सामाजिक

पत्रकारांची जगबुडी

‘आजकाल दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे’, ‘माणसाची नितीमूल्य हरवत चालली आहेत’, असं जर मी लिहिलं, तर काही लोकांस वाटेल.. अरे व्वा व्वा! काय सुंदर सुरुवात केली! आज काहीतरी विशेष रुचकर वाचायला मिळणार! पण तशी अपेक्षा बाळगल्यास भ्रमनिरास होण्याचीच शक्यता अधिक असून माझ्या दृष्टीने ही जागात सर्वत्र सर्रास वापरली जाणारी तद्दन फाल्तू व निराधार विधाने आहेत. कारण हे जग दिवसेंदिवस अधिक सुरक्षित होत असून माणसाची नितीमूल्य ही अधिक सजग, चांगली व परिपूर्ण होत आहेत यावर माझा विश्वास आहे. भविष्यात मानव जातीस एका धोकादायक वळणावरुन अतिशय काळजीपूर्वक पुढे जावे लागणार असले, तरी संबंध मानवजातीचे नैतिक अधःपतन हे त्याचे कारण नसून वैज्ञानिक प्रगतीमुळे एकेका मानवाच्या हातात प्रचंड मोठी ताकद एकवटली जाण्याची शक्यता, हे त्यामागील खरे कारण आहे.

जगबुडी, जगबुडी म्हणत सर्वसामान्य माणसास सतत भिती दाखवली की, सर्वसामान्य माणूसही जगबुडी कधी होणार? कशी होणार? कोण कोण मरणार? कसं मरणार? हे जाणून घेण्यासाठी कान देऊन बातम्या ऐकत राहतो, हे एव्हाना पत्रकारांनी ओळखले आहे. तेंव्हा या जगात काहीतरी भयंकर तांडव चालू असल्याचे चित्र रंगवणे हे त्यांच्या स्वतःच्या फायद्याचेच असते. हे सारं काही असं आहे,

पत्रकार – जगबुडी! जगबुडी! फक्त आणि फक्त आमच्या इथे!

प्रेक्षक – आता निवांत बसून जेवता जेवता टि.व्ही. वर जगबुडी पहायला मज्जा येणार!

वाचक – चला! कट्यावर बसल्या बसल्या चकाट्या मारुन चघळायला एक नवीन विषय मिळाला!

जग – हे सारे लोक नक्की कोणत्या जगात राहतात!?

आता काही लोक कुठे त्या अरुणाचल प्रदेश का उत्तर प्रदेशच्या खेड्यात घडलेला एखादा गुन्हा सांगतील! आणि म्हणतील हे पहा! कित्ती वाईट गोष्टी चालल्या आहेत ‘आजकाल’ या जगात! ..अहो! पण त्या दोन महायुद्धात आणि इकडे फाळणीच्या वेळी मेलेल्या, बालात्कार झालेल्या गुन्हांची मोजदाद तरी आहे का? इतिहास वाचायला नको! उगाच आपलं उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा हा प्रकार आहे! पूर्वी वर्तमानपत्र, टि.व्ही. अशी प्रसारमाध्यमं नव्हती. तेंव्हा जे कनोकानी ऐकू येईल तिच काय ती बातमी! आजकाल उगा कुठे खुट्ट जरी झाले तरी सबंध जगात त्याचा हाहाकार माजतो!

प्रगती हे स्थेर्याचे द्योतक आहे. आजचे जग यापूर्वीच्या मानवी इतिहासात कधीच नव्हते इतके सुरक्षित आहे आणि त्यामुळेच ते इतकी प्रगती करत आहे. सध्या मानवाची मानसिक, आध्यात्मिक उत्क्रांती ही वेगाने सुरु आहे. येत्या काही शतकात जर मानवाने धोकादायक वळण यशस्वीरित्या पार केले, तर मानवी ज्ञान एक नवी वैश्विक उंची गाठेल व तो परमानंद प्राप्त करेल याबाबत माझ्या मनात काडीमात्र शंका नाही.

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.