सामाजिक

मराठ्यांनो गुंतवणूक करा!

आपला महाराष्ट्र हा पारंपारिक व्यापारी मार्गादरम्यान लागत नव्हता, तेंव्हा आपल्या पूर्वजांचा काही व्यापाराशी संबंध आला नाही. त्यामुळे मराठी लोकांमध्ये व्यवहारज्ञान हे तसे कमीच दिसून येते. अशाने पहिल्या पिढीतील अनेक मराठी व्यापारी अपयशी ठरले. त्यामुळे आपल्या समाजात सर्वत्र आर्थिक गैरसमज व त्यातून निर्माण झालेली अनाठायी भिती दिसून येते. मराठी माणसाला उद्योग-व्यवसाय करता येत नाही, असं म्हटलं जातं आणि त्यात काही प्रमाणात तथ्य देखील आहे. अर्थात त्यास काही सन्माननीय अपवाद आहेतच! एबिपी माझा वाहिनीने मध्यंतरी ‘मराठी बिग बॉस’ नावाचा एक अत्यंत स्तुत्य कार्यक्रम हाती घेतला होता. तो आपल्याला ‘यु-ट्यूब’ वर कधीही पाहता येईल. त्यातून प्रेरणा घेण्यासारखे खूप चांगले विचार आपल्याला मिळतील.

परिस्थिती हळूहळू बदलत असली, तरी आजही ‘मराठी माणसास दुकान चालवता येत नाही’, ‘मराठी माणसास मोठा व्यवसाय करता येत नाही’, हे आपण एकंदरीत विचार करता काही प्रमाणात मान्य करण्यास हरकत नाही. आपल्यातील कमीपणा मान्यच केला नाही, तर तो दूर तरी कसा करणार? पण या व्यवसायिक समस्येवर मी इतरांप्रमाणे फाल्तूचे सल्ले काही देणार नाही. मी आपल्याला एक अत्यंत व्यवहारी व सोपा उपाय सुचवतो. समजा आपल्याला प्रत्यक्ष व्यवसाय करता येत नाही, तर मग एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करायला काय हरकत आहे? गुंतवणूक कुठे करणार? तर भारतातील नामांकीत व्यवसायांत! कशी? यावर ‘शेअर मार्केट’ असं उत्तर दिलं, तर अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतील. पण ‘शेअर मार्केट’ बाबतची भिती अत्यंत चुकीची असून केवळ कट्यावरच्या उथळ गप्पांमधून ती निर्माण झालेली आहे.

आपल्याला ‘शेअर मार्केट’ बाबत काही कळत नाही ना! मग तो विषयच सोडून द्या! ‘म्युचवल फंड’ मध्ये तरी गुंतवणूक करा! ‘म्युचवल फंड’ मध्ये गुंतवणूक न करण्याबाबत मात्र कोणी काहीही कारण देऊ शकत नाही. प्रत्यक्ष व्यवसाय न करता व्यवसायिक होण्याकरीता ‘म्युचवल फंड’ सारखी दुसरी उत्तम व्यवस्था नाही! मी जे सांगतोय ते पटत नसेल, तर नोकरी करत असताना टॅक्स वाचतो, म्हणून तरी कमीतकमी गुंतवणूक करा. वाटल्यास अगदी पाचशे रुपयांपासून सुरुवात करा! आभ्यास करा! निरिक्षण कर! अनुभव घ्या! आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन आपला उत्कर्ष साधला जावा इतकीच माझी प्रामाणिक ईच्छा आहे. उगाच कर्ज काढून सण साजरा करु नका!

माणसाजवळ पैसे नसतील, तर त्यास प्रत्यक्ष घरातही किंमत मिळत नाही. तेंव्हा नुसतं घोषणा देऊन आपल्याला मान मिळेल, आपला स्वाभिमान जपला जाईल, असे वाटत असल्यास तो निव्वळ निरर्थक आशावाद आहे. मराठ्यांनो प्रत्यक्ष व्यवसाय करता येत नसेल, तर गुंतवणूक करा! गुंतवणूक ही मोठीच असायला पाहिजे असे काही नाही. संयम आणि सातत्य या दोन गोष्टी आयुष्यात फार महत्त्वाच्या आहेत. ‘थेंबे थेंबे तळे साचे!’ ही गोष्ट कधीही विसरु नका. गुंतवणूकीतून आपणास केवळ आर्थिक सुबत्ता मिळणार नाही, तर हळूहळू आपले विचारही सकारात्मक होतील. आपल्यामध्ये आत्मविश्वास तर निर्माण होईलच, पण इतर लोकही आपला स्वाभिमान जपतील. समाजसुधारकांनी, संतांनी दिलेल्या प्रगतीशील विचारांस जर आर्थिक उत्कर्षाची जोड मिळाली, तर आपला मराठी समाज जगातिक पटलावर महत्त्वाचे स्थान प्राप्त करु शकेल.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.