आयुष्य

परग्रहवासियाचे हास्य

काही दिवसांपूर्वी अशी एक बातमी कानावर आली की, ज्यामुळे ‘प्राचीन परग्रहवासी प्रवासी सिद्धांताच्या पुरस्कर्त्यांना’ अक्षरशः वेड लागायचंच तेव्हढं बाकी उरलं असेल!’. कारण मुख्य प्रवाहातील काही शास्त्रज्ञांनी इथून दीड हजार प्रकाशवर्ष दूर अतिप्रगत संस्कृती नांदत असल्याची शक्यता व्यक्त केली. मिचिओ काकू यांच्या फुटपट्टीवर अशाप्रकारच्या संस्कृतीची गणना करायची झाल्यास यास ‘प्रकार २ची संस्कृती’ म्हणता येईल. कारण ही संस्कृती एका सबंध सूर्याची उर्जा नियंत्रित करत असल्याची चिन्हे आहेत. मला वाटतं, तिथे जर खरेच परग्रहवासी असल्याचे सिद्ध झाले, तर मानवी जीवनास नवमिती प्राप्त होईल. सध्या जगातील सर्वप्रकारच्या खगोलदुर्बिणी या त्या दिशेने रोखल्या गेलेल्या आहेत.

असो! अख्खा सूर्य नियंत्रित करणार्‍या जीवांच्या लेखी आपण कस्पटासमान असणार हे तर ओघाने आलंच! पण तरीही मला वाटतं, एखाद्या परग्रहवासियाने आपल्या ध्यानधारणेतून बाहेर येऊन एकदा पृथ्वितलाला भेट द्यावी.. आपल्यावर सर्व कॅमेरे रोखले गेले आहेत याची चाचपणी करुन यानातून बाहेर पाऊल टाकावे.. थोडे अंतर चालावे.. मग काहीही न बोलता गालातल्या गालात हलकेसे निरर्थक हसावे.. आणि आल्यापावली सावकाश निघून जावे! त्याने केवळ एव्हढं जरी केले, तरी सगळ्या जगाचे विषय एका क्षणात बदलून जातील व सबंध जगाच्या नजरा या टिव्हीस्क्रिनवर खिळतील. मनावी मनास दुसरं काय हवं असतं? चघळायला एक विषय तर हवा असतो!

वृत्तवाहिन्या दिवसरात्र ते हास्य पुन्हा पुन्हा दाखवत राहतील. त्या हास्यावर संपूर्ण जगात चर्चासत्रे झडतील. परग्रहवासियाच्या त्या हसण्यामागील नेमके भाव काय? नी कारण काय? त्याला पृथ्विवासियांना काय संदेश द्यायचा असेल? तो मित्र आहे की शत्रू? राजकारणी, कलाकार, खेळाडू, गायक ते शरिराची भाषा ओळखणारे तज्ञ अशा सर्वांचे मत वृत्तवाहिन्यांवर घेतले जाईल. पैशांसोबतच आपली बुद्धी देखील जपुजपु वापरणार्‍या सर्वसामान्य माणसाच्या मुलाखतीही दाखवल्या जातील. राजकारणी नेहमीप्रमाणे ऐकमेकांवर टिका करतील, गायक गाणे म्हणतील, विनोदवीर विनोद करतील, गुरु ज्ञान देतील. प्रत्येकजण त्या हास्याचा आपापल्या बुद्धिप्रमाणे अन्वयार्थ लावेल.

पण काहीका असेना! थोड्या कालावधीत कधी नव्हे इतकी मानवी बुद्धी वापरली जाईल. युगानुयुगे चालत आलेल्या त्याच त्या चर्वणातून मानवी मन क्षणभर बाहेर पडेल.. जीवनक्षतिजावर एक नरज टाकेल.. निरर्थक हसेल.. आणि कदाचित सरतेशेवटी आपण एकच असल्याची भावना त्याच्या मनात निर्माण होईल. नाहीतर आपले पहिले पाढे पंचावन्न आहेतच!

असो! (पुन्हा एकदा!). मी आपलं सहजच कल्पनाचित्र रंगवतोय! पण तुम्हाला काय वाटतं!? (हा ब्लॉग कोणीही वाचत नाही, हे माहित असूनही मी कोणाला तरी विचारतोय! म्हणजे मी स्वतःलाच विचारतोय!) परग्रहवासी खरंच असतील? आणि जर ते असतील, तर भूतकाळात या पृथ्वितलावर अवतरले असतील? कदाचित याचं उत्तर सतत बदलत आहे. पण नेहमीच्या पातळीवरुन विचार केला आणि तर्कशुद्ध गणिताचा आधार घेतला, तर या विश्वात परग्रहवासी असण्याची शक्यता अधिक आहे. तेंव्हा भविष्यात परग्रहवासियांची भेट निश्चित समजण्यास हरकत नाही. ते भूतकाळात येऊन गेले होते का? हे त्यावेळी त्यांनाच विचारता येईल. कदाचित ‘प्राचीन परग्रहवासी प्रवासी सिद्धांताचे पुरस्कर्ते’ तेंव्हा म्हणतील, ‘मी तर आधिच म्हटलं होतं!’; किंवा ते म्हणतील, ‘परग्रहवासी खोटं बोलत आहेत!’. ‘कदाचित निश्चित, कदाचित अनिश्चित!’, अखेर हेच तर जीवन आहे!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.