व्यक्तिगत

नव्या वर्षाची जुनी सुरुवात

‘मानलं तर आहे, मानलं तर नाही’, बहुदा हाच जीवनाचा जादूई मंत्र असावा. काही लोक आजच्या दिवसाला नवीन वर्षाची सुरुवात मानतात, तर काही लोक गुढीपाडव्याचा आग्रह धरतात. जगभरातही नवे वर्ष एकाचवेळी सुरु होत नाही. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात सुरु झालेला नव्या वर्षाचा जल्लोश दिवसभरात संपूर्ण जगाची फेरी मारुन पुन्हा त्यांच्याच शेजारी येऊन थांबतो. रात्री १२ वाजता नवे वर्ष सुरु होते असे आपण मानतो. पण प्रमाणवेळ लक्षात घेतली असता, प्रत्येक शहराची मूळ वेळ ही निराळीच असते! तेंव्हा आपण १२ वाजले असे मानतो, पण प्रत्यक्षात १२ वाजलेलेच नसतात! थोडक्यात काय!? तर ‘मानलं तर आहे, मानलं तर नाही’. त्यामुळे अखेर नवीन वर्षाचे ओझे ते काय मानावे?

आजचा दिवस हा कालच्यापेक्षा काहीच वेगळा नव्हता.. आणि तो वेगळा व्हावा यासाठी मी काही विशेष प्रयत्नही केले नाहीत. कारण वर्ष एका क्षणात बदलत असले, तरी जीवन मात्र आपल्या सवडीने बदलते. तेंव्हा ‘सुधर, सुधर’ म्हणून उगाच त्याच्या मागे लगण्यापेक्षा त्याला आपलं एकटं सोडलेलं बरं! ते स्वतः काही विचार करत असेलच की! अखेर त्यालाही स्वतःची काळजी असेलच ना! आपण केवळ दूरुन पहात रहायचं.. पडलं तर सावरायचं.. हरवलं तर दिशा दाखवायची.. पण अखेर वाट तर त्यालाच तुडवायची आहे! त्याच्यावर थोडा विश्वास दाखवायला हरकत नाही.

आजचा हा लेख मी लिहायचा म्हणून लिहित आहे. तेंव्हा तो पूर्ण करण्यास मला बराच वेळ लागत आहे. जीवनाचेही असेच आहे. आपण जगायचे म्हणून जगत राहतो. त्यामुळे ते अर्थपूर्ण करण्यात बराच वेळ निघून जातो. लेखाची जशी काही मानके असतात, तशी अर्थपूर्ण जीवनाची देखील काही मानके असतात. ती मानके पूर्ण केली तरच आपण त्यास लेख किंवा जीवन म्हणून शकतो. शब्द जर कमी पडत असतील, तर जोडावे लागतात; आणि जास्त होत असतील, तर कमी करावे लागतात. लेखाप्रमाणेच अधुनमधून जीवनाचे देखील परिच्छेद बदलत जातात. काही क्षण ठळक असतात, तर काही अधोरेखित; काही मथळे असतात, तर काही अवतरणे. क्षणाला क्षण जोडले जातात.. आणि जीवनरुपी लेख काळाच्या शाईने अवकाशाच्या पटलावर कोरला जातो.

असो! नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना अगदी मनःपूर्वक मनसोक्त शुभेच्छा! हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

About रोहन जे.

शिक्षणाने मी एक अभियंता आहे आणि मनाने एक लेखक. विश्वातील नाविण्यपूर्ण अशा गोष्टींचं मला प्रचंड कूतुहल आहे. मला शिकायला आवडतं आणि शिकवायला देखील आवडतं. हा माझा मराठी ब्लॉग म्हणजे माझ्या मनातील अस्पष्ट विचारांची, काही आठवणींची गोळाबेरीज आहे.