व्यक्तिगत

फ्रिजची सेवानिवृत्ती

आज आमचा ‘फ्रिज’ सेवानिवृत्त झाला. सुमारे १७ वर्षांच्या अव्याहत सेवेत त्याने एकदिवसही तब्येतीच्या कारणास्तव स्वतःहून सुट्टी घेतली नाही. त्यामुळे आज त्यासंदर्भात चार शब्द लिहिणे मला क्रमप्राप्त वाटते. ‘केल्विनेटर’ नावाचा हा फ्रिज जेंव्हा आमच्या घरात आला, तेंव्हा तो माझ्यापेक्षाही उंच होता, त्यामुळे फ्रिजवर ठेवलेल्या वस्तू मला दिसायच्या नाहीत. पुढे वर्षागणीक माझी उंची वाढत जाऊन अशी ६ फूट २ इंच झाली ..आणि तो पूर्णतः माझ्या नजरेच्या आवाक्यात आल्याने त्यावर ठेवलेल्या वस्तूंबाबतची माझी उत्सुकता संपली.

पहिल्या दिवशी त्यास घरी आणले, तेंव्हा माझ्या मनात त्याच्याबद्दल औत्सुक्यपूर्ण कुतूहल होते. वडील कदाचित ओरडतील या भितीपोटी दबकत दबकतच मी त्याच्याजवळ पोहचलो व त्यास हात लावून पाहणार.. तोच ते बरोबर माझ्या वडिलांनी पाहिले! त्यांना माझ्या चेहर्‍यावर काळजी दिसली असावी, म्हणून ते मला काही बोलले नाहीत व हसूनच त्यास हात लावण्याची अनुमती दिली.

आमचा फ्रिज नवीन असताना फ्रिजरमध्ये पाण्याचा बर्फ बनवणे ही अगदी नित्याचीच बाब होती. त्या बर्फाला काहीही चव नसायची, पण तो केवळ ‘बर्फ आहे’ या भावनेतून त्यावेळी तो बर्फ खायला देखील गंमत वाटायची. नुसता बर्फ खाण्यापेक्षा नंतर उन्हाळ्याच्या दिवसांत रसनाचे पाणी फ्रिजरमध्ये ठेवून अनेकदा गोड बर्फ खाल्याचे देखील मला आठवते. आता मात्र असा बर्फ शेवटचा कधी तयार केला? ते देखील मला आठवत नाही! आजकाल फ्रिजरकडे पाहिल्यावर ओसाड ‘आंटार्टिका खंड’ पाहिल्याचे समाधान व्हायचे!

एकदा आमच्या शाळेत परदेशवारी केलेले पाहुणे तिकडच्या गमती जमती सांगण्यासाठी आले होते. तेंव्हा त्यांनी सांगितले होते की, तिकडचे लोक चालू अवस्थेत असलेला जुना ‘फ्रिज’ असाच घराबाहेर कचरा म्हणून ठेवून देतात. या गोष्टीचं मला फार विशेष वाटलं! मी घरी येऊन आईला त्याबद्दल सांगितले. ‘फ्रिज’ सारखी वस्तू अशी टाकून देणं ही त्यावेळी माझ्या आईसाठी कल्पनेबाहेरचीच गोष्ट होती. त्यामुळे तिला यावर विश्वास ठेवणे अवघडच गेले. पण आज मात्र तिचा त्या गोष्टीवर थोडाफार विश्वास बसला असेल. अर्थात काही झाले तरी शेवटी आमची भारतीय मानसिकता असल्याने आमचा फ्रिज हा कायम आमच्याजवळच राहिल.

‘फ्रिज’ निवृत्त झाला, याबद्दल मला दुःख अथवा खेद नाही. त्याने १७ वर्षं आपली कामगिरी अगदी चोख बजावली आणि आता नवीन पिढीने त्याची जागा घेणे क्रमप्राप्त होते. आमच्या फ्रिजने जवळपास एक पिढी आमची सोबत केली आहे, तेंव्हा त्याच्या आठवणी मात्र सदैव आमच्यासोबत राहतील.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.