ असू शकणारा मानव प्राणीही परिस्थितीनुसार वहावत नसेल कशावरुन?

काही का असेना! पण मानव असणे व सोबतच मानव प्राणी असणे ही काही खायची गोष्ट नाही! आपण प्राणी आहोत हे स्विकारण्यास तयार नसलेल्या मानव प्राण्याच्या मानत त्यातून मोठे द्वंद निर्माण झाले आहे. नैसर्गिक जाणिवा व नैतिकता या भोवर्‍यात तो अडकला आहे. पण तो हे विश्व अनुभवत असेपर्यंत तरी त्याची प्राणित्वातून पूर्णपणे सुटका होईलसे वाटत नाही. दूर भविष्यात विज्ञानाच्या मदतीने मोक्षप्राप्तीची सेवा सुरु होईल, तेंव्हाच मोक्षत्त्वाचे दालन हे सर्वसामान्यांसाठी खर्‍या अर्थाने खुले होईल. नाहीतर आपण माणूसपणाचे ओझे वहात परिस्थितीनुसार वहावत पुढे कुठे जाऊन पडणार? याचा कोणालाच काही थांगपत्ता नसतो!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.