मराठी महाराष्ट्र

मराठीचे ‘यशस्वी’करण व्हावे!

जे नकळत केले जाते ते ‘अनुकरण’, तर जे विचारपूर्वक केले जाते ते ‘अनुसरण’. आयुष्यात यशाचे अनुकरण आणि अनुसरण करण्याकडे माणसाचा नैसर्गिक कल असतो. परंतु मुळात यश म्हणजे नक्की काय? नीट विचार केला असता आपल्या लक्षात येईल की यश ही एक सापेक्ष संकल्पना आहे. आपण यशस्वी नाही, असे एखाद्याला वाटू शकते, पण प्रत्यक्षात प्रत्येक माणूस हा दुसऱ्या माणसाच्या तुलनेत कोणत्या ना कोणत्या बाबतीत तरी यशस्वी असतोच! फक्त हे यश हेरण्याची सकारात्मक दृष्टी आपल्याजवळ असावी लागते. अर्थात जे यशाबाबत म्हणता येईल, तेच अगदी अपयशाबाबतही म्हणता येईल, पण केवळ अपयशावर बोट ठेवत राहिल्याने आपला आत्मविश्वास वाढणार नाही. इथे मराठी माणसाच्या बाबतीत मात्र अनेकानेक वर्षांपासून नेमके तेच घडत आहे.

उदारमतवादाच्या नावाखाली उपाऱ्यांचे फक्त यश हेरायचे आणि भूमीपुत्रांच्या अपयशावर बोट ठेवत राहायचे अशी एक टूम मध्यंतरी निघाली होती. त्यासाठी माध्यमांना हाताशी धरून जोरदार बुद्धिभेद करण्यात आला. यातूनच आपण अपयशी असल्याची भावना मराठी समाजमनात रूढ होत गेली. स्वतःसोबतच स्वतःच्या भाषेबद्दल न्यूनगंड निर्माण झाल्याने त्याचा समाजाच्या आत्मविश्वासावर विपरीत परिणाम झाला. परंतु पूर्वीच्या नवशिक्षितांप्रमाणे आताची पिढी अर्धशिक्षित राहिलेली नाही. एखाद्या गोष्टीचा साकल्याने विचार करण्याची क्षमता आजच्या बुद्धिवादी पिढीमध्ये आहे. परिणामी मराठी महाराष्ट्राविरोधात केला जात असणारा बुद्धिभेद यापुढे फार काळ टिकणार नाही.

जर आपल्याला आपला स्वतःचा, आपल्या महाराष्ट्र देशाचा उत्कर्ष साध्य करायचा असेल, तर त्याकरिता सर्वप्रथम आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतःमधील यश हेरावे लागेल. त्यानंतर या यशाच्या जोरावर प्राप्त झालेले अधिकार वापरून त्याद्वारे आपली भाषा पुढे न्यावी लागेल. अशाप्रकारे मराठी भाषेच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या व्यवहारांत पर्यायाने मराठी समाजात नवचैतन्याचा संचार होईल! आपण भाषेला आपले अधिकार दिले, तर भाषा आपल्याला आणखी अधिकार देईल!

या जगात प्रत्येकाचे आपले स्वतःचे एक अधिकारक्षेत्र असते, आपण केवळ ते अधिकारक्षेत्र ओळखायचे असते! घर हे गृहिणीचे अधिकारक्षेत्र आहे, ती घरात मुलांवर मराठीचे संस्कार करू शकते. कामकाज हे नोकरदाराचे अधिकारक्षेत्र आहे, तो आपल्या कामकाजात मराठीचा वापर वाढवू शकतो. दुकान हे दुकानदाराचे अधिकारक्षेत्र आहे, तो तिथे मराठीतून सेवा देऊ शकतो. सेवा हे ग्राहकाचे अधिकारक्षेत्र आहे, तो आपल्या भाषेतून सेवा मागू शकतो. उत्पादन हे व्यापाऱ्याचे अधिकारक्षेत्र आहे, तो आपल्या उत्पादनात मराठीचा वापर करू शकतो. तुम्हाला वाटतं त्याहून तुमचं अधिकारक्षेत्र खूप मोठं आहे! तुमच्या कल्पनेहून तुम्ही अधिक प्रबळ व यशस्वी आहात!

आपल्यातील उणिवा जाणून स्वतःत सातत्यपूर्ण सुधारणा करायला हव्यात याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. परंतु हे करत असताना पूर्वीपासूनच जी आपली जमेची बाजू आहे ती देखील ओळखायला हवी. मुळातच वैचारिक पातळीवर मराठी समाज तुलनेने अधिक यशस्वी असल्याने बाहेरील लोकांना इथे येऊन स्थिरस्थावर होत स्वतःचा उत्कर्ष साधता आला. त्यामुळे महाराष्ट्राच्या वैचारिक वारशातून साध्य झालेल्या महाराष्ट्राच्या आर्थिक उत्कर्षावर देखील महाराष्ट्रातील मराठी जनतेचाच अधिकार आहे! बाहेरील लोकांना या उत्कर्षात आत्मसन्मानाने वाटा हवा असेल, तर त्यांनी इथल्या मराठी मातीशी एकरूप व्हावे आणि आपल्यापैकी एक बनून राहावे.

कोणत्याही यशामागे आर्थिक, सामाजिक, राजकीय, वैचारिक किंवा अध्यात्मिक असे निरनिराळे आयाम असले, तरी आतून कुठेतरी हे सारे आयाम घट्ट विणलेले असतात. मराठी माणसाने स्वतःमधील बहुआयामी यश हेरल्यास त्याच्यात एक नवा आत्मविश्वास निर्माण होईल आणि या आत्मविश्वाच्या जोरावर तो आयुष्यात नवी मजल गाठेल. मराठीच्या यशातून कळत-नकळत मराठीचे अनुकरण, अनुसरण सुरू होईल आणि यातून जागतिक पातळीवर मराठीचे, पर्यायाने मराठी माणसाचे महत्त्व प्रस्थापित होईल! थोडक्यात मराठी समाजाला जर यापुढे मराठी म्हणून आपले यश द्विगुणित करायचे असेल, तर त्यासाठी प्रथम मराठीचे यशस्वीकरण होणे गरजेचे आहे.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.