Uncategorized

पूर्वजांची पापे

सर्वकाही पूर्वीपासूनच ठरलेलं असतं, असं मानलं, तर मग प्रश्नच संपला! तेंव्हा मग काही लिहिण्यासारखे, बोलण्यासारखे व करण्यासारखेही उरत नाही. त्यामुळे सर्वकाही पूर्वीपासून ठरलेलं नसतं, या गृहितकास धरुणच आपली कार्यधारणा असणं सर्वमान्य दृष्टीने भाग आहे. मूळात ‘पाप’ आणि ‘पुण्य’ म्हणजे काय? माझ्या मते आपली आध्यात्मिक पातळी वर घेऊन जाणारी उर्जा म्हणजे पुण्य, तर ही आध्यात्मिक पातळी रसातळाला नेणारी उर्जा अथवा पुण्यरुपी उर्जेचा अभाव म्हणजे पाप. मग आपल्या अंगिभूत असणारी आध्यात्मिक उर्जा व आपले पूर्वज यांचा काही संबंध आहे का? तर याचे उत्तर हे निश्चितपणे ‘हो’ असे देता येईल. आपल्या पूर्वजांचे सकारात्मक अथवा नकारात्मक विचार हे नकळतच आपल्याही अस्तित्त्वाचा भाग बनतात.

पण तरीदेखील यातील ‘नकारात्मक’ भागाकडे पूर्णतः दूर्लक्ष करुन केवळ ‘पूर्वजांची पुण्याई’ हा शब्दप्रयोग सर्वत्र का वापरला जातो? काही लोकांच्या मते हाही सकारात्मकतेचा एक भाग असू शकतो. पण माझ्या मते ती सकारात्मकता नसून ‘खोटेपणा’ आहे! व त्यामुळे सकारात्मकता म्हणून पूर्वजांच्या पापांचा उल्लेख न करणे ही अप्रत्यक्षरीत्या नकारात्मकताच आहे. ‘मनःपूर्वक समजून घेणं’ ही एक वेगळी गोष्ट आहे, पण ‘खोटेपणाकडे डोळेझाक करणे’, ‘खोट्यास खरे म्हणने’ ही दुसरी गोष्ट आहे. कारण अखेर खोटेपणातून कधीही एखाद्या व्यक्तिचा अथवा समाजाचा उद्धार साध्य होऊ शकत नाही!

सध्या मी रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ हे आत्मचरीत्रपर पुस्तक वाचत आहे. तसा या पुस्तकाचा व मला जो मुद्दा मांडायचा आहे, त्याचा प्रत्यक्ष काही संबंध नाही. पण त्यायोगे अप्रत्यक्षरीत्या मला माझा मुद्दा स्पष्ट करुन मांडता येईल.  या पुस्तकात उल्लेखलेली सर्व माणसे ही आता कालोघात विरुन गेली आहेत. त्यांच्यापैकी कोणीही आज या पृथ्वीतलावर जीवंत नाही. पण त्यांच्या कार्यविचारांबाबत मात्र तसे म्हणता येणार नाही. त्या काळातील माणसांनी आपल्या चांगल्या-वाईट विचारांतून जे काही चांगले-वाईट काम केले असेल, त्याचे पडसात आपण आजही आपल्या आसपास पाहू शकतो. आज मुलींना मिळालेले स्वातंत्र्य हे निश्चितपणे आपल्या पूर्वजांच्या पुण्याईचे द्योतक आहे. पण याउलट आजही आपल्या समाजात ज्या अपप्रवृत्ती दिसून येतात, त्यास मात्र ‘पूर्वजांची पापे’ असे कोणी म्हणताना दिसत नाही! कारण आता त्याचा उपयोग तरी काय? असे वरकरणी पाहणार्‍यास वाटू शकते. पण मानवामध्ये घसरलेल्या आध्यात्मिक पातळीमुळे जी नकारात्मकता दिसून येते त्याची काळजीपूर्वक मिमांसा केली असता, त्याची मुळे ही बहुतांशवेळा त्या मानवाच्या पूर्वजांमध्येच दिसून येतात. तेंव्हा नकारात्मक पापी माणसास वेठीस धरुन त्यास पूर्णतः नालायक ठरविण्यापूर्वी त्याच्या विक्षिप्त वर्तवणूकीस समजून घेण्याची एक संधी आपणास या विचारसरणीच्या माध्यमातून मिळू शकते. ही बाब खास करुन कशोरवयीन मुले व तरुणांसाठी विशेष महत्त्वाची आहे. कारण त्यांना स्वतःच्या आयुष्याचा पुरता उलगडाही झालेला नसतो, तोच आपण त्यांस धारेवर धरु लागतो.

अनेकदा आपल्या अध्यात्मिक पातळीची जाण नसलेला निद्रिस्त मानव हा आपल्या पूर्वजांच्या पाप-पुण्याच्या ठेवीवर केवळ वहावत चाललेला असतो व बहुतांशवेळा त्यास स्वतःसही आपल्या चमत्कारिक वागण्याचा बोध होत नाही. साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकातील ‘प्रारंभ’ या प्रकरणातील एक परिच्छेद मी यानिमित्ताने या इथे आहे तसा उद्धृत करतो.

मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे पाप नाही. स्वच्छ झर्‍याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहणार्‍यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. वसिष्ठऋषी वेदामध्ये वरुणदेवाला म्हणतात, “हे वरुणदेवा! माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल, तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळीस जबाबदार धर.”

अर्थात आपणही कधी ना कधी कोणाचे तरी पूर्वज होणारच आहोत! तेंव्हा पुण्याची मालिका अखंडीत ठेवून पापावर मात करणे हे एका दृष्टीने आपलेही कर्तव्य आहेच! पण वयाच्या एका विशिष्ट टप्यानंतरच वहावणार्‍या माणसास स्वतःचा ताबा हा काहीसा प्राप्त होऊ लागतो. तेंव्हा माणसाने माणसास त्यादृष्टीने समजून घ्यायला हवे. आता प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातच! आणि काही माणसे ही कितीही समजून घेतले तरी ‘अशक्य!’ या प्रकारातच मोडतात. पण अपवादास नियम तो कसा करावा? तेंव्हा सर्व गोष्टींचा साकल्याने व आभ्यासपूर्वक विचार करुनच समकालिन सामाजाने आपला दृष्टिकोन बनवायला हवा.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.